सर्वाधिक रुग्णांना उपचार देणारे 'आयजीएम'च आजारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:24 IST2021-05-07T04:24:15+5:302021-05-07T04:24:15+5:30

गंभीर घटना घडल्यानंतरच शासनाचे डोळे उघडणार का? अतुल आंबी लोकमत न्यूज नेटवर्क इचलकरंजी : येथील इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयाची ...

IGM is the only patient who treats most patients | सर्वाधिक रुग्णांना उपचार देणारे 'आयजीएम'च आजारी

सर्वाधिक रुग्णांना उपचार देणारे 'आयजीएम'च आजारी

गंभीर घटना घडल्यानंतरच शासनाचे डोळे उघडणार का?

अतुल आंबी

लोकमत न्यूज नेटवर्क

इचलकरंजी : येथील इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयाची अवस्था दयनीय बनली आहे. कोरोना काळात सर्वाधिक रुग्णांना उपचार देणारे हे हॉस्पिटल सध्या आजारी असल्याचा अहवाल तपासणी पथकाने जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केला. वारंवार पाठपुरावा करूनही शासनाने रुग्णालयाला तुटपुंजी मदत करण्याऐवजी ठोस काहीच केले नाही. त्यामुळे एखादी गंभीर घटना घडण्याची शासन वाट पाहत आहे का, असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे.

आयजीएम रुग्णालय नगरपालिकेकडून पूर्ण क्षमतेने चालविणे अशक्य बनल्याने तत्कालीन आमदार सुरेश हाळवणकर यांनी हे रुग्णालय शासनाच्या ताब्यात दिले. शासनाने ताबा घेऊन पाच वर्षे उलटली तरी रुग्णालयातील सुधारणा मात्र कासवगतीने सुरू आहे. वारंवारच्या पाठपुराव्यानंतर किरकोळ निधी देण्यात आला. त्यामध्ये हॉस्पिटलचा एखादा भाग दुरुस्त झाला आहे. परंतु, अन्य ठिकाणी गंभीर परिस्थिती आहे.

इमारतीच्या इलेक्ट्रिकल ऑडिटमध्ये अनेक ठिकाणी वायर धोकादायकरीत्या लोंबकळत व अधांतरी जोडकाम केलेल्या आढळल्या. अनेक फ्यूज बॉक्स उघडे आहेत. मिळालेल्या निधीतून तात्पुरती दुरुस्ती करण्यात आली असली तरी परिस्थिती धोकादायक स्थितीत आहे. इमारतीच्या स्ट्रक्चरल ऑडिटमध्येही त्रुटी आढळल्या आहेत. भिंतीला तडे जाणे, शौचालय, बाथरूमच्या पाईप खराब झाल्या आहेत. त्यातून ड्रेनेजचे पाणी परिसरातच पसरते. दुर्गंधीसह डासांचा प्रादुर्भाव व साथीच्या रोगांना निमंत्रण मिळते.

पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी यासाठी अनेक सामाजिक संस्थांनी पाणी फिल्टर मशीन दिले आहे, तेथेही अस्वच्छता आहे. रुग्णालयाकडे स्वच्छतेसाठी आवश्यक कर्मचारी शासनाने दिले नाहीत. टेक्निशियन, वैद्यकीय अधिकारी यांचीही कमतरता आहे. त्यातच क्षमतेपेक्षा अधिक रुग्ण दाखल असल्याने सध्या कार्यरत असणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कामाचा मोठा ताण आला आहे. त्यामुळे दाखल रुग्णांच्या उपचारावरही त्याचा विपरीत परिणाम होत आहे.

रुग्णालयातील शिल्लक बेडचा वापर केल्यास आणखी ५० बेड ताबडतोब सुरू होतील. परंतु, आवश्यक कर्मचारी नसल्याने बेड धूळ खात पडून आहेत. जिल्ह्यात आरोग्य राज्यमंत्र्यांसह तीन मंत्री असतानाही उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा असणाऱ्या आयजीएम रुग्णालयाची अशी दुरवस्था झाली आहे. सर्व मंत्री, अधिकारी, आमदार, खासदार यांनी अनेकवेळा या रुग्णालयात बैठका घेतल्या, पाहणी केली. सूचना दिल्या. परंतु, कार्यवाही आजतागायत झाली नाही. या प्रकारातून एखादी गंभीर घटना घडल्यास त्याला जबाबदार कोण, असा सवाल उपस्थित होत आहे.

चौकटी

रुग्णालयाची क्षमता; स्टाफची स्थिती

आयजीएम रुग्णालय २०० बेड क्षमतेचे असून, तेथे ४० ते ६० अतिरिक्त रुग्ण दाखल आहेत. याउलट २०० बेडसाठी १५ वैद्यकीय अधिकारी आवश्यक असताना तीनच उपलब्ध आहेत. नर्स व इतर स्टाफची स्थितीही अशीच आहे, तर वर्ग ४ चे कर्मचारी नसल्याने तात्पुरते ठेका पद्धतीने घेण्यात आले आहेत.

आगीसाठी फवारा व सायरन आवश्यक

फायर ऑडिटचे संपूर्ण निकष पूर्ण करण्यासाठी पूर्ण रुग्णालयात पाण्याचा फवारा सिस्टीम तसेच सायरन सिस्टीम बसविणे गरजेचे आहे. त्यासाठी आवश्यक निधी मिळाला नसल्याने तात्पुरते आग लागल्यानंतर विझविण्यासाठीचे बंब ठिकठिकाणी बसविण्यात आले आहेत.

प्रतिक्रिया

निधी उपलब्ध होईल त्यानुसार दुरुस्तीचे काम सुरू आहे. फायर, इलेक्ट्रिकल, आवश्यक डागडुजी ही सर्व कामे उपलब्ध झालेल्या निधीतून केली आहेत. शंभर टक्के काम झाले नसले तरी सध्या काम चालेल, अशी कामे पूर्ण झाली आहेत.

रवींद्रकुमार शेट्ये, वैद्यकीय अधीक्षक-आयजीएम रुग्णालय

फोटो ओळी

०६०५२०२१-आयसीएच-०१

आयजीएम रुग्णालयातील अडगळीच्या खोलीत बेड व गाद्या धूळ खात पडून आहेत.

०६०५२०२१-आयसीएच-०२

०६०५२०२१-आयसीएच-०३

०६०५२०२१-आयसीएच-०४

रुग्णालयाच्या पाईपलाईन खराब झाल्यामुळे दुर्गंधीयुक्त पाणी परिसरात साचत आहे.

०६०५२०२१-आयसीएच-०५

०६०५२०२१-आयसीएच-०६

०६०५२०२१-आयसीएच-०७

रुग्णालयातील इलेक्ट्रिकलचे बोर्ड व वायर उघड्या व धोकादायक स्थितीत आहेत.

०६०५२०२१-आयसीएच-०८

बेडच्या प्रतीक्षेत खुर्चीवरच ऑक्सिजन लावून थांबलेला रुग्ण.

०६०५२०२१-आयसीएच-०९

पिण्याच्या पाण्याच्या शुद्धिकरण मशीनजवळ सर्वत्र घाणीचे साम्राज्य.

०६०५२०२१-आयसीएच-१०

रुग्णालयातील कोरोनाबाधित रुग्णांच्या वॉर्डातील शौचालय, बेसिन, बाथरूमची स्वच्छता नाही.

सर्व छाया - उत्तम पाटील

Web Title: IGM is the only patient who treats most patients

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.