गरज भासल्यास पंचनाम्यासाठी ड्रोनचा वापर करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:25 IST2021-07-31T04:25:01+5:302021-07-31T04:25:01+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात महापुरामुळे शेतजमिनीसह पिकांचे मोठे नुकसान झाले असून, पूरबाधित क्षेत्रातील नुकसान व खरडून ...

If necessary, use a drone for panchnama | गरज भासल्यास पंचनाम्यासाठी ड्रोनचा वापर करा

गरज भासल्यास पंचनाम्यासाठी ड्रोनचा वापर करा

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात महापुरामुळे शेतजमिनीसह पिकांचे मोठे नुकसान झाले असून, पूरबाधित क्षेत्रातील नुकसान व खरडून गेलेल्या जमिनीचे पंचनामे तातडीने करा. गाळ साचल्यामुळे अथवा पुराच्या पाण्यामुळे प्रत्यक्षात अशा क्षेत्रावर जाणे अडचणीचे असेल तर त्याठिकाणी ड्रोनचा वापर करुन पंचनामे पूर्ण करा, असे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संबंधित यंत्रणेला दिले.

कोल्हापूर जिल्ह्यात महापूर व अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे शुक्रवारी कोल्हापुरात आले होते. शासकीय विश्रामगृहात आयोजित आढावा बैठकीत शासकीय यंत्रणेला सक्त सूचना देऊन पंचनामे तातडीने करण्याचे आदेश त्यांनी दिले. मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, महापुरामुळे झालेली हानी आपण पाहतो, मात्र कोल्हापूरकर भोगताहेत. यातून निश्चितच मार्ग काढण्यात येईल. कोविड, महापूर, वादळे ही संकटे पाठोपाठ येत आहेत, हे जरी खरे असले तरी राज्यातील जनतेला आधार देण्याचे काम आपण करणारच आहोत. नुकसानाच्या पंचनाम्यांचा आढावा घेऊन शासन पूरग्रस्तांना भरीव मदत करेल, अशी ग्वाही मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिली.

ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथकाने यावे. या भीषण परिस्थितीत केंद्राने राज्याला मदत करण्याची गरज असून, त्यासाठी सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी एकत्र यावे. जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी जिल्ह्यातील नुकसानाचा तर महापालिकेच्या आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे यांनी कोल्हापूर शहरातील नुकसानाची सादरीकरणाव्दारे माहिती दिली.

या बैठकीला पालकमंत्री सतेज पाटील, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, उर्वरित वैधानिक विकास महामंडळाचे अध्यक्ष योगेश जाधव, राज्याचे प्रधान सचिव सीताराम कुंटे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल पाटील, खासदार संजय मंडलिक, धैर्यशील माने, आमदार प्रकाश आवाडे, ऋतुराज पाटील, चंद्रकांत जाधव, राजेश पाटील, जयंत आसगावकर, प्रकाश आबिटकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे आदी उपस्थित होते.

फोटो ओळी : अतिवृष्टी व महापुरामुळे झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी शुक्रवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोल्हापुरात आले होते. शासकीय विश्रामगृहात झालेल्या बैठकीत त्यांनी आढावा घेतला. यावेळी आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, प्रधान सचिव सीताराम कुंटे, राजेश क्षीरसागर, योगेश जाधव आदी उपस्थित होते. (फोटो-३००७२०२१-कोल-सीएम प्रेस) (छाया - नसीर अत्तार)

Web Title: If necessary, use a drone for panchnama

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.