‘व्यायाम ज्ञानकोश’ खंडांची शासनाकडून उपेक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2018 00:40 IST2018-05-28T00:40:06+5:302018-05-28T00:40:06+5:30

Ignore Government's 'Exercise Knowledge' volumes | ‘व्यायाम ज्ञानकोश’ खंडांची शासनाकडून उपेक्षा

‘व्यायाम ज्ञानकोश’ खंडांची शासनाकडून उपेक्षा



सचिन भोसले ।
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : ज्ञानेश्वरी, भगवद्गीता, रामायण, महाभारत, संतचरित्र, आदी खंड रूपाने आपणा सर्वांसमोर वाचनात आले आहेत. मात्र, खेळ, व्यायामावरही खंड प्रकाशित झाले होते, त्याची अनेकांना कल्पनाही नाही. हे ‘व्यायाम ज्ञानकोश’ खंड देशात सन १९३६ ते १९४९ च्या दरम्यान बडोदास्थित दत्तात्रय चिंतामण (करंदीकर) मुजुमदार यांनी लिहून प्रकाशित केले होते. हे मराठीतून प्रकाशित झालेले पहिले खेळांवरील दुर्मीळ ज्ञानकोश खंड राज्य शासनाकडून उपेक्षीत झाले आहेत.
बडोदा येथे राहणारे मुजुमदार हे उत्कृष्ट मल्ल होते. त्यांनी सन १९३६ खेळांचे महत्त्व किती होते हे जाणले होते. पैसा, संपत्ती, वैभव यांपेक्षा शरीरसंपदा हे मोठे धन आहे, म्हणून त्यांनी आरोग्याचे महत्त्व जाणून या ‘व्यायाम ज्ञानकोशां’ची निर्मिती केली. देशात अशा प्रकारे केवळ व्यायाम विषयावर दुर्मीळ असे हे दहा खंड आहेत. दहा खंडांच्या एकूण पानांची संख्या सुमारे पाच हजार इतकी आहे. त्यात चित्रांचीही संख्या तितकीच आहे. कोल्हापुरात केवळ महावीर महाविद्यालय व गारगोटी येथील कर्मवीर हिरे महाविद्यालयाच्या परुळेकर ग्रंथालयात हे खंड केवळ पाहावयास मिळतात. मात्र, राज्य शासनाकडून दुर्मीळ अशा या खंडांचे डिजिटलायझेशनच्या रूपाने जतन झालेले नाही. याबाबत क्रीडासंघटक प्रा. श्रीपाल जर्दे यांनी शासनाच्या विविध विभागांकडे पत्रव्यवहारसुद्धा केला होता. मात्र, अद्यापही याबाबत काहीच हालचाल झाल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे हे दुर्मीळ खंड दुर्लक्षित राहिले आहेत.
डिजिटलायझेशन गरजेचे
या खंडांबरोबर ‘मल्लविद्याशास्त्र’ हे केवळ मल्लखांबावरील खंड दत्तात्रय चिंतामण (करंदीकर) मुजुमदार यांचे सासरे व मिरज संस्थानपती सर गंगाधर गणेश पटवर्धन यांनी दि. १४ मे १९२६ रोजी लिहून प्रकाशित केले आहेत.
या दोन दुर्मीळ खंडांत धोबीपछाड, कलाजंग, मोळीची बाहेरली प्रकार, गळखोड्याची, मुट्याची बाहेरली टांग, मुट्टा, उलटापालट, दुहेरी पट, बकरमोड, नकीकस, एकेरी पट, कात्री, उलटाखप्या, मच्छी गोता, आदींची माहिती दिली आहे. याचेही डिजिटलायझेशन करणे गरजेचे आहे.
खंड असे
पहिला खंड - मुलांचे देशी-विदेशी खेळ व व्यायामाचा इतिहास
दुसरा खंड - विदेशी मैदानी खेळ- क्रिकेट, फुटबॉल, वगैरै
तिसरा खंड - देशी अंगमेहनतींचे प्रकार- दंड, बैठका, नमस्कार, वगैरे
चौथा खंड - विदेशी मेहनतीचे प्रकार - डंबेल्स, बारबेल्स, वगैरे
पाचवा खंड - देशी कसरतींचे प्रकार- मल्लखांब,
सहावा खंड - विदेशी कसरतींचे प्रकार- डबल बार, सिंगल बार, वगैरे
सातवा खंड - देशी मर्दानी खेळ - फरीगदका, कुस्ती वगैरे
आठवा खंड - विदेशी मर्दानी खेळ - बॉक्सिंग, फेन्सिंग
नववा खंड - शर्यती देशी व विदेशी- अ‍ॅथलेटिक्स, हाय जम्प, लाँगजम्प, वगैरे
दहावा खंड - आहार, अ‍ॅनॉटमी, फिजिओलॉजी, हायजीन, फर्स्ट एड, सॅनिटेशन, लंघन चिकित्सा, आदी.
महाराष्ट्र राज्य साहित्य मंडळाकडे १ जून २०१६ रोजी हे दुर्मीळ खंड डिजिटलायझेशन करण्याविषयी पत्रव्यवहार केला. मात्र, त्याला प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाशीही पत्रव्यवहार केला. त्यांनीही आमच्या कक्षेत ही बाब येत नसल्याचे कळविले. त्यानंतर राज्य मराठी संस्कृती विकास मंडळाकडे पत्रव्यवहार केला. त्यांनी डिजिटलायझेशन करता येईल असे उत्तर दिले. सुरुवातही केल्याचे सांगितले.
- प्रा. श्रीपाल जर्दे, क्रीडा संघटक,

Web Title: Ignore Government's 'Exercise Knowledge' volumes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.