इचलकरंजी येथे मुख्याधिकाऱ्यांना घेराव
By Admin | Updated: December 11, 2014 23:50 IST2014-12-11T22:22:42+5:302014-12-11T23:50:00+5:30
घरकुलांचा प्रश्न : संतप्त लाभार्थ्यांची निदर्शने

इचलकरंजी येथे मुख्याधिकाऱ्यांना घेराव
इचलकरंजी : रमाई आवास घरकुल योजनेंतर्गत अनुसूचित जाती व नवबौद्धांना घरकुले बांधून देण्याकामी संबंधित मक्तेदार दिरंगाई करीत आहे. त्यामुळे नगरपालिकेने फेरनिविदा प्रसिद्ध करून योग्य मक्तेदार नेमावा, अशी मागणी करीत लाभार्थी महिला-पुरूषांनी नगरपालिकेवर जोरदार निदर्शने केली. सत्तारूढ कॉँग्रेसचे नगरसेवक रवी रजपुते व संजय केंगार यांच्या नेतृत्वाखाली आंदोलनकर्त्यांनी मुख्याधिकारी सुनील पवार यांना घेराव घातला आणि ठिय्या आंदोलन केले.
शहरातील अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांपैकी दारिद्र्यरेषेखालील कुटुंबीयांना मोफत घरकुले बांधून देण्यासाठी रमाई आवास घरकुल योजना घोषित केली असून, त्याबाबत इचलकरंजीतील १८१ लाभार्थ्यांना घरकुले बांधून देण्यात येत आहेत. शासनाच्या समाजकल्याण खात्याकडून ही घरकुले बांधून देण्यात येत असली तरी नगरपालिकेमार्फत निविदा देण्यात आली आहे. घरकुलांचा पायाभरणी समारंभ सप्टेंबर महिन्यात झाला असून, फक्त खड्डे काढण्याव्यतिरिक्त गेल्या तीन महिन्यांत कोणतेही काम झाले नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या लाभार्थ्यांनी नगरसेवक रजपुते व केंगार नेतृत्वाखाली आज, गुरूवारी नगरपालिकेवर येऊन जोरदार
निदर्शने केली. यावेळी संबंधित मक्तेदाराच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या.
त्यानंतर आंदोलनकर्ते मुख्याधिकारी पवार यांच्या दालनात गेले. तेथे आंदोलनकर्ते लाभार्थ्यांच्या वतीने नगरसेवक रजपुते व केंगार यांनी बाजू मांडली. मक्तेदाराच्या हेकेखोरपणामुळे कामात दिरंगाई होत आहे. काही महिने कामात दिरंगाई करून पुन्हा वाढीव दर मागायचा, असा डाव मक्तेदाराचा आहे; पण वाढलेला आर्थिकभार लाभार्थी कोणत्या परिस्थितीत सहन करणार नाहीत, असा इशारा यावेळी देण्यात आला. सुमारे पाऊणतास हे आंदोलन चालू होते. यावेळी अतिरिक्त मुख्याधिकारी प्रज्ञा पोतदार, नगर अभियंता भाऊसाहेब पाटील, नगरसेविका प्रमिला जावळे व मंगल मुसळे उपस्थित होते.
संबंधित मक्तेदाराला चार दिवस मुदतीची अंतिम नोटीस देण्यात येईल. त्याने काम चालू न केल्यास बयाणा व सुरक्षा ठेव जप्त करून नवीन मक्तेदार नेमण्याची प्रक्रिया केली जाईल, असे आश्वासन मुख्याधिकारी पवार यांनी दिले आणि त्यानंतर आंदोलन संपुष्टात आले. (प्रतिनिधी)
‘लोकमत’चा दणका
‘घरकुलांची फक्त पायाभरणीच’ या मथळ्याखाली ‘लोकमत’ ने ९ डिसेंबरच्या अंकात इचलकरंजीतील या दारिद्र्यरेषेखालील कुटुंबीयांची व्यथा मांडली होती. त्यास अनुसरून नगरसेवक व लाभार्थी यांनी आजचे हे आंदोलन केले. ‘लोकमत’ने नेमके दुखणे मांडून हा प्रश्न ऐरणीवर आणला, अशी चर्चा आंदोलनकर्त्यांमध्ये होती.