शास्त्रीनगराकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष
By Admin | Updated: January 14, 2015 00:31 IST2015-01-13T23:31:21+5:302015-01-14T00:31:05+5:30
नागरिकांचा आक्षेप : जवाहरनगर, सुधाकरनगर, वाय. पी. पोवारनगर, जमादार कॉलनी परिसरात विकासकामे

शास्त्रीनगराकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष
शास्त्रीनगर व जवाहरनगर प्रभाग म्हणजे उच्चभ्रू, मध्यमवर्गीय व कष्टकरी समाजातील नागरिकांची वस्ती होय. या प्रभागाचे नेतृत्व माजी महापौर जयश्री सोनवणे करत आहेत. त्यांनी प्रभागातील जवाहरनगर, सुधाकरनगर, वाय. पी. पोवारनगर, जमादार कॉलनी परिसरात जोरदार विकासकामे केली आहेत, तर शास्त्रीनगर भागाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याची ओरड येथील नागरिक करत आहेत.
प्रभागातील प्रमुख समस्या म्हणजे रस्ते, अपुरा पाणीपुरवठा, कचरा उठाव याच होत्या. या समस्या नगरसेविका जयश्री सोनवणे यांनी लक्ष घालून कमी केल्या आहेत. तसेच प्रभागात त्यांची वारंवार भेट असल्याने महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून येथील कचरा उठाव, औषध फवारणी, स्वच्छता केली जाते. त्यामुळे नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे. मात्र, शास्त्रीनगर, म्हाडा कॉलनी येथील समस्या न सोडविल्याबद्दल येथील नागरिकांमधून कमालीची नाराजी व्यक्त होत आहे.
जवाहरनगर, सुधाकरनगर, वाय. पी. पोवारनगर, जयंती अपार्टमेंट, जमादार कॉलनी येथील अंतर्गत रस्ते नव्याने करण्यात आले आहेत. येथील नागरिकांची कमी दाबाच्या पाण्याची समस्या होती, ती सोडविण्यात आली. तसेच घंटागाडीद्वारे नियमित कचरा उठाव केला जात आहे. त्यामुळे नागरिकांतून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. येथे ड्रेनेज पाईपलाईन टाकून ड्रेनेजची समस्या सोडविण्यात आली आहे.
जवाहरनगर परिसरात अनेक मुस्लिम बांधव राहतात. या ठिकाणी उर्दू शाळा नसल्याने अनेक मुलांची गैरसोय होत होती. यामुळे या परिसरात सोनवणे यांनी महानगरपालिकेची पहिली उर्दू शाळा सुरू केली. याचा लाभ अनेक मुले घेत आहेत. अशा अनेक प्रमुख समस्या मार्गी लागल्याने येथील नागरिक सोनवणे यांच्या कामाबद्दल समाधान व्यक्त करत आहेत. मात्र, जमादार कॉलनी येथे सांडपाण्यासाठी बंदिस्त अशी गटार करावी, अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे.
शास्त्रीनगर, म्हाडा कॉलनी येथे मात्र सोनवणे यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याची ओरड येथील नागरिकांमधून होत आहे. या परिसरातील अंतर्गत रस्ते, कमी दाबाचे पाणी, ड्रेनेज पाईपलाईन, गटारीचे नियोजन नसल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. शास्त्रीनगर येथे ड्रेनेज पाईपलाईनसाठी रस्त्यांची खुदाई केली होती. या पाईपलाईनचे काम पूर्ण झाल्याने या मार्गावर रस्ता करण्यासाठी प्रशासनाकडे वारंवार मागणी करूनसुद्धा कोणी दखल घेत नाही, अशी तीव्र प्रतिक्रीया नागरिकांतून व्यक्त होत आहे. यामुळे परिसरात धुळीचे साम्राज्य पसरल्याने त्याचा नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. तसेच वाहनधारकांची गैरसोय होत आहे.
ड्रेनेजच्या पाण्याची समस्या
या परिसरातील कॉलन्यांतील अंतर्गत ड्रेनेजचे नियोजन न केल्याने ड्रेनेजच्या पाण्याची समस्या खूप मोठी डोकेदुखी बनली आहे. याठिकाणी कमी दाबाचे पाणी आहे. याबाबत वारंवार महानगरपालिका, नगरसेविकांकडे तक्रार करूनसुद्धा त्यांनी या समस्या सोडविण्यासाठी कोणतीच दखल घेतली नसल्याने नागरिक कमालीचा संताप व्यक्त करत आहेत. यावरून या प्रभागातील नगरसेविका जयश्री सोनवणे यांनी एका भागात विकासकामे ओढून आणली आहेत, तर एका भागात काहीच विकासकामे केली नसल्याचे दिसून येते.
प्रभागात आतापर्यंत १.२५ कोटींची विकासकामे केली आहेत. यामध्ये प्रामुख्याने जवाहरनगर, वाय. पी. पोवारनगर येथील ड्रेनेजचा प्रश्न मार्गी लावला आहे. तसेच या प्रभागातील अंतर्गत रस्ते पूर्ण झाले आहेत. पाण्याचा प्रश्न सुटला आहे. शास्त्रीनगर येथील विकासकामांसाठी महानगरपालिकेकडून पुरेसा निधी मिळाला नसल्याने तेथील कामे प्रलंबित आहेत. निधी आल्यानंतर ते प्रश्न सोडविले जातील. तसेच वाय. पी. पोवारनगर ते जवाहर चौकातील रस्ता नगरोत्थानमधून पूर्ण केला आहे.
- जयश्री सोनवणे, नगरसेविका.
प्रभाग क्र. ५४ शास्त्रीनगर, जवाहरनगर
प्रदीप शिंदे