जिल्हा बँकेने सहकार्य केल्यास ‘दौलत’ चालवायला घेऊ

By Admin | Updated: July 10, 2015 00:08 IST2015-07-10T00:08:50+5:302015-07-10T00:08:50+5:30

जयंत पाटील यांचे आश्वासन : चंदगड येथे राष्ट्रवादीतर्फे कार्यकर्ता बैठक

If you cooperate with the district bank, then 'Daulat' will be run | जिल्हा बँकेने सहकार्य केल्यास ‘दौलत’ चालवायला घेऊ

जिल्हा बँकेने सहकार्य केल्यास ‘दौलत’ चालवायला घेऊ

चंदगड : चंदगड तालुक्यातील शेतकऱ्यांची अवस्था दौलत बंद झाल्याने दयनीय झाली आहे. शेतकऱ्यांची असलेली दौलत शेतकऱ्यांच्याच मालकीची राहावी, यासाठी पूर्वी आमच्या उद्योग समूहाद्वारे चालवायला घेण्याची तयारी होती; पण काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्यामुळे आम्ही माघार घेतली; पण शेतकऱ्यांच्या मागणीनुसार जिल्हा बँकेने सहकार्य करण्याची हमी दिली, तरच दौलत चालवायला घेऊ, असे आश्वासन माजी मंत्री जयंत पाटील यांनी दिले.
चंदगड येथे राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या कार्यकर्ते व शेतकऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी तालुकाध्यक्ष एम. जे. पाटील होते.
पाटील म्हणाले, दौलत बंद पडल्याने व एव्हीएच उभा राहिल्याने तालुकावासीय अडचणीत आले आहेत. राष्ट्रवादी पक्षाने ‘एव्हीएच’च्या विरोधात पहिल्यापासून भूमिका घेतली आहे. ती आजही कायम असून, येथील जनतेबरोबर आपण व आपला पक्ष असल्याचे सांगितले.
ते म्हणाले की, विरोधी बाकावर असताना मुख्यमंत्री फडणवीस आणि कंपनी कापसाला सहा हजार व उसाला तीन हजार रुपये दर मागत होते; पण हेच महाशय सत्तेत आल्यानंतर कापसाला ३८०० रुपये दर झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने तर साखर उद्योगाची अवस्था दयनीय केली आहे. विदर्भ, मराठवाडा येथील शेतकऱ्यांच्या आत्महत्या सुरूच आहेत. त्याप्रमाणे उसाला कमी दर मिळाल्यास शेतकरी ऊसपीक घेणेच बंद करतील. त्यामुळे साखर उद्योगाबाबत अवकळा येऊन बेकारी वाढणार आहे. ज्या जनतेने शिवसेना-भाजपला सत्तेत बसविले, त्यांना या आठ महिन्यांत या सरकारची अनेक रूपे पाहायला मिळत आहेत, असे सांगून हे सरकार विकास करणारे नसून, घोटाळे करणारे असल्याचा टोलाही लगावला.
यावेळी डॉ. नंदिनी बाभूळकर यांनी दौलत सुरू व्हावा व एव्हीएच बंद व्हावा, ही आपली पहिल्यापासून भूमिका असून, त्यासाठी प्रयत्नशील आहे. एव्हीएच हटविणे हे आपले ध्येय आहे. एव्हीएचची लढाई अंतिम टप्प्यात आली असून, जनतेच्या पाठबळावरच एव्हीएच हटविणारच असल्याचे सांगितले.
यावेळी विष्णू गावडे, बसवंत अडकूरकर, एम. जे. पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले. बाबूराव हळदणकर, शिवाजी तुपारे, पंचायत समिती सदस्य कल्लाप्पा नाईक, गोपाळ ओऊळकर, अनुराधा पाटील, दयानंद काणेकर, अरुण पिळणकर, श्रीशैल नागराळ, उदय जोशी, बी. डी. पाटील, सिकंदर नाईक, विलास पाटील, आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते. रामराजे कुपेकर यांनी प्रास्ताविक करून तालुक्यातील ‘दौलत’ व ‘एव्हीएच’च्या परिस्थितीची माहिती कथन केली.
दरम्यान, माजी मंत्री जयंत पाटील यांनी हलकर्णी येथील दौलत कार्यस्थळाला भेट देऊन कारखान्याची पाहणी केली. यावेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष एम. जे. पाटील यांच्या हस्ते पाटील यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. (प्रतिनिधी)

Web Title: If you cooperate with the district bank, then 'Daulat' will be run

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.