दारू पिल्यास पाच दिवस हाती झाडू !
By Admin | Updated: December 18, 2014 00:10 IST2014-12-18T00:08:45+5:302014-12-18T00:10:36+5:30
झाडलोटीची शिक्षा : काटेकोर अंमलबजावणीने वसाहत झाली दारूमुक्त

दारू पिल्यास पाच दिवस हाती झाडू !
भीमगोंडा देसाई -कोल्हापूर --कोणालाही व्यसनाच्या विळख्यातून बाहेर काढणे सोपे नसते. मात्र, ते शिवधनुष्य उचगाव येथील फासेपारधी समाजातील पंचांसह ज्येष्ठ मंडळींनी उचलले आणि यशस्वीरीत्या पेलून समाजाला परिवर्तनाच्या वाटेवर आणून सोडले. २००९-१० मध्ये स्वच्छता मोहीम तर सुरू झाली होती. तिचे यश पाहून वसाहतीत दारू, गुटखा आणि जुगारबंदीचा निर्णय घेण्यात आला. दारू पिऊन येणाऱ्यास पाच दिवस वसाहतीत स्वच्छता करण्याची अनोखी शिक्षा ठरविण्यात आली. तिचा अंमल सुरू झाला. आज ही वसाहत दारूमुक्त बनली आहे
हा निर्णय घेण्यामागे तशी पार्श्वभूमीही होती. फासेपारधी कुटुंबाची मिळकत जेमतेम. मोलमजुरी करून मिळविलेले पैसे व्यसनात घालायचे. पैशांसाठी पत्नीला मारझोड करायचे. प्रसंगी पत्नीच्या गळ्यातील मंगळसूत्र विकायचे आणि दारू ढोसायची, असा दिनक्रम अनेक कुटुंबांचा होता. महिलांसह लहान मुलेही मोठ्या प्रमाणात व्यसनाच्या आहारी जाऊ लागली होती. व्यसनासाठी पैसे मिळविण्याकरिता वाट्टेल ते करण्याची प्रवृत्ती बळावली होती. भांडण-तंटे रोजचे बनले होते. सामाजिक स्वास्थ्य बिघडू लागले होते. ‘दारुड्यांची वसाहत’ अशी ओळख या वसाहतीची बनली होती. त्यामुळेच दारू, जुगार, गुटखाबंदीचा निर्णय घेण्यात आला आणि त्याची काटेकोर अंमलबजावणी करण्यात आली. परिणामी वसाहत दारूमुक्त आणि तंटामुक्त बनली आहे. नियोजनबद्ध विकासाच्या दिशेने वसाहतीची वाटचाल सुरू झाली आहे. (क्रमश:)
अशी झाली दारूबंदी...-परिवर्तनाच्या वाटेवर
पारधी समाज
दारूबंदीसाठी प्रभावी प्रबोधनातून मनपरिवर्तन केले.
दारू पिऊन आलेल्यास पाच दिवसांची स्वच्छता करण्याच्या शिक्षेची काटेकोर अंमलबजावणी केली.
पहिल्यांदा महिन्याला चार ते पाचजण दारू पिऊन ोणारे मिळत होते. स्वच्छतेची शिक्षा भोगल्यानंतर ते पुन्हा दारू न पिण्याचा निर्धार करीत.
अलीकडे अपवादात्मक असा एखादा दारू पिऊन आलेला असतो. वसाहतच दारू, जुगार, गुटखामुक्त झाल्यामुळे कुटुंबांचा आर्थिक स्तरही उंचावत आहे. भांडण, तंटेही बंद झाले आहेत.
न
वसाहत दारू, गुटखामुक्त झाली आहे. भांडण-तंटे नसल्यामुळे सामाजिक स्वास्थ्य चांगले राहत आहे. व्यसनावर होणारे पैसे वाचल्यामुळे कुटुंबांची आर्थिक उन्नती होत आहे. रोज सायंकाळी आम्ही ज्येष्ठ मंडळी एकत्र येऊन समाजाच्या प्रगतीची चर्चा करतो.
- मल्लू बाबू चव्हाण, रहिवासी
दारूच्या पैशांतून दिवाळी..
वर्षापूर्वी रोज दारू पिण्यावरच्या खर्चात बचत करून वीस रुपयांप्रमाणे संकलित केले. एका वर्षात तब्बल चार लाख रुपये गोळा झाले. हे पैसे दिवाळीच्या तोंडावर संबंधित कुटुंबांना एकाचवेळी पोलीस अधिकाऱ्यांच्या हस्ते जाहीर कार्यक्रमात वाटप करण्यात आले. एकेका कुटुंबाला कमीत कमी हजार रुपयांपेक्षा अधिक पैसे मिळाल्यामुळे दिवाळी आनंदात साजरी केली. दारूवर पैसे किती खर्च होत होते, याचीही जाणीव झाली.