बौद्ध, मातंग एकत्र आल्यास राज्यात चित्र बदलेल
By Admin | Updated: January 11, 2016 01:07 IST2016-01-11T01:03:01+5:302016-01-11T01:07:49+5:30
परिवर्तन परिषदेतील सूर : लोकजनशक्ती पार्टीतर्फे आयोजन; अन्य समाजासाठीही परिषदेचा मानस

बौद्ध, मातंग एकत्र आल्यास राज्यात चित्र बदलेल
कोल्हापूर : राज्यकर्त्यांनी स्वत:च्या स्वार्थासाठी आपला वापर केला आहे, त्यामुळे बौद्ध व मातंग समाज एकत्र आल्यास महाराष्ट्रात चित्र बदलेल, असा सूर उमटला. लोकजनशक्ती पार्टी यांच्यावतीने येथे शाहू स्मारक भवनात रविवारी राज्यस्तरीय बौद्ध आणि मातंग समाज परिवर्तन परिषद झाली.परिषदेचे उद्घाटन उपमहापौर शमा मुल्ला यांच्या हस्ते झाले. यावेळी प्राचार्य डॉ. अच्युत माने (निपाणी), प्राचार्य डॉ. हरीश भालेराव, सामाजिक कार्यकर्ते डॉ. रमेश राक्षे (पुणे) व डॉ. शरद गायकवाड यांनी मार्गदर्शन केले. जिल्हाध्यक्ष बाळासाहेब भोसले अध्यक्षस्थानी होते. डॉ. शरद गायकवाड म्हणाले, काळानुसार आता बौद्ध आणि मातंग समाजाने हातात हात घालून काम करणे गरजचे आहे. आपण एकत्र आल्यास निश्चितच चित्र बदलेल. प्राचार्य डॉ. अच्युत माने यांनी, बौद्ध-मातंग समाज आज कुठे आहे, असा प्रश्न केला. त्यासाठी सर्वांनी एकत्र या. विचाराने विचारांची लढाई लढली पाहिजे. प्राचार्य डॉ. हरीश भालेराव यांनी, सर्वसामान्यांच्या हितासाठी व जात-धर्म न मानता सर्वांनी एकत्र येणे गरजेचे आहे. बौद्ध व मातंग समाजाचे नेते आज कोठे आहेत. किती दिवस आपण सहन करणार. जातीयवाद गाडून टाका, असे सांगितले.
रमेश राक्षे म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी चळवळीपासून शेवटपर्यंत काम केले. मग, आज आपण कुठे जात आहे. मात्र, १९४८ पासून येथील राज्यकर्त्यांनी आपला वापर सत्तेसाठी करून घेतला. तो आजही सुरू आहे. आज राज्यात जातीयवाद होत आहे. विचारांची हत्या होत आहे. त्यामुळे बौद्ध व मातंग समाज यांनी एकत्र यावे, असे सांगितले. बाळासाहेब भोसले म्हणाले, भविष्यात अनुसूचित जाती (एस.सी.) अनुसूचित जमातीसाठी (एस.टी.) व इतर मागासवर्गीयांसाठी (ओबीसी) अशा प्रकारची परिवर्तन परिषद जिल्ह्यात भरविण्याचा मानस आहे.जिल्हा कार्याध्यक्ष सुशील कोल्हटकर यांनी प्रास्ताविक केले. युवा अध्यक्ष गौतम करुणादित्य यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली. सूत्रसंचालन तकदीर कांबळे यांनी केले. आभार उपाध्यक्ष अशोक कांबळे यांनी मानले. या परिषदेस तुलसीदास थोरात, राजेंद्र ओंकार, कोमल माने, सुनील शेळके, सतीश कुरणे, जगदीश शिरोलीकर, दीपक दाभाडे, तुकाराम कांबळे, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
विचाराने विचारांची लढाई लढली पाहिजे.
सर्वसामान्यांच्या हितासाठी व जात-धर्म न मानता सर्वांनी कत्र येणे गरजेचे आहे
सत्तेसाठी राजकारण्यांकडून बौध्द, मातंग समाजाचा वापर