पंधरा दिवसांत दवाखाना नवीन इमारतीत सुरू न झाल्यास तीव्र आंदोलन
By Admin | Updated: July 25, 2015 01:13 IST2015-07-24T23:17:29+5:302015-07-25T01:13:32+5:30
नागरिकांना गैरसोयींना सामोरे जावे लागत आहे. तरी जुन्या इमारतीतून हा दवाखाना नवीन इमारतीत सुरू करावा व अधिकाधिक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात,

पंधरा दिवसांत दवाखाना नवीन इमारतीत सुरू न झाल्यास तीव्र आंदोलन
सांगरूळ : येथे जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागाचा दवाखाना सुरू आहे. या दवाखान्यांतर्गत ८ ते १० गावे येतात. सध्या सुरू असलेला दवाखाना मोडकळीस आल्याने व जागेचा अभाव असल्याने प्रशासनाने नवीन जागेत उभारलेल्या इमारतीत दवाखाना सुरू करावा, या मागणीसाठी नागरिकांनी शुक्रवारी ग्रामप्रशासनास निवेदन दिले. दरम्यान, पंधरा दिवसांत दवाखाना नवीन इमारतीत सुरू न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा ग्रामस्थांनी दिला.
सांगरूळ हे परिसरातील गावासाठी मध्यवर्ती ठिकाण असल्याने जिल्हा पशुसंवर्धन विभागाने सांगरूळ येथे जनावरांचा दवाखाना सुरू केला. पूर्वी जनावरांची संख्या कमी होती. त्यामुळे चांगल्या सुविधा मिळत होत्या. सध्या सुरू असलेल्या दवाखान्याची इमारत जुनी असून ती मोडकळीस आली आहे. तसेच सांगरूळसह परिसरातील गावांत जनावरांचे प्रमाणही वाढले आहे. या जनावरांवर उपचार करण्यासाठी नवनवीन यंत्रांचा वापर केला जातो. मात्र, सध्याची इमारत यासाठी अपुरी पडत असल्याने जिल्हा परिषद फंडातून गावातील मध्यवर्ती ठिकाणी प्रशस्त जागेत मोठी इमारत बांधण्यात आली. ही इमारत बांधून चार वर्षे झाली आहेत. मात्र, आजही दवाखाना जुन्याच इमारतीत सुरू आहे. यामुळे नागरिकांना गैरसोयींना सामोरे जावे लागत आहे. तरी जुन्या इमारतीतून हा दवाखाना नवीन इमारतीत सुरू करावा व अधिकाधिक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, यासाठी ग्रामस्थांनी निवेदन दिले.
यावेळी निवास वातकर, जनादर्शन खाडे, सुशांत नाळे, सरदार खाडे, संभाजी नाळे, प्रशांत खाडे, बाजीराव वातकर, विलास किल्लेदार, संभाजी खाडे, प्रदीप नाळे, प्रमोद नाळे, विजय नाळे, आनंदराव खाडे, उपसरपंच रवींद्र खाडे, ग्रामपंचायत सदस्य सदाशिव खाडे, ग्रामसेवक एस. एस. दिंडे उपस्थित होते.