लिक्विड गॅस दिल्यास कोल्हापूरला पुरेसा ऑक्सिजन मिळेल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:30 IST2021-04-30T04:30:49+5:302021-04-30T04:30:49+5:30
यड्राव : कोरोना महामारीमध्ये ऑक्सिजन अत्यावश्यक बनले आहे. त्याच्या उपलब्धतेसाठी प्रशासनासह लोकप्रतिनिधी ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पाला भेट देऊन जादा ...

लिक्विड गॅस दिल्यास कोल्हापूरला पुरेसा ऑक्सिजन मिळेल
यड्राव :
कोरोना महामारीमध्ये ऑक्सिजन अत्यावश्यक बनले आहे. त्याच्या उपलब्धतेसाठी प्रशासनासह लोकप्रतिनिधी ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पाला भेट देऊन जादा उत्पादनासाठी आवश्यक त्या उपाययोजनांचे नियोजन करत आहेत. सध्या पुरवठा होणारा लिक्विड गॅस जिल्ह्यातील ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पांना थोड्या फार प्रमाणात जादा उपलब्ध करून दिल्यास जिल्ह्यासाठी पुरेसा ऑक्सिजन निर्मितीसाठी उपयोगी पडेल. यासाठी लोकप्रतिनिधींसह शासन पातळीवर प्रयत्न होणे गरजेचे आहे.
यड्राव येथील महालक्ष्मी ऑक्सिजन गॅसनिर्मिती प्रकल्पाला खासदार धैर्यशील माने, जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्यासह शासकीय अधिकारी व लोकप्रतिनिधींनी भेट देऊन तेथील उत्पादन प्रक्रियेची माहिती घेतली. यावेळी महालक्ष्मी गॅस प्रकल्पांमध्ये ऑक्सिजन निर्मितीसाठी लिक्विड गॅस पुरवठ्याचा करार पुणे येथील कंपनीबरोबर आहे; परंतु तेथील अन्न व औषध प्रशासनाने पुणे जिल्ह्याबाहेर लिक्विड गॅस पाठविण्यास बंदी घातल्याने याठिकाणी ऑक्सिजन निर्मितीवर त्याचा परिणाम झाला आहे. जिल्ह्यामध्ये प्रतिदिन सहा टन ऑक्सिजन निर्मितीचे यड्राव, शिरोली, गोकुळ शिरगाव, कागल, काणेरीवाडी, नागाव याठिकाणी प्रकल्प आहेत; परंतु या प्रकल्पांना बल्लारी-कर्नाटक येथून चार टँकर लिक्विड गॅस पुरवठा होतो. हा पुरवठा जिल्हा प्रशासनाच्या नियंत्रणाखाली होतो. नागावचा प्रकल्प लिक्विड गॅस पुरवठ्याअभावी बंद आहे. इतर प्रकल्पांतून निर्माण क्षमतेपेक्षा कमी ऑक्सिजन तयार होत आहे.
कागलमध्ये तयार होणाऱ्या २५ टन लिक्विड गॅसपैकी ११ टन लिक्विड गॅस गोवा राज्यास होतो व उर्वरित १४ टन सांगली, सातारा, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी पुरवठा होतो. या पुरवठ्यावर केंद्र शासनाचे नियंत्रण आहे.
लोकप्रतिनिधी व शासन पातळीवरून प्रयत्न झाल्यास पुण्याहून व बल्लारीहून येणाऱ्या लिक्विड गॅसचा पुरवठा वाढवून व कागलमध्ये तयार होऊन गोव्यास पुरवठा होणाऱ्या लिक्विड गॅसमध्ये कपात झाल्यास जिल्ह्यातील सहाही ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरू होतील व दररोज ३६ टन ऑक्सिजन निर्मिती जिल्ह्यामध्ये होईल.
कोट - जिल्ह्यामध्ये लिक्विड गॅसचा पुरेसा पुरवठा होत नसल्याने पूर्ण क्षमतेने प्रकल्प चालत नाहीत. पुण्याहून सहा टन, बल्लारीहून २४ टन, गोव्यास पुरवठा होणाऱ्यांपैकी ६ टन आपल्या जिल्ह्यासाठी उपलब्ध झाल्यास सर्व प्रकल्प पूर्ण क्षमतेने कार्यरत राहतील व ऑक्सिजन तुटवडा भासणार नाही.
- अमर तासगावे, व्यवस्थापक महालक्ष्मी गॅस, यड्राव.