वीज नाही तर आम्हाला फास द्या

By Admin | Updated: March 16, 2016 08:36 IST2016-03-16T08:35:28+5:302016-03-16T08:36:05+5:30

शिवसेनेचे आंदोलन : मुख्य अभियंता धारेवर; कनेक्शन न दिल्यास आकडा टाकणार

If you do not have electricity, give us a trap | वीज नाही तर आम्हाला फास द्या

वीज नाही तर आम्हाला फास द्या

कोल्हापूर : वीज नाही तर गळफासासाठी दोरी (फास) द्या, असे म्हणत शिवसेनेने येथील ताराबाई पार्कातील वीज वितरण कंपनीच्या कार्यालयासमोर जोरदार निदर्शने केली. अर्ज करूनही वेळेत विजेचे कनेक्शन न दिल्यास शेतकरी आकडा टाकून वीज घेतील, अशा इशारा देत विविध मागण्यांसंबंधी मुख्य अभियंता शंकर शिंदे यांना धारेवर धरून निवेदन दिले.
निवेदनात म्हटले आहे की, पाऊस कमी झाल्याने भूजल पातळी घटली आहे. परिणामी विंधन विहिरींची पाणी पातळी खालावली आहे. पाणी असलेल्या ठिकाणी ते उपसण्यासाठी नियमित वीज मिळत नाही. मागणी करूनही अनेक वर्षांपासून वीज कंपनीने संबंधित शेतकऱ्यांना नियमानुसार वीज कनेक्शन दिलेले नाही.
काँग्रेस, राष्ट्रवादीच्या काही पुढाऱ्यांच्या मर्जीतील ठेकेदारांना नवीन खांब व ट्रान्स्फॉर्मर बसविण्याचे काम दिले आहे. मात्र, ते ठेकेदार निकृष्ट दर्जाचे काम करीत आहेत. तांत्रिक कारणे पुढे करीत वेळेत काम न केल्याने गरजू शेतकऱ्यांपर्यंत वीज पोहोचलेली नाही. त्यामुळे निकृष्ट आणि कामात दिरंगाई केलेल्या ठेकेदारांवर फौजदारी गुन्हा दाखल करावा. वेळेत वीज कनेक्शन न दिल्याने पिकांच्या झालेल्या नुकसानीची भरपाई द्यावी, पंधरा दिवसांत नवीन वीज कनेक्शन शेतकऱ्यांना द्यावे. जप्त केलेले विद्युत पंप परत करावेत, दंडात्मक कारवाई मागे घ्यावी.
निवेदन घेतल्यानंतर शिंदे म्हणाले, वेळेत काम न केलेल्या ठेकेदारांना काळ्या यादीमध्ये टाकले आहे. दुसऱ्या ठेकेदारास काम दिले आहे. जप्त केलेले विद्युत पंप परत करण्याची सूचना दिली जाईल. सर्वच मागण्यांचे निवेदन वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवू.
जिल्हाप्रमुख संजय पवार म्हणाले, वीज कनेक्शन न दिल्याने पिके वाळली म्हणून जर शेतकऱ्यांनी आत्महत्या केली, तर त्यास वीज कंपनीचे अधिकारी जबाबदार असतील. अशी घटना घडल्यास वीज कंपनीचे कार्यालय शिवसेना फोडेल. यावेळी शहरप्रमुख दुर्गेश लिंग्रज, शहरप्रमुख शिवाजी जाधव, दिलीप जाधव, भगवान कदम, युवराज पाटील, शुभांगी साळोखे, सुजित चव्हाण, आदी उपस्थित होते.

टेबलावर फाससाठीची दोरी..
निवेदन देण्यासाठी आंदोलकांचे शिष्टमंडळ शिंदे यांच्या कक्षात गेले. त्यावेळी फास लावून आत्महत्या करण्यासाठी वापरण्यात येणारी दोरी काही शेतकऱ्यांनी प्रातिनिधिक स्वरूपात आणली होती. ती दोरी शिंदे यांच्या टेबलवर ठेवली. वीज नाही दिली तर या दोरीनेच गळफास घेऊ, असा इशाराही यावेळी उपस्थित शेतकऱ्यांनी दिला.

Web Title: If you do not have electricity, give us a trap

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.