अवैध दारु व्यावसायिकांवर आता वर्षासाठी होणार हद्दपारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:25 IST2021-04-04T04:25:45+5:302021-04-04T04:25:45+5:30

कोल्हापूर : जिल्ह्यातील अवैध दारु व्यावसायिकांवर आता पोलीस दलाकडून करडी नजर ठेवली जात आहे. अशा व्यावसायिकांविरोधात महाराष्ट्र झोपडपट्टी गुंड ...

Illegal liquor traders will now be deported for years | अवैध दारु व्यावसायिकांवर आता वर्षासाठी होणार हद्दपारी

अवैध दारु व्यावसायिकांवर आता वर्षासाठी होणार हद्दपारी

कोल्हापूर : जिल्ह्यातील अवैध दारु व्यावसायिकांवर आता पोलीस दलाकडून करडी नजर ठेवली जात आहे. अशा व्यावसायिकांविरोधात महाराष्ट्र झोपडपट्टी गुंड कायदा (एमपीडीए) अंतर्गत जिल्ह्यातून एक वर्ष हद्दपारीची कारवाई करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. या कडक अंमलबजावणीमुळे अवैध दारु व्यावसायिकांच्या कारवायांना चाप बसणार आहे.

अधीक्षक बलकवडे म्हणाले, जिल्ह्यातील अवैध व्यवसाय मुळासकट उपटून काढण्यासाठी पोलीस दलाचे प्रयत्न सुरु आहेत. जिल्ह्यातील रेकॉर्डवरील तसेच नव्या गुंडांची पोलीस स्थानकनिहाय यादी तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. यासाठी प्रत्येक तालुक्यात पोलीस स्थानकनिहाय मी स्वत: भेट देऊन आढावा घेत आहे. दारु व्यावसायिकांसह गुंडांवर कारवाईचे दूरगामी परिणाम होण्यासाठी त्यांचे वर्तणुकीचे जुने बाॅंड रद्द करण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. गेल्या महिन्यात अवैध दारु व्यावसायिकांवर दारुबंदी कायद्यांतर्गत छापे टाकले, त्या कारवाईत त्यांचे वर्तणुकीचे जुने बाॅंड रद्द करुन त्यांच्यावर ९३ कायद्यांतर्गत नवे बाॅंड घेत आहोत. प्रथम सुधारणा बाॅंड व नंतर दुसऱ्यांदा थेट शिक्षा होण्यासाठी कारवाई (एमपीडीए) करणार आहे. सध्या जिल्ह्यात अवैध दारु व्यावसायिकांना शिक्षा होण्याचे प्रमाण एक टक्काही नाही. हे शिक्षेचे प्रमाण वाढविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

४०० गुन्हेगारांना अटकाव

रंगपंचमीच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी जिल्ह्यातील पोलीस स्थानकांमध्ये शुक्रवारी दिवसभर सुमारे ४००हून अधिक रेकॉर्डवरील गुन्हेगारांना बसवून ठेवले होते, असेही अधीक्षक बलकवडे यांनी सांगितले.

नव्या १६ चारचाकी, २० दुचाकी पोलीस दलात

जिल्ह्यातील गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलीस दलाची गस्त वाढविण्यात येत आहे. बीट मार्शलसाठी पोलीस दलाकडे नवीन १६ चारचाकी तर २० दुचाकी आल्या आहेत. येत्या पंधरा दिवसात त्यात आणखी १५ दुचाकींची भर पडेल, ही सर्व वाहने पोलीस दलाच्या सेवेत लवकरच दाखल होतील. या वाहनांद्वारे ‘क्यूआर कोड’च्या आधारे पोलीस गस्त वाढविण्यात येणार आहे.

Web Title: Illegal liquor traders will now be deported for years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.