झेंडा लावण्यावरून इचलकरंजीत तणाव
By Admin | Updated: July 18, 2015 00:20 IST2015-07-17T23:58:34+5:302015-07-18T00:20:58+5:30
सौम्य लाठीमार : जवाहरनगरात जमावबंदी

झेंडा लावण्यावरून इचलकरंजीत तणाव
इचलकरंजी : येथील जवाहरनगरात कोले मळा साईमंदिर परिसरात झेंडा लावण्याच्या कारणावरून दोन गटांत तणाव निर्माण झाला. जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीमार करून या परिसरात १४४ कलमान्वये जमावबंदी लागू केली.
जवाहरनगरातील एका चौकात १९ जूनला शुभेच्छाचा फलक लावला होता. हा फलक फाडल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांत गुन्हा नोंद झाला होता. त्यानंतर तिथेच नवीन फलक लावला. त्यावर चौकाचे नाव बदलल्यामुळे हा फलक काढून घेण्याची मागणी काही लोकांनी केली होती. मात्र, दुसऱ्या गटाने त्याला विरोध केला होता. यावेळी दोन्ही गटातील लोकांनी घोषणाबाजी केल्यामुळे तणाव निर्माण झाला. त्यामुळे पोलिसांनी जमावबंदी लागू करून तिथे बंदोबस्त ठेवला होता.
दरम्यान, शुक्रवारी सकाळी या परिसरात एका गटाने झेंडे व पताका लावल्या. त्यामुळे पुन्हा एकदा वाद उफाळून आला. यावेळी दोन्ही गटांनी समोरासमोर येऊन घोषणाबाजी केली. त्यामुळे तणाव निर्माण झाल्याने पोलिसांनी जमावाला पांगविण्यासाठी सौम्य लाठीमार केला. दोन्ही गटांतील प्रमुख लोकांशी चर्चा करून पोलिसांनी मध्यस्थी करीत संबंधित झेंडा काढून घेण्यास सांगितले. त्यानुसार जमावाने झेंडा काढून घेतला आणि वादावर पडदा पडला.
जवाहरनगरातील तणावाचे वृत्तांकन करण्यासाठी पत्रकार, छायाचित्रकार व वृत्तवाहिन्यांचे कॅमेरामन गेले होते. दोन्ही बाजूंचे जमाव समोरासमोर येऊन जोरदार घोषणाबाजी करू लागल्याने तणाव निर्माण झाला होता. यावेळी पोलिसांनी मध्यस्थांमार्फत विवादास्पद झेंडा उतरवून घेण्यास संबंधितांना सांगितले. आम्ही झेंडा काढून घेतो. मात्र, याचे छायाचित्रण अथवा चित्रीकरण होऊ नये, अशी मागणी जमावातील एका युवकाने केली. त्यानुसार सामंजस्याची भूमिका घेत पत्रकारांनी कॅमेरे बंद ठेवले होते. दुसऱ्या बाजूला दुचाकी लावून येणाऱ्या पत्रकार साईनाथ जाधव यांच्यावर जमावाने हल्ला चढविला. त्यांच्याकडील कॅमेरा काढून घेऊन त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. एका कार्यकर्त्याने जाधव यांची सोडवणूक करून घेतल्याने पुढील अनर्थ टळला.
यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक एम. एम. मकानदार तेथे आले. त्यांनी पत्रकार जाधव यांना तुम्ही येथे कशाला आलात, असा दम देत त्यांचा कॅमेरा जप्त करण्याचे आदेश पोलिसांना दिले. जाधव यांना मारहाण करणाऱ्यांना पाठीशी घालून पत्रकारांनाच दमदाटी करणाऱ्या अप्पर पोलीस अधीक्षक मकानदार यांची तत्काळ बदली करावी, या मागणीचे निवेदन जिल्हा पोलीसप्रमुख मनोजकुमार शर्मा यांना शहर पत्रकार संघटनेच्यावतीने देण्यात आले. मकानदार यांची बदली न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला. (वार्ताहर)
पत्रकारावर हल्ला; दहाजणांविरुद्ध तक्रार
जवाहरनगरात वृत्तांकनासाठी गेलेल्या पत्रकार साईनाथ जाधव यांच्यावर हल्ला करणाऱ्या दहाजणांविरोधात येथील शिवाजीनगर पोलिसांत तक्रार नोंद झाली आहे. अश्पाक मुजावर, रियाज जमादार, महंमद सनदी, हुसेन शेख, सैफ अली, इम्रान शेख व इतर चार ते पाच अनोळखी लोकांचा यामध्ये समावेश आहे. जमावाने लाथाबुक्क्यांनी मारहाण करून कॅमेरा काढून घेण्याचा प्रयत्न केला. गाडीवर आदळून गळ्यावर कशाने तरी मारहाण केल्याचे जाधव यांनी तक्रारीत म्हटले आहे.