खरेदीच झाली नाही तर घोळ होईल कसा?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:17 IST2021-06-20T04:17:23+5:302021-06-20T04:17:23+5:30
कोल्हापूर : जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्यावतीने अॅन्टिजन चाचणी करण्याचे किट्स खरेदी केलेलेच नाहीत. तशी प्रक्रिया पूर्ण राबवली नाही. मग ...

खरेदीच झाली नाही तर घोळ होईल कसा?
कोल्हापूर : जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्यावतीने अॅन्टिजन चाचणी करण्याचे किट्स खरेदी केलेलेच नाहीत. तशी प्रक्रिया पूर्ण राबवली नाही. मग यामध्ये घोळ कसा होईल? अशी विचारणा जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. उषादेवी कुंभार यांनी खुलाशाद्वारे केली आहे. प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी अजयकुमार माने यांनी कुंभार यांच्याकडे मागितेल्या खुलाशामध्ये त्यांनी हा खुलासा केला आहे.
जिल्ह्यात अॅन्टिजेन चाचण्या वाढवण्यासाठी आवश्यक कीट्स खरेदी करण्याची प्रक्रिया सुरू करण्याची तयारी सुरू होती. परंतु ती पूर्ण झाली नाही. रीतसर प्रक्रिया राबवूनच ही खरेदी करण्याचे निश्चित केले असताना. प्रत्यक्षात कोणतीच खरेदी झाली नसताना आपण केलेली खुलाशाची मागणी वस्तुस्थितीला धरून नसल्याचेही कुंभार यांनी या पत्रामध्ये नमूद केले आहे.
जिल्हा क्षयरोग अधिकारी या पदाचा नियमित कार्यभार सांभाळून, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी आणि प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी या दोन्ही पदांचा कार्यभार सांभाळताना गेले सव्वावर्ष कोरोनाच्या काळात अहोरात्र काम करत आहे. अतिवृष्टीच्या काळात सध्या आरोग्य विभागाचे वेगळे नियोजन सुरू आहे. असे असताना आपल्या खुलाशाच्या मागणीमुळे मनस्ताप झाल्याची भावना कुंभार यांनी माने यांना दिलेल्या पत्रामध्ये व्यक्त केली आहे.
चौकट
पुरवठादारांच्या स्पर्धेतून प्रकार
अॅन्टिजन चाचण्यांचे किट्स मोठ्या प्रमाणावर खरेदी केले जाणार असल्याने पुरवठादारांच्या स्पर्धेतून हा सर्व प्रकार झाल्याची चर्चा आता जिल्हा परिषदेत सुरू झाली आहे. यातूनच नेत्यांना फोन, नेत्यांनी अधिकाऱ्यांची कानउघाडणी करणे, नंतर परत वस्तुस्थितीची माहिती मिळाल्यानंतर खुलासा देण्यास सांगणे असे प्रकार झाले असल्याचे सांगण्यात येत असून, यामुळे जिल्हा परिषदेची आणि अधिकाऱ्यांची नाहक बदनामी झाल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.