कोल्हापूर : मुदत ठेव आणि मॅच्युअल फंडात गुंतवणूक करून जादा परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवून फसवणूक झालेल्या १२ खातेदारांना आयसीआयसीआय बँकेने तातडीने ८६ लाख रुपये परत दिले. फसवणूक करणारा बँक व्यवस्थापक विकास आण्णाप्पा माळी (वय ३८, सध्या रा. जरगनगर, मूळ रा. केंपवाड, ता. अथणी, जि. बेळगाव) याच्याकडून बँक पैसे वसूल करणार आहे.
दरम्यान, माळी याने ग्राहकांची ९६ लाखांची रक्कम शेअर मार्केटमध्ये गमावल्याचे तपासातून समोर आले आहे. बँकेने प्रतिमेला धक्का लागू नये यासाठी ग्राहकांचे हित संरक्षण करण्याच्या भावनेतून रक्कम परत दिली.आयसीआयसीआय बँकेच्या क्रशर चौक आणि शिरोली एमआयडीसी शाखेतील तत्कालीन व्यवस्थापक विकास माळी याने जुलै २०२२ ते डिसेंबर २०२४ या कालावधीत १२ ग्राहकांचे ९६ लाख ६० हजार रुपये चार मित्रांच्या खात्यात वर्ग करून ते शेअर मार्केटमध्ये लावले होते. परतावा आणि मुद्दलही मिळत नसल्याने खातेदारांनी बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे धाव घेतल्यानंतर फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला.गुन्हा दाखल होण्यापूर्वीच बँकेने संबंधित १२ ग्राहकांना त्यांचे ८६ लाख रुपये परत केले. एका खातेदाराने रोख १० लाख माळी याला दिले होते. त्या रकमेचा बँकेशी संबंध नसल्याने ती वगळण्यात आली. फसवणुकीची जबाबदारी घेऊन बँकेने रक्कम परत दिल्याने खातेदारांना दिलासा मिळाला.माळी याच्या मालमत्तांचा शोधमाळी याचे मूळ गाव कर्नाटकात असून, पोलिसांकडून त्याच्या मालमत्तांचा शोध सुरू आहे. यासाठी लवकरच एक पथक त्याच्या गावी जाणार आहे. त्याच्या नावावर फारशी मालमत्ता नसल्याचे पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत समोर येत आहे.९६ लाख बुडाले?झेरोधा ब्रोकिंगमध्ये सुरुवातीला गुंतवलेले पैसे परत मिळवण्यासाठी सातत्याने पैसे गुंतवले. अखेरपर्यंत जादा परतावा मिळालाच नाही. भरलेले ९६ लाख शेअर मार्केटमध्ये बुडाल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. याची खातरजमा करण्याचे काम सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.पैसे सुरक्षितफसवणुकीतील पैसे परत मिळणे हे मोठे दिव्य असते. मात्र, आयसीआयसीआय बँकेने व्यवस्थापकावर खापर फोडून खातेदारांना वाऱ्यावर न सोडता त्यांचे पैसे परत केले. पैसे सुरक्षित राहिल्याने दिलासा मिळाल्याची माहिती बँकेचे खातेदार डॉ. महेश दळवी (तेजोमय हॉस्पिटल) यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.