प्रामाणिकपणे कष्ट केल्यास यश नक्कीच
By Admin | Updated: September 7, 2014 23:18 IST2014-09-07T23:04:46+5:302014-09-07T23:18:37+5:30
अजित टिके : शिवाजी विद्यापीठ सेवापूर्व मार्गदर्शन केंद्राचे उद्घाटन

प्रामाणिकपणे कष्ट केल्यास यश नक्कीच
कोल्हापूर : स्पर्धा परीक्षेची तयारी करताना जोपर्यंत यश मिळत नाही, तोपर्यंत आपल्या मित्रांचे तसेच नातेवाइकांकडूनही नाऊमेद करण्याचे प्रयत्न सुरू असतात; पण त्याकडे दुर्लक्ष करून प्रामाणिकपणे कष्ट करीत राहिल्यास यश निश्चितपणे मिळते, असा आत्मविश्वास पोलीस उपअधीक्षक अजित टिके यांनी व्यक्त केला.
शिवाजी विद्यापीठाच्या सेवा-पूर्व मार्गदर्शन केंद्रातील २०१४-१५ सालच्या प्रशिक्षण वर्गाच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. एन. जे. पवार उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला टिके यांच्या हस्ते पिंपळ वृक्षास पाणी घालून उद्घाटन करण्यात आले.
अजित टिके म्हणाले, खडतर कौटुंबिक परिस्थितीतूनही जिद्दीच्या बळावर निश्चित केलेले ध्येय साध्य करता येते. फक्त कष्ट करण्याची जिद्द बाळगा. आयुष्यात प्रत्येकाला यश मिळते; मात्र प्रत्येकाने त्यासाठी संयम ठेवला पाहिजे. स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक पूर्वतयारीविषयीही त्यांनी तपशीलवार मार्गदर्शन केले.
पुण्यातील युनिक अकॅडमीचे संचालक तुकाराम जाधव म्हणाले, भीती नष्ट होण्यासाठी, कौशल्ये वाढविण्यासाठी तयारी करणे तसेच इतिहासापासून आजपर्यंतच्या घडामोडींचे वाचन, दर्जेदार लिखाण, मराठी भाषिक वाचन आणि आकलन महत्त्वाचे आहे. आकलनाची कसोटी वाढविण्यासाठी प्रयत्न करीत असताना प्रशासक म्हणून उत्तरे लिहिणे अपेक्षित असल्याचेही सांगितले. तसेच निर्णय क्षमतेसाठी राजकीय, प्रशासकीय वरिष्ठ अधिकारी आणि समाज यामध्ये मेळ घालणे अपेक्षित असून, पूर्वग्रह बाजूला ठेवून तटस्थता, जात-धर्म-पंथ असे भेद सोडून समन्यायी पद्धतीने वागण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली.
कुलगुरू डॉ. एन. जे. पवार यांनी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या या केंद्राचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले. यावेळी प्र-कुलगुरू डॉ. अशोक भोईटे, केंद्राचे समन्वयक डॉ. जगन कराडे आणि विद्यार्थी उपस्थित होते. केंद्राचे समन्वयक डॉ. जगन कराडे यांनी प्रास्ताविक व स्वागत केले. विजयकुमार नागदिवे, शामल म्हाकवे यांनी सूत्रसंचालन केले, तर सचिन कदम यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)