स्वाईन फ्लूमुळे इचलकरंजीत महिलेचा मृत्यू
By Admin | Updated: July 12, 2017 16:47 IST2017-07-12T16:36:39+5:302017-07-12T16:47:46+5:30
खासगी रुग्णालयात आठवडाभर उपचार केल्यानंतर प्रकृती अत्यवस्थ

स्वाईन फ्लूमुळे इचलकरंजीत महिलेचा मृत्यू
आॅनलाईन लोकमत
इचलकरंजी , दि.१३ :येथील मधुबन हौसिंग सोसायटीतील सुरेखा गजरे (वय ४५) यांचे स्वाईन फ्लूच्या आजाराने निधन झाले. त्यांच्यावर कोल्हापूर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांना अत्यवस्थ अवस्थेत सीपीआर हॉस्पिटलमध्ये हलविले असता त्यांचे निधन झाल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली.
याबाबत समजलेली माहिती अशी, सुरेखा गजरे या घशाच्या विकाराने आजारी असल्यामुळे त्यांच्यावर येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, स्वाईन फ्लूची लक्षणे दिसल्यामुळे त्यांना कोल्हापूर येथील खासगी रुग्णालयात नेण्यात आले होते. खासगी रुग्णालयात आठवडाभर उपचार केल्यानंतर त्यांची प्रकृती मंगळवारी (दि.११) अत्यवस्थ झाली. परिणामी त्यांना ताबडतोब सीपीआर हॉस्पिटलमध्ये हलविले. मात्र, तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासून पाहिले असता त्यांचे निधन झाल्याचे सांगितले.
याबाबत नगरपालिकेच्या आरोग्य खात्यास माहिती समजताच पालिकेकडे असलेल्या राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानाकडील कर्मचाऱ्यांना गजरे यांच्या निवासस्थानी जाऊन चौकशी करण्यास सांगितले आहे. त्या परिसरातील तातडीने साफसफाई करून स्वच्छता मोहीम राबविण्यात आल्याची माहिती पालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. सुनीलदत्त संगेवार यांनी दिली. शहरातील खासगी रुग्णालये अथवा आरोग्य विषयक तपासणी करणाऱ्या प्रयोगशाळांना स्वाईन फ्लूची माहिती मिळताच ताबडतोब नगरपालिका व शासकीय रुग्णालयास कळवावी, असे निर्देश देण्यात आले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
आयजीएम हॉस्पिटलची हतबलता
शासनाकडे हस्तांतरीत करण्यात आलेल्या आयजीएम रुग्णालयाकडील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी काम बंदचे आंदोलन सुरू केल्यामुळे स्वाईन फ्लूचा रुग्ण आढळल्याबाबत आपणास कोणतीही हालचाल करता आली नाही. म्हणून पालिकेकडे असलेल्या राष्ट्रीय नागरी आरोग्य विभागास कळविले आहे, अशी माहिती आयजीएमच्या वैद्यकीय अधीक्षिका डॉ. सुप्रिया देशमुख यांनी सांगून आपली हतबलता दाखवली.