अशक्य अटी घातल्यास आघाडीही अशक्य
By Admin | Updated: September 25, 2014 00:31 IST2014-09-24T23:02:19+5:302014-09-25T00:31:32+5:30
मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती : उंडाळकर ज्येष्ठ आमदार

अशक्य अटी घातल्यास आघाडीही अशक्य
कऱ्हाड : ‘काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी कायम राहावी, ही आमचीही अपेक्षा आहे; पण राष्ट्रवादीने काल, मंगळवारी चर्चा करताना काही नवीनच मुद्दे पुढे आणले़ त्यामुळे चर्चा पूर्ण झालेल्या नाहीत़ अशक्य अटी घातल्यावर आघाडीही अशक्यच आहे,’ अशी स्पष्टोक्ती मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली़
कोळे, ता़ कऱ्हाड येथे पत्रकारांशी ते बोलत होते़ यावेळी आमदार आनंदराव पाटील, ज्येष्ठ नेते मदनराव मोहिते, डॉ़ इंद्रजित मोहिते, राजेश पाटील-वाठारकर यांची प्रमुख उपस्थिती होती़
मुख्यमंत्री चव्हाण म्हणाले, ‘आता उमेदवारी अर्ज भरण्यासाठी काही दिवसच उरले आहेत़ त्यामुळे दोन दिवसांत आघाडीबाबतचा आणि जागा वाटपाचा निर्णय अपेक्षित आहे़ आमची १७४ उमेदवारांची पहिली यादी तयार आहे़ तर ११४ जागांची दुसरी संभाव्य यादी तयार ठेवली आहे़ त्यातील पहिली यादी आज किंवा उद्या जाहीर होईल़
आमदार उंडाळकरांच्या उमेदवारीबाबत छेडले असता, मुख्यमंत्री चव्हाण म्हणाले, ‘ते पक्षाचे ज्येष्ठ आमदार आहेत, ते योग्य निर्णय घेतील़’ महायुतीत तणाव सुरू असल्यामुळे तुमच्या आघाडीला विलंब होतोय का ? असे विचारले असता, ‘त्याचा आणि आमचा काही संबंध नाही़ आम्ही आमचा प्रस्ताव राष्ट्रवादीला दिला आहे,’ असे त्यांनी स्पष्ट केले़
सोनिया गांधींच्या सहा सभा
ंंमहाराष्ट्रात काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या सहा सभांचे नियोजन करण्यात येणार आहे़ कोणत्या ठिकाणी अन् किती तारखेला या सभा होणार, हे लवकरच निश्चित होईल, असेही मुख्यमंत्री चव्हाण यांनी सांगितले़