आबा असते तर ‘म्हैसाळ’चे पाणी आले असते
By Admin | Updated: May 7, 2015 00:34 IST2015-05-07T00:25:16+5:302015-05-07T00:34:09+5:30
दुष्काळी भागातून प्रतिक्रिया : कवठेमहांकाळ तालुक्यात ससेहोलपट

आबा असते तर ‘म्हैसाळ’चे पाणी आले असते
हणमंत देसाई -रांजणी -आज आबा असते, तर म्हैसाळ योजनेचे पाणी आम्हाला मिळाले असते, असे उद्गार कवठेमहांकाळ तालुक्यातील नेहमी दुष्काळग्रस्त म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रांजणी, अग्रण धुळगाव, लोणारवाडी, पिंपळवाडी, अलकूड एस येथील शेतकऱ्यांच्या तोंडून ऐकायला मिळत आहेत.
माजी उपमुख्यमंत्री आर. आर. (आबा) पाटील यांनी या भागातील शेतीला म्हैसाळ योजनेचे पाणी देऊन हा भाग सुजलाम् सुफलाम् करण्याचे स्वप्न पाहिले होते. शेवटच्या क्षणापर्यंत या भागातील म्हैसाळ योजनेचे काम पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले. आज योजनेचे काम पूर्ण झाले, पण पाणी सोडण्यासाठी लागणारी शासकीय व प्रशासकीय ताकद कमी पडू लागल्याचे दिसत आहे.
म्हैसाळ योजनेच्या पाण्यामुळे रांजणी, लोणारवाडी, अग्रण धुळगाव, पिंपळवाडी, अलकूड (एस) या पाच गावांतील जवळपास सोळाशे हेक्टर शेतीचे क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. विधानसभेच्या निवडणुकीवेळी आमदार पाटील यांनी, या भागाचा हा शेवटचाच दुष्काळ, असे सांगितले होते. म्हैसाळ योजनेची कामे ज्या गतीने सुरू होती, ते पाहिल्यानंतर येथील शेतकऱ्यांसह जनतेलाही या पाण्याची मोठी आशा निर्माण झाली होती.
अस्मानी व सुलतानी संकटात येथील शेती व शेतकरी सापडला आहे. ‘राजाने छळलं आणि पावसाने झोडपलं तर दाद कोणाकडे मागायची?’ या म्हणीप्रमाणे येथील जनतेची अवस्था झाली आहे.
निसर्गाची साथ नाही आणि योजना पूर्ण झाली, पण पाणी सोडण्याची राज्यकर्त्यांची इच्छाशक्ती नाही. नांगोळा तलावातून या गावांना पिण्याचे पाणी येते. पण जादा उपशामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर बनू लागला आहे.