इचलकरंजीत उशिरापर्यंत रांगा..शिरोळमध्ये चुरस

By Admin | Updated: October 16, 2014 00:47 IST2014-10-16T00:35:44+5:302014-10-16T00:47:57+5:30

हातकणंगलेत मतामतासाठी रस्सीखेच. शिरोळ १० उमेदवार निवडणूक रिंगणात

Ichalkaranji Range up to late ... Churus in Shirol | इचलकरंजीत उशिरापर्यंत रांगा..शिरोळमध्ये चुरस

इचलकरंजीत उशिरापर्यंत रांगा..शिरोळमध्ये चुरस

इचलकरंजीत उशिरापर्यंत रांगा
माजी मंत्री प्रकाश आवाडे व त्यांच्या कुटुंबीयांनी नूतन मराठी विद्यालय येथे, आमदार सुरेश हाळवणकर व त्यांच्या कुटुंबीयांनी सरस्वती हायस्कूल येथे, मदन कारंडे व त्यांच्या कुटुंबीयांनी नारायण मळा येथील मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला. दिवसभरामध्ये कॉँग्रेसचे माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे, शहर कॉँग्रेसचे अध्यक्ष प्रकाश मोरे, नगराध्यक्षा शुभांगी बिरंजे, माजी मंत्री प्रकाश आवाडे, भाजपचे आमदार सुरेश हाळवणकर, ‘शविआ’चे कार्याध्यक्ष जयवंत लायकर, अजित जाधव, भाजपचे शहर अध्यक्ष विलास रानडे, राष्ट्रवादीचे उमेदवार मदन कारंडे, शहर अध्यक्ष विठ्ठल चोपडे, आदींनी शहर व ग्रामीण परिसरातील ठिकठिकाणच्या मतदान केंद्रांना भेटी दिल्या, त्यांनी मतदारांशी चर्चा केली.

राजाराम पाटील/अतुल आंबी ल्ल इचलकरंजी
येथील विधानसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रीय कॉँग्रेस, राष्ट्रवादी कॉँग्रेस, भाजप, शिवसेना अशा चारही पक्षांचे उमेदवार उभे असल्यामुळे मतदानासाठी चुरस होती. दिवसभरात ७२.६३ टक्के मतदान झाले. दिवसभरामध्ये भाजप व कॉँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये झडलेल्या शाब्दिक चकमकीचे प्रकार वगळता कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. सायंकाळी उशिरापर्यंत अनेक मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगा लागल्या होत्या.
गेले महिनाभर इचलकरंजी मतदारसंघात राष्ट्रीय व प्रांतिक नेत्यांच्या जाहीर सभा झाल्या. तसेच चारही पक्षांच्या उमेदवारांनी काढलेल्या पदयात्रा आणि घेतलेल्या कोपरा सभांमुळे वातावरण चांगलेच ढवळून निघाले होते. आरोप-प्रत्यारोप, टीकाटिप्पणीमुळे प्रचारसभांमध्ये रंगत आली होती. भाजपचे उमेदवार आमदार सुरेश हाळवणकर, राष्ट्रीय कॉँग्रेसचे माजी मंत्री प्रकाश आवाडे, राष्ट्रवादी कॉँग्रेसचे मदन कारंडे या तिघांनीही आपापल्या लढती प्रतिष्ठेच्या केल्या होत्या. त्यामुळे इचलकरंजी मतदारसंघाकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले होते.

1सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास मतदानाची अंतिम वेळ असली, तरी आंतरभारती विद्यालय, साईट नं. १०२, सुतार मळा, आदींसह काही मतदान केंद्रांवर मतदारांनी रांगा लावल्या होत्या. त्यामध्ये महिला व पुरुष अशा दोन्ही मतदारांचा समावेश होता. सुमारे एक तासाहून अधिक काळ ही मतदानाची प्रक्रिया सुरू होती.
2दिवसभराच्या मतदान केंद्रांवरील सुरू असलेल्या प्रक्रियेवर निवडणूक निर्णय अधिकारी अश्विनी जिरंगे, सहायक अधिकारी सुनील पवार, प्रज्ञा पोतदार, जयश्री आव्हाड, अप्पर पोलीस अधीक्षक एम. एम. मकानदार, सहायक पोलीस अधीक्षक एस. चैतन्य यांच्यासह पोलीस निरीक्षक बी. एम. नलवडे, पोलीस निरीक्षक संजय साळुंखे, पोलीस निरीक्षक सतीश पवार हे लक्ष ठेवून होते.
3सायंकाळी साडेसातनंतर घोरपडे नाट्यगृह येथे मतदानयंत्रे व अन्य साहित्य जमा करून घेण्याचे काम सुरू होते. रात्री उशिरापर्यंत जमा केलेली यंत्रे व अन्य साहित्य मतमोजणी होणाऱ्या राजीव गांधी भवनमधील स्ट्रॉँग रूममध्ये ठेवली. १९ आॅक्टोबर रोजी मतमोजणी सकाळी आठ वाजल्यापासून सुरू होणार आहे. १४ टेबलांवर १८ फेऱ्यांमध्ये मतमोजणी पूर्ण होईल. दुपारी एक वाजेपर्यंत पूर्ण निकाल हाती येण्याची शक्यता आहे.

कबनूर येथे रुई रस्त्यावर असलेल्या दत्तनगर लक्ष्मी माळ वसाहतीत रस्ते व गटार यांची सोय नसल्याने तेथील महिला-पुरूष मतदारांनी मतदानावर बहिष्काराचा निर्णय घेतला होता.
त्यांनी आपल्या हातात काळे झेंडे घेतले होते. हा प्रकार समजताच सुमारे तीनच्या सुमारास आमदार सुरेश हाळवणकर, माजी मंत्री प्रकाश आवाडे व मदन कारंडे यांनी घटनास्थळी वेगवेगळे येऊन आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली.
हा प्रकार सुमारे तासभर सुरू होता. चर्चेनंतर बहिष्कार मागे घेण्यात आला व सुमारे २०० महिला-पुरूष मतदारांनी मतदानामध्ये भाग घेतला.

शिरोळमध्ये गावागावांत चुरस
संदीप बावचे ल्ल शिरोळ
शिरोळ विधानसभा निवडणुकीसाठी मतदारसंघातून ७६ टक्के चुरशीने मतदान झाले. दोन लाख ८७ हजार ९४९ मतदारांपैकी एक लाख ८० हजार २२५ जणांनी मतदानाचा हक्कबजाविला. किरकोळ बाचाबाची वगळता सर्वत्र मतदान शांततेत पार पडले.
आज, बुधवारी सकाळी सात वाजता शिरोळ तालुक्यातील ५५ गावांतील २७८ केंद्रांवर मतदान प्रक्रियेला प्रारंभ झाला. शिरोळ विधानसभा मतदारसंघात कॉँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना व महायुतीच्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. सकाळी आठ वाजल्यानंतर मतदान केंद्रांवर शेतकरी मतदारांबरोबर श्रमिक महिलावर्गातील मतदारांची गर्दी जाणवत होती. त्यानंतर दुपारी उन्हाच्या तडाक्यामुळे मतदान केंद्रांवर निरव शांतता होती. सकाळी नऊ वाजेपर्यंत तालुक्यात ११.४१ टक्केमतदान झाले होते. सकाळी अकरा वाजेपर्यंत २६.३० टक्के मतदान झाले. दुपारी एक वाजेपर्यंत ४१.१९ टक्के मतदान झाले. दुपारी तीननंतर बहुतांश मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. यावेळी ५९.०८ टक्केइतके मतदान झाले होते. सर्वच पक्षांतील नेते, कार्यकर्ते मतदारांना मतदानासाठी आवाहन करीत होते. सायंकाळी पाच वाजेपर्यंत ७३ टक्के मतदान झाले होते. जयसिंगपूर, शिरोळ, कुरुंदवाड, अकिवाट, नांदणी, अब्दुललाट, दत्तवाड, दानोळी, यड्राव, टाकळी या ठिकाणी मतदानासाठी चुरस दिसली. तालुक्यातील बऱ्याच गावांमध्ये व्होटर स्लिप न मिळाल्याने केंद्राबाहेरील टेबलवर आपला मतदार क्रमांक शोधण्यासाठी मतदारांनी गर्दी केली होती. उमेदवारांनीही तालुक्यातील बुहतांश गावांना भेटी दिल्या.
दरम्यान, शिरोळ मतदारसंघात सर्वाधिक मतदान उमळवाड येथे ८८ टक्केझाले, तर
सर्वांत कमी मतदान मौजे आगर येथे ७०.६० टक्केझाले.

1प्रथमच शिरोळ तालुक्यामध्ये या निवडणुकीत जातीय स्वरूप प्राप्त झाल्याचे दिसून आल्याने प्रत्येक गावामध्ये ईर्ष्येने मतदान होत होते. त्यामुळे १९ तारखेच्या निकालाकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे.
2जयसिंगपूर, शिरोळ, कुरुंदवाड, नांदणी, दानोळी, अब्दुललाट, दत्तवाड, यड्राव, अकिवाट, टाकळी या गावांमध्ये मतदारांची संख्या जादा आहे. ही गावे निर्णायक ठरणार आहत्ो.
3गणेशवाडी येथे एका मतदान केंद्रावर मतदाराच्या नावापुढे डिलेटर शिक्का मारला होता. हा मतदार दहा वर्षांपासून बाहेरगावी आहे. त्याला मतदानासाठी एका पक्षाकडून मतदान केंद्रावर आणले होते. यावर अन्य दोन पक्षांच्या कार्यकर्त्यांनी आक्षेप घेतल्याने मतदान केंद्रावर मोठा गोंधळ झाला. शेवटी त्या मतदाराला मज्जाव करण्यात आला.
4 गावनिहाय टक्केवारी - कवठेसार- ८३, कोथळी- ८०, दानोळी- ८०.७०, उमळवाड- ८८, चिंचवाड- ८६.८०, उदगाव- ८१.७०, जैनापूर - ७६, निमशिरगाव - ८०, तमदलगे - ७८, चिपरी - ७५.९३, जयसिंगपूर- ७३.५०, अर्जुनवाड- ८०.८०, कोंडिग्रे- ७९, आगर- ७०.६०, घालवाड - ८५, शिरोळ - ७१, धरणगुत्ती - ८०.६०, नांदणी - ७८.१०, हरोली - ८५.४५, जांभळी- ८४.८२, यड्राव- ७९.८३, टाकवडे- ८०.२०, कुटवाड- ८३.२७, कनवाड- ८०.२८, हसूर- ८३.४६, शिरटी- ८२.४०, शिरढोण- ८२.५०, अब्दुललाट- ७९, शिरदवाड -८०.७१, शिवनाकवाडी- ८०.२९, कुरुंदवाड -७३.३३, नृसिंहवाडी- ७३.४२, कवठेगुलंद- ८३.०९, गणेशवाडी- ८०, बस्तवाड- ८१.६०, आलास- ७७, अकिवाट -८१.४३, टाकळीवाडी ७८.३२, राजापूर- ७६.५०, सैनिक टाकळी- ७९.९४, दत्तवाड- ८०, नवे दानवाड- ८२.१८, जुने दानवाड- ८४.७४, राजापूरवाडी- ८४.८३, खिद्रापूर- ८३.४५, संभाजीपूर- ७९.२७, भैरेवाडी -८०.

हातकणंगलेत मतामतासाठी रस्सीखेच
दत्ता बीडकर - हातकणंगले
हातकणंगले राखीव विधानसभा मतदारसंघातील ५८ गावांमध्ये असलेल्या ३१५ मतदान केंद्रांवर आज, बुधवारी दिवसभरात शांततेने मतदान पार पडले. बहुरंगी लढतीमध्ये राष्ट्रीय कॉँग्रेस, शिवसेना, जनसुराज्य शक्ती, स्वाभिमानी शेतकरी संघटना, राष्ट्रवादी कॉँग्रेस यांच्यातील उमेदवारांमध्ये मतदान खेचून घेण्याची चुरस होती. परिणामी मतदारांना मतदान केंद्रांपर्यंत पोहोचविण्याची ईर्ष्या असल्याने सरासरी ७४ टक्के मतदान झाले. सायंकाळी उशिरापर्यंत काही मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगा दिसून येत होत्या.
मतदारसंघातील शहरी व ग्रामीण सर्वत्र सकाळपासून गतीने मतदान सुरू होते. दुपारी बारा ते तीन वाजेपर्यंत गती मंदावली होती; मात्र दुपारी तीन वाजल्यानंतर सर्वच मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगा दिसून येत होत्या. राष्ट्रीय कॉँग्रेसचे जयवंतराव आवळे, शिवसेनेचे आमदार सुजित मिणचेकर, जनसुराज्य
शक्तीचे राजीव आवळे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमोद कदम, राष्ट्रवादी कॉँग्रेस
पक्षाचे दत्ता घाटगे या उमेदवारांसह त्यांच्या समर्थकांनी मतदान केंद्रांवर फिरून मतदान करण्यासाठी मतदारांना प्रोत्साहित केले. विशेषत: ग्रामीण भागामध्ये ईर्ष्येने मतदान करून घेण्याची चढाओढ लागली होती.
मतदान केंद्रांपर्यंत मतदार पोहोचविण्यासाठी छोट्या-मोठ्या वाहनांचा उपयोग करण्यात आला.
हातकणंगले राखीव मतदारसंघामध्ये असलेल्या पेठवडगाव, हुपरी, शिरोली, रेंदाळ, पट्टणकोडोली, हातकणंगले अशी मोठी मतदार संख्या असलेल्या गावांमध्ये मतदानाची चुरस होती. आळते आणि हातकणंगले या दोन गावांमध्ये किरकोळ वाद झाल्याचे प्रकार घडले. इतरत्र मात्र मतदान प्रक्रिया शांततेने पार पडली.
मतदारसंघामध्ये नऊ वाजेपर्यंत ९.५ टक्के, अकरा वाजेपर्यंत २५.७० टक्के, दुपारी एक वाजता ४१.५८ टक्के, तीन वाजता ५१.५८ टक्के, तर सायंकाळी पाच वाजता ६८.३६ टक्के मतदान झाले होते. सर्वच मतदान केंद्रांवर पोलीस बंदोबस्त असला तरी मतदानाच्या प्रक्रियेवर निवडणूक निर्णय अधिकारी विद्युत वरखेडकर, सहायक निवडणूक अधिकारी तहसीलदार दीपक शिंदे यांच्यासह पोलीस उपअधीक्षक, दोन पोलीस निरीक्षक, चार सहायक पोलीस निरीक्षक व सात उपनिरीक्षक यांच्या भरारी पथकांनी जातीने लक्ष ठेवले होते. या मतदान केंद्रांवर एकूण २०४ पोलीस कर्मचारी व १६२ गृहरक्षक दलाचे जवान तैनात करण्यात आले होते.
दरम्यान, इचलकरंजी येथील राजीव गांधी भवनमध्ये गावागावांहून आणण्यात येणारी इलेक्ट्रॉनिक्स मतदान यंत्रे व अन्य साहित्य जमा करून घेण्याचे काम मध्यरात्री उशिरापर्यंत सुरू होते. जमा करून घेण्यात आलेली इलेक्ट्रॉनिक्स यंत्रे हातकणंगले येथील शासकीय धान्य गोदामामध्ये तात्पुरत्या निर्माण करण्यात आलेल्या स्ट्रॉँग रुममध्ये ठेवण्यात येणार आहेत, तर १९ आॅक्टोबरला मतमोजणी होणार असून, दुपारी एक वाजण्याच्या सुमारास मतदान निकालाचा कल निश्चित होण्याची शक्यता आहे.

1निवडणूक यंत्रणेची १०० मीटरची लाईन फक्त नावापुरतीच होती. मतदान केंद्राबाहेर १०० मीटरची लाईन प्रशासनाकडून आखण्यात आली होती. मात्र, सर्वच पक्षाचे कार्यकर्ते या रेषेच्या आतच ठाण मांडून बसले होते. मोटारसायकली, सर्व चार चाकी वाहने या लक्ष्मणरेषेच्या आतच ठाण मांडून होते. प्रशासन आणि बंदोबस्ताचे कर्मचारी यांना आदर्श आचारसंहितेचा विसर पडल्याचे यावरून स्पष्ट होत होते.
2मतदारसंघातील कॉँग्रेसचे उमेदवार जयवंतराव आवळे यांनी इचलकरंजी येथे, शिवसेनेचे डॉ. सुजित मिणचेकर आणि राष्ट्रवादीचे दत्ता घाटगे यांनी मिणचे गावामध्ये, तर जनसुराज्यचे राजीव आवळे यांनी हातकणंगलेत, तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमोद कदम यांनी तिळवणी गावामध्ये मतदानाचा हक्क बजावला.
3काँग्रेसचा बालेकिल्ला असलेला हा मतदारसंघ गेल्या दोन निवडणुकांमध्ये जनसुराज्य आणि शिवसेनेने काबीज केल्यामुळे यावेळी येथे कमालीची चुरस निर्माण झाली आहे. महायुती आणि आघाडीतील बिघाड्यांमुळे दुरंगी वाटणारा सामना चौरंगी झाला.

लोकसभा निवडणुकीत आघाडी व महायुतीमुळे दुरंगी लढत होऊन दोन ठिकाणी कार्यकर्ते मतदारांना आवाहन करीत असल्याचे चित्र दिसून आले होते, तर विधानसभा निवडणुकीत आघाडीत बिघाडी व महायुतीत फूट यांमुळे या निवडणुकीत शिरोळमध्ये चौरंगी लढत झाल्याने स्वतंत्र चार ठिकाणी उमेदवारांचे कार्यकर्ते मतदारांना आवाहन करीत असल्याचे चित्र दिसून आले.

शिरोली : शिरोली परिसरात विधानसभेसाठी सरासरी ७५ टक्के मतदान झाले. दिवसभर शांततेत मतदान पार पडले. शिवाजी परिसरातील शिरोली, नागाव, टोप, हालोंडी, मौजे वडगाव, संभापूर, कासारवाडी या गावांतील सर्वच पक्षांच्या स्थानिक नेत्यांनी दिवसभर आपापल्यापरीने अगदी ईर्ष्येने मतदारांना आणून मतदानाचा टक्का वाढविला. शिरोलीत ७५ टक्के, नागावमध्ये ७७ टक्के, तर टोपमध्ये ७५ टक्के मतदान झाले. स्थानिक नेत्यांचे लक्ष आता १९ तारखेच्या निकालाकडे लागले आहे.

शिरोळ विधानसभा निवडणुकीसाठी १० उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. यांपैकी चौरंगी लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे. त्यामध्ये कॉँग्रेसचे उमेदवार डॉ. सा. रे. पाटील, राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाचे उमेदवार डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी जयसिंगपूर येथील मतदान केंद्रात सकाळी मतदान केले, तर शिवसेनेचे उमेदवार उल्हास पाटील यांनी शिरोळ येथे तसेच स्वाभिमानी पक्षाचे उमेदवार सावकर मादनाईक यांनी उदगाव येथे मतदानाचा हक्कबजावला. दरम्यान, तालुक्यात एका उमेदवाराने दुसऱ्या उमेदवाराला पाठिंबा दिला, पैसे वाटप करताना एका कार्यकर्त्यांला पकडले, अशा अफवा पसरल्याने उलटसुलट चर्चा मतदारसंघात ऐकायला मिळाल्या. रात्री उशिरापर्यंत येथील निवडणूक कार्यालयात मतदानयंत्रे येत होती़ निवडणूक निर्णय अधिकारी विवेक आगवणे व सहायक निवडणूक अधिकारी तथा तहसीलदार सचिन गिरी यांच्या अध्यक्षतेखाली निवडणुकीचे कामकाज पार पडले़ पोलीस उपअधीक्षक प्रकाश घारगे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यात चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता़

Web Title: Ichalkaranji Range up to late ... Churus in Shirol

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.