इचलकरंजीत महिलांचा ‘चेन स्नॅचर’मध्ये समावेश
By Admin | Updated: December 19, 2014 00:12 IST2014-12-19T00:03:12+5:302014-12-19T00:12:00+5:30
तिसऱ्या दिवशीही धुमाकूळ : धूम स्टाईलने आठ तोळे सोने लंपास

इचलकरंजीत महिलांचा ‘चेन स्नॅचर’मध्ये समावेश
इचलकरंजी : शहरात धूम स्टाईलने गंठण चोरी करणाऱ्या चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून, सलग तिसऱ्या दिवशीही चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील सुमारे आठ तोळ्यांचे सोन्याचे दागिने धूम स्टाईलने लंपास केले. विशेष म्हणजे मोटारसायकलवरून आलेल्या चोरट्यांमध्ये एका महिलेचाही समावेश होता. नागरिकांनी चोरट्यांचा पाठलाग केला. मात्र, ते पसार झाले. याबाबत गावभाग पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे.
याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, येथील शांतीनगर परिसरात राहणाऱ्या मंजुश्री विशाल जवळगी या जवाहरनगरमध्ये राहणाऱ्या नातेवाइकांकडे वास्तुशांतीसाठी गेल्या होत्या. कार्यक्रमानंतर त्या आपल्या मुलगीला बरोबर घेऊन गुरू चित्रमंदिर, संजीवनी हॉस्पिटलमार्गे स्कुटीवरून काल, बुधवारी संध्याकाळी घरी परत जात होत्या. त्या राजीव गांधी भवनसमोर आल्या असता पाठीमागून आलेल्या अॅक्टिव्हा मोटारसायकलवरील अज्ञातांनी मंजुश्री यांच्या गळ्यातील मंगळसूत्र, गंठण, राणीहार असे सुमारे अडीच लाखांचे आठ तोळ्यांचे दागिने हिसडा मारून पलायन केले. मंजुश्री यांनी आरडाओरडा केल्याने नागरिकांनी विक्रमनगर भागापर्यंत त्या मोटारसायकलीचा पाठलाग केला. मात्र, पाठलाग करूनही चोरटे मिळून आले नाहीत. त्या अॅक्टिव्हा गाडीवर मागील सीटवर एक महिला असल्याचेही नागरिकांनी सांगितले. चोरटे मिळून न आल्याने मंजुश्री जवळगी यांनी गावभाग पोलीस ठाण्यात तक्रार दिली. अधिक तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल दिलीप कारंडे करीत आहेत.
दरम्यान, घटनेनंतर तत्काळ हालचाल करीत गावभाग पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षक प्रज्ञा देशमुख यांनी युवतीस संशयावरून ताब्यात घेऊन तिच्याकडे चौकशी केली. तसेच तक्रारदार मंजुश्री व नागरिकांसमोर त्या युवतीला उभे करून ओळखण्यास सांगितले. मात्र, या चोरीमध्ये तिचा सहभाग नसल्याचे स्पष्ट झाल्याने तिची मुक्तता करण्यात आली. (प्रतिनिधी)