राजकीय कुरघोड्यांमुळे इचलकरंजीची परवड

By Admin | Updated: July 10, 2015 21:53 IST2015-07-10T21:53:13+5:302015-07-10T21:53:13+5:30

‘शविआ’कडून नगराध्यक्षांचे समर्थन असमर्थनीय : नगराध्यक्षांच्या दालनातील नगरसेवकांचा गोंधळ निंदनीय

Ichalkaranji's rescue due to political turmoil | राजकीय कुरघोड्यांमुळे इचलकरंजीची परवड

राजकीय कुरघोड्यांमुळे इचलकरंजीची परवड

राजाराम पाटील - इचलकरंजी इचलकरंजी पालिकेत सभेचे अध्यक्षपद उपनगराध्यक्षांकडे न सोपविण्याची कृती नगराध्यक्षा शुभांगी बिरंजे यांच्या अंगलट आली असली त्याचे समर्थन करण्याचे शहर विकास आघाडीचे कृत्यही असमर्थनीय आहे. याचवेळी सभागृहात कॉँग्रेसने धरलेला आग्रह व त्याचा विचारलेला जाब हा त्यांचा हक्क असला तरी नगराध्यक्षांच्या कार्यालयात घातलेला गोंधळ निंदनीय आहे. नगराध्यक्षा बिरंजे यांनी राजीनामा न देण्याचे घोषित करून बंड केले; पण तेव्हापासून नगरपालिकेची शिस्त आणि पदाधिकाऱ्यांचा वचक कमी झाला. आता तरी शहराची धुरा वाहणारे लोकप्रतिनिधी अंतर्मुख होऊन फक्त शहराच्या विकासाचा विचार करणार का, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. पक्षांतर्गत ठरलेल्या कालावधीप्रमाणे नगराध्यक्षा बिरंजे यांनी जानेवारीमध्ये राजीनामा न देता बंड केले. त्यामुळे चालून आलेली संधी शहर विकास आघाडीने हेरली आणि नगराध्यक्षा बिरंजे यांच्या बंडाला पाठिंबा दिला. त्याचवेळी राष्ट्रवादी कॉँग्रेसमधील कारंडे गटानेही पाठिंबा देऊन बंडाची ताकद वाढविली. कायद्याप्रमाणे एक वर्षाच्या कालावधीनंतरच नगराध्यक्षांवर अविश्वास प्रस्ताव आणता येतो आणि नगराध्यक्षांशिवाय विविध समित्यांचे कामकाज चालविता येत नाही याची जाणीव झाल्याने नंतर राष्ट्रीय व राष्ट्रवादी अशा दोन्ही कॉँग्रेसनेही नगराध्यक्षा बिरंजे यांना सहकार्य करण्याचे ठरविले. नगराध्यक्षांचे बंड, ‘शविआ’ व कारंडे गटाचा पाठिंबा आणि कॉँग्रेस आघाडीचे सहकार्य यामुळे नगरपालिकेत अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली. पालिकेच्या इतिहासात प्रथमच विरोधी पक्षाचे अस्तित्व संपले. ‘सबका साथ-सबका विकास’ याप्रमाणे राजकारण चालले. ठरावीक नगरसेवकांचा राबता वाढला आणि विकासाची गंगा वाहू लागली. अशी गंगा आपल्या प्रभागात येत नाही. म्हणून ‘शविआ’च्या नगरसेवकांनी तक्रार केली. अगदी ‘शविआ’चे कार्याध्यक्ष जयवंतराव लायकर यांनीही बांधकाम खात्यावर ताशेरे ओढले. बसलेली घडी विस्कटू लागली. इकडे कॉँग्रेसनेही सभागृहात अनेक प्रश्न उभे करून प्रशासनाला खडे बोल सुनावले. मे महिन्यातील पाणीटंचाईवर कॉँग्रेसच्या नगरसेविका रत्नप्रभा भागवत यांनी नगराध्यक्षांच्या टेबलसमोर मातीचा घडा फोडून नगराध्यक्षांवरील संताप व्यक्त केला आणि येथून पुढे कॉँग्रेस आणि नगराध्यक्षा बिरंजे यांच्यातील दुराव्याला उघड स्वरूप प्राप्त झाले. गुरुवारी पालिका सभेत विषयपत्रिकेवरील २६ पैकी १४ विषयांवर चर्चा होऊन निर्णय झाले. त्याचवेळी मोर्चाला सामोरे जाण्यासाठी सभागृहाबाहेर जाणाऱ्या नगराध्यक्षा बिरंजे यांनी अध्यक्षपदाची खुर्ची ‘शविआ’चे पक्षप्रतोद अजित जाधव यांना दिली आणि इथेच राजकीय मान-अपमानाची ठिणगी पेटली आणि यातूनच महापालिकेत अभूतपूर्व गोंधळाने सभागृहाचा आखाडा झाला. (पूर्वार्ध) ‘मोठेपणा’ नाहीच सभागृहात उपनगराध्यक्ष रणजित जाधव उपस्थित असतानाही नगराध्यक्षांनी ‘शविआ’च्या पक्षप्रतोदांची निवड केली. यावेळी ज्येष्ठ नगरसेवक म्हणून अजित जाधव यांनी उपनगराध्यक्षांना अध्यक्षपदाच्या खुर्चीवर बसविणे योग्य होते; पण तो मोठेपणा त्यांनीही दाखविला नाही. यामुळे गोंधळाला सुरुवात झाली. याचा जाबही कॉँग्रेसने नगराध्यक्षांना विचारला. त्यामुळे हा विषय सभागृहात संपायला पाहिजे होता; पण कॉँग्रेसनेही नगराध्यक्षांच्या कार्यालयात जाऊन तेथे गोंधळ घातला आणि आपल्या अकलेचे तारे तोडले.

Web Title: Ichalkaranji's rescue due to political turmoil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.