इचलकरंजीत रोखले ‘पीके’चे प्रदर्शन
By Admin | Updated: December 31, 2014 00:41 IST2014-12-31T00:40:31+5:302014-12-31T00:41:36+5:30
हिंदुत्ववादी संघटना आक्रमक : चित्रपटाची पोस्टर्स फाडून पेटविली, बंदोबस्त तैनात

इचलकरंजीत रोखले ‘पीके’चे प्रदर्शन
इचलकरंजी : येथील विविध हिंदुत्ववादी संघटनांनी ‘पीके’ चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी आणा, अशी मागणी करत शहरातील चार चित्रपटगृहांत सुरू असलेले खेळ बंद पाडले. तसेच शहरात विविध ठिकाणी लावण्यात आलेले ‘पीके’ चे बोर्ड फाडून पेटवून देण्यात आले. या आंदोलनामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलीस यंत्रणेने मुख्य चौकांसह चित्रपटगृहांसमोर बंदोबस्त ठेवला होता.
नुकताच प्रदर्शित झालेल्या ‘पीके’ या आमीर खानच्या चित्रपटात हिंदू देव-देवतांची विटंबना करण्यात आली असून, हा चित्रपट प्रदर्शित करू नये, अशी मागणी विविध हिंदुत्ववादी संघटनांनी केली. सेन्सॉर बोर्डाने प्रदर्शनाला परवानगी दिल्यानंतर त्यातील दृश्ये कापता येणार नसल्याचे सांगितल्यानंतर पुन्हा हिंदुत्ववादी संघटनांनी प्रदर्शन बंद करा, अशी मागणी करत आंदोलनाला सुरुवात केली. आज, मंगळवारी इचलकरंजी परिसरातील वेगवेगळ्या हिंदुत्ववादी संघटनांनी एकत्रितपणे शहरात लावलेले ‘पीके’ चित्रपटाचे बोर्ड फाडून काढून, एकत्रित करून पेटवून दिले. तसेच शहरात ‘पीके’ चित्रपट सुरू असलेल्या चार चित्रपटगृहांत जाऊन दुपारी १२ ते ३ चे खेळ बंद पाडले. अचानक सुरू झालेल्या आंदोलनामुळे चित्रपटगृहात चित्रपट पाहण्यासाठी आलेल्या प्रेक्षकांची चांगलीच धावपळ उडाली. चित्रपट पुन्हा सुरू केल्यास होणाऱ्या नुकसानीस थिएटर मालक जबाबदार राहतील, असा धमकी वजा इशाराही आंदोलकांनी दिला. यामुळे चित्रपटगृह परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांनी चित्रपटगृह परिसरात, तसेच शहरातील प्रमुख चौकांत पोलीस बंदोबस्त तैनात केला. (प्रतिनिधी)
गडहिंग्लजमध्येही ‘पीके’चे खेळ बंद
गडहिंग्लज : हिंदू धर्माचा अपमान होणारे प्रसंग दाखवून हिंदू धर्मीयांच्या भावना दुखावतात म्हणून येथील सुभाष आणि मराठा चित्रमंदिरातील ‘पीके’ चित्रपटाचे खेळ हिंदू युवकांकडून बंद पाडण्यात आले. शिवाय निवेदनानंतरही चित्रपट दाखविल्यास ‘मोडतोड’ करण्याचा इशारा निवेदनातून चित्रपटगृह चालकांना देण्यात आला. निवेदनावर सतीश हळदकर, राहुल शिंदे, संजय पाटील, अवधूत फडणीस, रघुनाथ चव्हाण, साईनाथ लोंढे, आदींसह अन्य २२ जणांच्या स्वाक्षऱ्या आहेत.