कर्मचाऱ्यांचे काम असमाधानकारक, तर त्यांना मेमो का नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:18 IST2021-06-01T04:18:40+5:302021-06-01T04:18:40+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : असमाधानकारक काम म्हणून कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या, तर त्याबाबत त्यांना एखादा मेमो तरी दिला का? ...

If the work of the employees is unsatisfactory, then why don't they have a memo | कर्मचाऱ्यांचे काम असमाधानकारक, तर त्यांना मेमो का नाही

कर्मचाऱ्यांचे काम असमाधानकारक, तर त्यांना मेमो का नाही

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : असमाधानकारक काम म्हणून कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या, तर त्याबाबत त्यांना एखादा मेमो तरी दिला का? असा सवाल ‘गोकुळ’च्या सोमवारी झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत विरोधी संचालकांनी केला. रोजंदारी कर्मचारी कमी करणे, कर्मचारी गणवेश टेंडर रद्द करणे आदी विषयांवर चर्चा झाली.

‘गोकुळ’मधील सत्तांतरानंतर नूतन संचालक मंडळाची पहिलीच सभा संघाचे अध्यक्ष विश्वास पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली. गेल्या पंधरा-वीस दिवसांत माजी संचालकांशी संबंधित कर्मचाऱ्यांच्या बदल्या सुरू असल्याने विरोधी गटात काहीसी अस्वस्थता आहे. त्याचे पडसाद संचालक मंडळाच्या सभेत उमटणार, हे निश्चित होते. विषय पत्रिकेवरील विषय संपल्यानंतर आयत्यावेळी कर्मचारी बदल्यांचा विषय विरोधकांनी काढला. हा विषय संचालक मंडळातील नाही, प्रशासकीय असल्याचे अध्यक्ष विश्वास पाटील यांनी सांगितले. माजी संचालकांच्या कर्मचाऱ्यांवरच अन्याय का? बदली पत्रात काम असमाधानकारक असा उल्लेख आहे, तर त्याबद्दल एखादा मेमो तरी त्यांना दिला का? असेही विरोधकांनी निदर्शनास आणून दिले. रोजंदारी म्हणून काम करणाऱ्या १८८ कर्मचाऱ्यांना घरी पाठवल्याचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर त्यांना काम काय लावायचे? असा प्रतिप्रश्न अध्यक्ष पाटील यांनी केला.

गणवेशाची फेरनिविदा काढणार

पूर्वीच्या संचालक मंडळाने कर्मचारी गणवेशाची एका कंपनीला ऑर्डर दिली होती. ती बदलून दुसऱ्या कंपनीला दिल्याने विरोधी संचालकांनी त्यावर हरकत घेतली. संचालक मंडळात चर्चा न करता ठराव बदलणे योग्य नसल्याचे सांगितले. त्यानंतर फेरनिविदा काढण्याचा निर्णय झाला.

राजकीय आकसातून स्वयंसेविकांवर कारवाई नको

गेली अकरा-बारा वर्षे दूध उत्पादकांना वैरण व दूध उत्पादन वाढीसाठी मार्गदर्शन करणाऱ्या स्वयंसेविकांच्या नेमणुका रद्द करू नका. त्यांचे काम बघा, एक-दोन चुकीच्या स्वयंसेविकांमुळे सर्वांना शिक्षा का देता? राजकीय आकसातून कारवाई नको, अशी मागणी विरोधी संचालकांनी केली.

दूध वाहतूक टेंपो ठेक्याची मुदत वाढली

विविध गावांतून दूध वाहतुकीसाठी सुरू असलेल्या टेंपोच्या मार्गाची मुदत जूनअखेर संपत होती. त्यांना आणखी महिन्याची मुदतवाढ देण्याचा निर्णय संचालकांनी घेतला.

ऑक्सिजन प्रकल्पाबाबत फेरविचार करा

सध्या कोरोनाचा संसर्ग असल्याने ऑक्सिजन प्रकल्पाबाबत सक्ती केली जाते, मात्र साखर कारखान्यांसह इतरांनी उत्पादन केले, तर अडचणी येऊ शकतात. यावर फेरविचार करण्याची सूचना एका संचालकांनी केली.

कोट-

‘गोकुळ’च्या हितापेक्षा कोणाचे व्यक्तीगत हित येथे जोपासले जाणार नाही. संघ व दूध उत्पादकांच्या हिताचे निर्णय आम्ही घेतले आहेत.

- विश्वास पाटील (अध्यक्ष, गोकुळ)

Web Title: If the work of the employees is unsatisfactory, then why don't they have a memo