आप्पू ट्रेनरने हेल्मेट घातले असते तर...!
By Admin | Updated: July 24, 2016 00:37 IST2016-07-24T00:17:46+5:302016-07-24T00:37:31+5:30
थोड्याशा चुकीमुळे येतेय आयुष्यभराचे अपंगत्व जीवघेणा अपघात

आप्पू ट्रेनरने हेल्मेट घातले असते तर...!
कोल्हापूर : परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी ‘हेल्मेट घातल्याशिवाय पेट्रोल देणार नाही,’ असा निर्णय घेतल्यावर त्याबद्दल सोशल मीडियातून विरोधाचा सूर आळविला जात असताना हेल्मेटची किती गरज आहे, याचे प्रत्यंतर आणून देणारी घटना दोन दिवसांपूर्वीच कोल्हापुरात घडली. मुक्त छायाचित्रकार इजाज उर्फ आप्पू जानमहंमद ट्रेनर (वय ३२, रा. शाहूपुरी, घोरपडे गल्ली, कोल्हापूर) याचा मोटारबाईकवरून पडल्याने अपघात झाला असून, डोक्याला गंभीर इजा झाली आहे. त्याने हेल्मेट घातले असते तर त्याला किरकोळ दुखापतही झाली नसती, असे त्याच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांचे म्हणणे आहे.
आप्पू हा दिवंगत ज्येष्ठ छायाचित्रकार जॉनी ट्रेनर यांचा मुलगा. वडिलांचे अकाली निधन झाल्यावर कौटुंबिक अडचणी आल्या. पुढे आप्पू व नाझ हे दोन भाऊ फोटोग्राफर झाल्यावर कुटुंबाला काही प्रमाणात स्थैर्य आले. आप्पू हा काहीकाळ वृत्तपत्रांत छायाचित्रकार म्हणून काम करीत होता. गुरुवारी (दि. २१) रात्री नऊच्या सुमारास दसरा चौकातून घरी जाताना शाहू पुतळ्याच्या मागील बाजूस कुत्रे आडवे आल्याचे निमित्त झाले आणि तो बाईकवरून खाली पडला. तातडीने त्याला ‘सीपीआर’मध्ये दाखल करण्यात आले. तिथे मेंदूला इजा झाल्याचे समजल्याने राजारामपुरीतील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्या मेंदूला सूज आली आहे. गेले दोन दिवस तो अतिदक्षता विभागात आहे. रुग्णालयाचा व औषधांचाही खर्च कुटुंबाच्या आवाक्याबाहेरचा आहे. त्याचा कोणताही आरोग्य विमा नाही. राजीव गांधी आरोग्यदायी योजनेतून अपघाताचे उपच्
ाार होत नाहीत. रुग्णालयाचा व औषधांचा खर्च कित्येक हजारांत आहे. त्यामुळे कुटुंब अडचणीत सापडले आहे. शनिवारी कोल्हापूर प्रेस क्लबच्या पुढाकाराने पत्रकारांनी काही रक्कम जमा करून तातडीची मदत म्हणून ट्रेनर कुटुंबीयांकडे सुपूर्द केली. त्यावेळी श्रीमती जमेला ट्रेनर यांचे मन भरून आले. अशा अडचणीच्या क्षणी कोणीतरी आपल्याला आधार देत असल्याचे पाहून त्यांनाही थोडा धीर आला. शासनाच्या पत्रकार कल्याण मदत निधीतून काही मदत करण्याचेही प्रयत्न आहेत; परंतु हे सगळे घडले ते डोक्याला हेल्मेट न घातल्यामुळे!
आप्पूवर कुटुंबाची आर्थिक भिस्त आहे. पत्नीसह दोन लहान मुले आहेत. त्यामुळे तो लवकर बरा व्हावा यासाठी सगळे अल्लाकडे दुवा मागत आहेत. या अपघातात त्याच्या फक्त डोक्यालाच मार बसला आहे. अन्य शरीराला साधा ओरखडाही पडलेला नाही. त्यामुळे अपघात झाला तेव्हा त्याच्या डोक्यावर हेल्मेट असते तर त्याला थोडा मुका मार बसला असता. अन्य कोणताच धोका पोहोचला नसता. एका हेल्मेटने त्याच्या जिवाचा धोका व आर्थिक नुकसान सहजपणे टळले असते.
कोल्हापूर मृत्यूत जगात पुढे...
डॉक्टरांच्या मतानुसार अख्ख्या युरोपात वर्षाला फक्त ३० लोक डोक्याला मार बसून मरतात आणि आपल्या कोल्हापुरात मात्र महिन्याला अशा अपघातांचे सरासरी १३ रुग्ण एका रुग्णालयात दाखल होतात. म्हणजे डोक्याला इजा होऊन मृत्यूचे कोल्हापुरातील प्रमाण हे जगात सर्वांत जास्त आहे. हेल्मेट सक्ती करा म्हणून आग्रह धरल्यावर आमच्याच रुग्णालयाच्या दारात हेल्मेटविरोधी कृती समितीने धरणे धरले, असाही अनुभव या नामांकित डॉक्टरना आला.