मंदिराला हात लावाल तर जनक्षोभ
By Admin | Updated: November 25, 2015 00:45 IST2015-11-24T23:33:10+5:302015-11-25T00:45:46+5:30
हिंदुत्ववादी संघटनांचा इशारा : घाईगडबडीत कारवाई नको

मंदिराला हात लावाल तर जनक्षोभ
कोल्हापूर : महापालिकेने तयार केलेली अनधिकृत मंदिरांची यादी चुकीची आहे. त्यामुळे एकाही मंदिराला प्रशासनाने हात लावला तर जनक्षोभ उसळेल, असा इशारा हिंदुत्ववादी संघटनांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन दिला.
भाजप महानगर जिल्हाध्यक्ष महेश जाधव म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशात कुठेही अनधिकृत मंदिरे पाडा, असे म्हटलेले नाही. शहरातील अनेक अनधिकृत बांधकामांकडे दुर्लक्ष करून केवळ मंदिरांना अनधिकृत ठरविणे चुकीचे आहे. सर्वच मंदिरे नियमित करावीत, ही मागणी आम्ही मुख्यमंत्र्यांकडे करणार आहे. त्यामुळे प्रशासनाने घाईगडबडीत मंदिर पाडण्याची कारवाई करू नये. अन्य धर्मीयांची बेकायदेशीर धार्मिकस्थळे हटवावी म्हणून यापूर्वी आम्ही आंदोलने केली. त्याची दखल प्रशासनाने घेतली नाही.
दीपक मगदूम म्हणाले, एका रात्रीत मंदिरे अनधिकृत ठरवणे पूर्णत: चुकीचे आहे. अधिकाऱ्यांनी सर्व्हे चुकीचा केला आहे. नोटिसा दिलेली अनेक मंदिरे दहा वर्षांहून अधिक काळ जुनी आहेत. त्यामुळे घाईगडबडीत मंदिरांसंबंधी निर्णय घेऊ नये.
शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पवार म्हणाले, मंदिराचा प्रश्न कायदा आणि व्यवहार यांची सांगड घालून हाताळावेत. शहरात अनेक ठिकाणी बेकायदेशीर बांधकामे आहेत. पार्किंगसाठीच्या जागा बळकावल्या आहेत. त्याकडे आधी महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे.
भाजपचे जिल्हा चिटणीस अशोक देसाई , विश्व हिंदू परिषदेचे ज्ञानदेव पुंगावकर, हिंदू एकताचे महेश इंगवले, हिंदू युवा प्रतिष्ठानचे
महादेव कुकडे, आदी उपस्थित होते.
( प्रतिनिधी )
हिंदुत्वादी
कार्यकर्ता म्हणून...
मंदिरासंबंधी आपण मांडलेली भूमिका शासन म्हणून मांडली आहे का, अशी विचारणा जाधव यांच्याकडे केली. त्यावेळी त्यांनी ठाम नकार दिला. हिंदुत्ववादी कार्यकर्ता म्हणून माझे हे मत मांडल्याचेही त्यांनी सांगितले.