शेरीनाल्याच्या गळतीकडे दुर्लक्ष
By Admin | Updated: December 14, 2014 23:44 IST2014-12-14T23:40:06+5:302014-12-14T23:44:12+5:30
ग्रामस्थांमधून संताप : दूषित पाण्याच्या तक्रारी वाढल्या

शेरीनाल्याच्या गळतीकडे दुर्लक्ष
सोनी : धुळगाव (ता. तासगाव) येथे शेरीनाल्याचे पाणी साठवण हौदाला गळती लागून गाव पाणी पुरवठ्याच्या विहिरीला दूषित पाणी येत आहे. पिण्याच्या पाण्याची सोय करण्याची मागणी करूनही महानगरपालिकेच्या अधिकारी व पदाधिकाऱ्याने मात्र याकडे दुर्लक्ष केले आहे. मागणी करूनही कोणी साधी पाहणी करायला आले नसल्याने ग्रामस्थांतून तीव्र प्रतिक्रिया येत आहेत.
धुळगाव येथे सांगली येथील शेरीनाल्याचे पाणी धुळगाव येथील शेतीला देण्याची योजना राबवण्यात आली आहे. पण या योजनेचे पाणी गेल्या महिन्यात साठवण हौदात पडले; पण येथील साठवण हौदाला गळती आहे. त्यामुळे मोठ्याप्रमाणात पाणी पाझरून बाहेर पडत आहे. त्यामुळे शेजारील शेतीला पाणी लागल्याने पिके करपली आहेतच त्याचप्रमाणे पाणी पुरवठ्याच्या विहिरीलाही पाणी पाझरून पाणी दूषित होत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. यासंदर्भात ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी पिण्याच्या पाण्याची सोय करण्याची मागणी केली होती; पण याकडे महानगरपालिकेने दुर्लक्ष केल्याने पदाधिकाऱ्यांसह ग्रामस्थ आंदोलनाच्या पवित्र्यात असून, आठवड्याभरात पिण्याच्या पाण्याची सोय करण्याची मागणी केली आहे. (वार्ताहर)