संयम सुुटला तर संघर्ष
By Admin | Updated: July 18, 2015 00:58 IST2015-07-18T00:58:02+5:302015-07-18T00:58:15+5:30
कार्यकर्त्यांचा इशारा : ... मग जाहीर का करत नाही ?

संयम सुुटला तर संघर्ष
कोल्हापूर : अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोळकर व ज्येष्ठ विचारवंत अॅड. गोविंद पानसरे यांच्या खुन्यांचा शोध लागावा म्हणून आम्ही आतापर्यंत संयम बाळगला. प्रत्येकवेळी तपास सुरू आहे, धागेदोरे सापडलेत, असे सांगितले जाते; परंतु तपास काय लागला, हे जाहीर होत नाही. त्यामुळे आम्ही किती दिवस वाट पाहायची? धागेदोरे सापडलेत तर मग जाहीर का करत नाहीत? असे प्रश्न करत पुरोगामी विचारांच्या कार्यकर्त्यांनी ‘आमचा संयम सुुटला, तर संघर्ष अटळ आहे’, अशा इशारा राज्य सरकार व पोलीस यंत्रणेला शुक्रवारी ‘भाकप’च्या कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत दिला.
डॉ. दाभोळकर व अॅड. पानसरे यांच्या खुनाचा तपास करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना नोकरीवर राहण्याचा आणि दाभोळकरांच्या खुनानंतर कॉँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांचा राजीनामा मागणाऱ्या तत्कालीन विरोधी पक्षांना आता सत्तेत राहण्याचा अधिकार नाही. दाभोळकरांचा खून झाल्यानंतर भाजप नेत्यांनी पृथ्वीराज चव्हाण यांचा राजीनामा मागितला; पण आता गृहमंत्रिपदासह मुख्यमंत्रिपद तुमच्याकडे आहे, तर खुनाची नैतिक जबाबदारी स्वीकारून देवेंद्र फडणवीस यांनीच राजीनामा द्यावा, अशी मागणीही यावेळी केली.
‘भाकप’च्या राज्य कार्यकारिणीचे सदस्य दिलीप पवार म्हणाले की, खुनाचा तपास लागावा, मारेकऱ्यांना अटक व्हावी म्हणून आतापर्यंत शांत राहिलो. तपास यंत्रणेस मदत करत राहिलो. पाच महिन्यांनंतरही आम्हाला तपास सुरू आहे, धागेदोरे लागले आहेत, असे सांगितले जाते; पण हे किती दिवस ऐकायचे? तपासाची नेमकी दिशा स्पष्ट करा. पोलीस यंत्रणा काय करीत आह,े हे एकदा कळू दे. जर आरोपी सापडत नसतील, तर हा तपास लागणार नाही, हे तरी सांगून टाका.
दाभोळकर, पानसरे यांच्या खुनाचा तपास लागत नाही ही अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे. तरीही योग्य पद्धतीने तपास सुरु असल्याचे सांगणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांचा थिल्लरपणा आणि केवळ पुरोगामी विचारांच्या कार्यकर्त्यांची टिंगल करण्यातला प्रकार आहे. पोलीस यंत्रणा निव्वळ नाटक, मखलाशी करत असल्याचा आरोप पवार यांनी केला.
खून झाल्यानंतर पोलिसांनी आरोपींची रेखाचित्रे प्रसिद्ध केली. तीन ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज मिळविले असेल, तर आरोपींपर्यंत पोलिसांनी पोहोचायला काय अडचण आहे. खून झाल्यानंतर मुख्यमंत्री व पोलीस अधीक्षक, जिल्हाधिकारी यांच्यात झालेल्या दूरध्वनीवरील संवादाचे रेकॉर्डिंग करण्यात आले होते का, असा सवालही पवार यांनी उपस्थित केला.
दोन्ही खून हे दहशतवादी कृत्य म्हणून पोलिसांनी जाहीर करावे, अशी मागणी करत, दहशतवादी म्हटले की, त्यांच्या मागे एखादी संघटना असते म्हणूनच या दोन्ही खुनास एक संघटनाच जबाबदार आहेत. जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर दररोज आंदोलन करण्यात येईल.
यावेळी शहीद दाभोळकर, पानसरे विचार मंच, भाकप, माकप, लाल निशाण पक्ष, श्रमिक प्रतिष्ठान, विद्रोही संघटना, जनता दल, अंनिसंचे कार्यकर्ते सुजाता म्हेत्रे, रमेश वडणगेकर, बाळासो कांबळे, सीमा पाटील, अरुण पाटील, एम. बी. पडवळे, एस. बी. पाटील, धनाजीराव जाधव, बाबा यादव, पंडित ढवळे, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)