स्वत:मधील ताकद ओळखावी
By Admin | Updated: January 12, 2016 00:36 IST2016-01-11T23:15:45+5:302016-01-12T00:36:19+5:30
ज्ञानेश्वर मुळे : कागलच्या डी. आर. माने महाविद्यालयात व्याख्यान

स्वत:मधील ताकद ओळखावी
कागल : जगभरात जवळपास ७०० कोटी लोक आहेत, मात्र ते स्वतंत्र चेहऱ्याचे आहेत. परमेश्वराने प्रत्येक व्यक्तीला अद्वितीय असा गुण दिला आहे, पण ही अद्वितीय ताकद काय आहे ही शोधायची जबाबदारी ज्याच्या त्याच्यावर सोपवून ‘मेख’ मारली आहे. म्हणून आपल्यातील अद्वितीय गुणांच्या शोधासाठी ज्ञान-जिज्ञासा आवश्यक असते, असे प्रतिपादन डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांनी केले.
येथील डी. आर. माने महाविद्यालयात आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी दि कागल एज्युकेशन सोसायटीचे सचिव भैया माने होते. बाळ कालेकर, मीनाताई घाग, अजित पाटील प्रमुख उपस्थित होते.
मुळे म्हणाले, कच्चा माल फार चांगला असतो, पण रसवंतीगृहात गेल्यावर चोथा होऊन बाहेर पडतो, तशी अवस्था कधी कधी शिक्षणामुळेही होते; म्हणून नुसता अभ्यास करून उत्तीर्ण होण्यापेक्षा अंतर्मनातील ज्ञानज्योत पेटण्यासाठी शिक्षण घेतले पाहिजे. असे झाले तर आपला चोथा कदापीही होणार नाही. प्रगतीपथावर जायचे असेल तर सुरवंट जसा कोशाबाहेर पडतो आणि त्याचे फुुलपाखरात रूपांतर होते, तसे आपण कोशाबाहेर पडायला हवे. आदर्श डोळ््यांसमोर असलाच पाहिजे, पण दुसरे करतात म्हणून तेच करण्याची आवश्यकता नाही. तुमच्या मनाला जे पटेल, भावेल, तेच करा. त्यासाठी तुमचे अद्वितीय याचा शोध घ्या.
प्राचार्य डॉ. प्रवीण चौगुले यांनी स्वागत करून प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला. यावेळी भैया माने यांचेही भाषण झाले. डॉ. नीला जोशी यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. हसीना मालदार यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)