इचलकरंजीचे चौघे समुद्रात बुडाले
By Admin | Updated: July 20, 2015 00:05 IST2015-07-19T22:57:51+5:302015-07-20T00:05:26+5:30
तारकर्लीतील घटना : मुलाचा मृत्यू, तिघांना वाचविण्यात यश

इचलकरंजीचे चौघे समुद्रात बुडाले
मालवण : इचलकरंजी येथून तारकर्लीत पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांतील चार मुले बुडाल्याची घटना घडली आहे. यातील इतर तीन मुलांना वाचविण्यात यश आले, तर यात सलोनी राजेंद्र्रकुमार मेहता (वय १७, रा. इचलकरंजी, कोल्हापूर) या मुलीचा बुडून मृत्यू झाला. ही घटना एमटीडीसीच्या किनाऱ्यावर रविवारी सकाळी साडेआठ वाजता घडली.
तारकर्ली येथे शनिवारी सायंकाळी इचलकरंजी येथील कपड्यांचे व्यापारी मेहता आणि लालवाणी कुटुंबीयांतील १३ सदस्य टेम्पो ट्रॅव्हर्ल्समधून आले होते. रविवारी सकाळी सात वाजता सर्व पर्यटक समुद्र्रस्नानासाठी समुद्रात उतरले. त्यावेळी तेथील सुरक्षा रक्षकाने त्यांना समुद्र्रात आत जाऊ नका, असे सांगितले. काही वेळाने कुटुंबीय किनाऱ्यावर स्नान करीत होते, तर मुले समुद्र्रात आत जाऊन मौजमस्ती करीत होती. सुरक्षा रक्षकाच्या लक्षात येताच त्याने शिटी वाजवीत बाहेर येण्याची सूचना केली; मात्र पर्यटकांनी दुर्लक्ष केल्याने हा अनर्थ घडल्याचे बोलले जात होते.
तिघांना वाचविण्यात यश
सुरक्षा रक्षकाच्या सूचनांकडे दुर्लक्ष करीत निधी दिनेश लालवाणी (वय १३), किंजल विजयकुमार लालवाणी (१५), महावीर सुरेश लालवाणी (९) व सलोनी मेहता (१७) हे चौघे समुद्रात आत गेल्यानंतर मोठ्या लाटेत गटांगळ्या खाऊ लागले. यात सलोनी समुद्रात आत खेचली जाऊ लागली. त्यावेळी कुटुंबीयांनी चौघांनाही पाण्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, सलोनी पाण्यात जास्त काळ राहिल्याने ती अत्यवस्थ बनली होती. चौघांनाही तातडीने १०८ रुग्णवाहिकेतून ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. सलोनी जास्त काळ पाण्यात राहिल्याने तिचा गुदमरून मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सुरेश पांचाळ यांनी सांगितले.
महावीर याला तत्काळ पाण्यातून बाहेर काढण्यात यश आल्याने
त्याच्या प्रकृतीत सुधारणा झाली होती, तर निधी आणि किंजल
यांना तातडीने रुग्णालयात दाखल केल्याने त्यांना वाचविण्यात यश आल्याचे डॉ. पांचाळ यांनी सांगितले. (वार्ताहर)
...तर कायदेशीर कारवाई करणार : बुलबुले
सध्या समुद्र खवळलेला असतो. अशावेळी मच्छिमार तसेच पर्यटकांना समुद्रात न जाण्याच्या सूचना देऊनही उतरतात. मासेमारी बंदी कालावधी असतानाही स्वत:चा जीव धोक्यात घालून मच्छिमार मासेमारी करतात. आतापर्यंत अशांवर कारवाई केली नाही. मात्र, यापुढे मृत्यूस कारणीभूत ठरल्यास गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करणार असल्याचे पोलीस निरीक्षक विश्वजित बुलबुले यांनी स्पष्ट केले.