इचलकरंजीत व्यापाऱ्यांच्या प्रश्नावर 'स्वाभिमानी'चा आक्रमक पवित्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:27 IST2021-07-14T04:27:29+5:302021-07-14T04:27:29+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क इचलकरंजी : जो कायद्याचा आदर करतो, त्याला भीती दाखवली जात आहे आणि निर्बंध झुगारून निवडणुका, सभा ...

Ichalkaranji's aggressive pavitra of 'Swabhimani' on the question of traders | इचलकरंजीत व्यापाऱ्यांच्या प्रश्नावर 'स्वाभिमानी'चा आक्रमक पवित्रा

इचलकरंजीत व्यापाऱ्यांच्या प्रश्नावर 'स्वाभिमानी'चा आक्रमक पवित्रा

लोकमत न्यूज नेटवर्क

इचलकरंजी : जो कायद्याचा आदर करतो, त्याला भीती दाखवली जात आहे आणि निर्बंध झुगारून निवडणुका, सभा व बैठका घेतल्या जातात, त्यांच्यावर गुन्हे दाखल केले जात नाहीत. त्यामुळे जो दुकानदार दुकाने उघडणार, त्याच्या पाठीशी स्वाभिमानी शेतकरी संघटना राहणार, असा आक्रमक पवित्रा माजी खासदार राजू शेट्टी यांनी घेतला.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेने व्यापाऱ्यांना रीतसर परवानगी द्या; अन्यथा दुकाने उघडण्यासाठी रस्त्यावर उतरू, असा इशारा दिला असतानाही प्रशासनाने या मागणीकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे सोमवारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने मलाबादे चौकात जोरदार निदर्शने केली.

बघताय काय, सामील व्हा, आमच्या मागण्या मान्य करा, नाहीतर खुर्च्या खाली करा, अशा जोरदार घोषणा देण्यात आल्या. यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला होता.

शेट्टी म्हणाले, कोल्हापुरात पालकमंत्री सतेज पाटील यांनी आठ दिवसांसाठी दुकाने उघडण्यास परवानगी दिली. परंतु इचलकरंजीस नाकारले. याविरोधात सोमवारी आंदोलन करण्याचा शब्द मी पाळला असल्याचे सांगितले. तसेच मागण्यांचे निवेदन प्रांत कार्यालयात देण्यात आले. यावेळी शहर अध्यक्ष रामदास कोळी, विकास चौगुले, हेमंत वणकुद्रे, शीतल पाटील, अभिषेक पाटील, सतीश मगदूम यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.

चौकट

माकपचा पाठिंबा

तीन महिन्यांपासून व्यवसाय बंद असल्याने त्यांची परिस्थिती बिकट झाली आहे. सकाळी १० ते ४ पर्यंत व्यवसायास परवानगी द्या; अन्यथा सामुदायिक जेलभरो आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देत या आंदोलनाला मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा पाठिंबा असल्याचे दत्ता माने यांनी सांगितले.

फोटो ओळी

१२०७२०२१-आयसीएच-०१

इचलकरंजीत अत्यावश्यक सेवांसह इतर व्यवसाय सुरू करण्याच्या मागणीसाठी सोमवारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी केली. यावेळी माजी खासदार राजू शेट्टी, शहर अध्यक्ष रामदास कोळी, विकास चौगुले, हेमंत वणकुद्रे, आदी सहभागी झाले होते.

छाया - अनंतसिंग

Web Title: Ichalkaranji's aggressive pavitra of 'Swabhimani' on the question of traders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.