गस्तीच्या नावाखाली ‘मस्ती’ केल्यास गुन्हे
By Admin | Updated: August 18, 2015 00:44 IST2015-08-18T00:44:08+5:302015-08-18T00:44:08+5:30
विनाकारण रस्त्यावर येऊन दहशत माजविण्याचा प्रयत्न केल्यास गुन्हे

गस्तीच्या नावाखाली ‘मस्ती’ केल्यास गुन्हे
कोल्हापूर : करवीर तालुक्यात कुठेही चोरांचा सुळसुळाट नाही. सांगरूळ, आमशी, म्हारूळ, खाटांगळे, कसबा बीड, खुपिरे, वरणगे, वडणगे, आंबेवाडी, केर्ली, बालिंगा, दोनवडे, आदी परिसरांत चोरांचा वावर असल्याची अफवा आहे. त्यावर कोणीही विश्वास ठेवू नये, ग्रामस्थांनी गावांतून रात्रग्रस्त घालू नये, त्यांनी स्वत:च्या घरांचे रक्षण करावे, विनाकारण रस्त्यावर येऊन दहशत माजविण्याचा प्रयत्न केल्यास गुन्हे दाखल केले जातील, असा इशारा पोलीस निरीक्षक दयानंद ढोमे यांनी दिला आहे.
दुष्काळामुळे बिहार, उस्मानाबाद येथील चोरट्यांच्या टोळ्या गावा-गावांत फिरत असल्याच्या चर्चेने ग्रामस्थांत भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे गावा-गावात लोक गस्त घालत आहेत. मात्र, या गस्तीमुळे नोकरीवरून घरी जाणाऱ्या लोकांना अडवून त्रास देणे, चोर समजून निरपराध नागरिकांना अमानुषपणे मारहाण करणे असे प्रकार घडत आहेत. त्यामुळे असे प्रकार झाल्यास किंवा गस्तीसाठी रस्त्यावर धारदार हत्यारे घेऊन रस्त्यावर फिरल्यास येथून पुढे गुन्हा दाखल केला जाईल, असा इशारा ढोमे यांनी दिला आहे.
एखादी व्यक्ती संशयितरीत्या दिसून आल्यास पोलिसांशी संपर्क साधावा. ग्रामस्थांनी आपापल्या घरामध्ये रात्रीच्या वेळी शांत झोप घ्यावी. चोरांच्या नावाखाली एकमेकांच्या वैमनस्याच्या डावपेचातून काही लोक घरांवर दगड मारण्याचे प्रकार करत असल्याचे समजते. असे प्रकार गावागावांत घडत असून यासंदर्भात तक्रार आल्यास संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात येईल, असे ढोमे यांनी सांगीतले.