‘स्मार्ट सिटी’साठी इचलकरंजीची तयारी
By Admin | Updated: July 15, 2015 21:25 IST2015-07-15T21:25:05+5:302015-07-15T21:25:05+5:30
दहा वर्षांत वेगाने वाढणारे शहर असा नावलौकिक आहे. येथे वस्त्रोद्योगाच्या वाढीला पोषक वातावरण आहे.

‘स्मार्ट सिटी’साठी इचलकरंजीची तयारी
इचलकरंजी : केंद्र सरकारच्या ‘स्मार्ट सिटी’चे निकष पाहता आणि राज्यातील वस्त्रोद्योगातील अग्रेसर शहर म्हणून इचलकरंजीचा स्मार्ट सिटीमध्ये समावेश होऊ शकतो. त्यामुळे नगरपालिकेतील खातेप्रमुखांनी विहीत नमुन्यात अहवाल तयार करावा, असे निर्देश मुख्याधिकारी सुनील पवार यांनी पालिकेतील अधिकाऱ्यांना दिले.‘स्मार्ट सिटी’मध्ये राज्यातील दहा शहरे निवडली जाणार आहेत. त्यासाठी असलेले निकष पाहता इचलकरंजीची निवड होऊ शकते. तसेच इचलकरंजी हे देशातील वस्त्रोद्योगात अग्रेसर असलेले शहर आहे. येथील दरडोई उत्पन्नही लक्षणीय असून, अलीकडील दहा वर्षांत वेगाने वाढणारे शहर असा नावलौकिक आहे. येथे वस्त्रोद्योगाच्या वाढीला पोषक वातावरण आहे. सूतगिरण्या, सायझिंग कारखाने, यंत्रमाग-आॅटोलूम्स, प्रोसेसर्स
कारखाने आणि सूत व कापड व्यापारी पेढ्या ही वस्त्रोद्योगाची साखळी इचलकरंजीत स्वयंपूर्ण आहे. आर्थिक पुरवठा करणाऱ्या बॅँका, ‘डीकेटीई’सारखी शैक्षणिक व संशोधन करणारी संस्था, त्यांच्याकडे असलेले नॉन ओव्हन टेक्स्टाईलचे केंद्र यादृष्टीनेही या वस्त्रनगरीत पूर्तता आहे. याशिवाय केंद्र सरकारच्या वाणिज्य मंत्रालयाने ‘निर्यातीभिमुख’ केंद्राचा दर्जा इचलकरंजीस दिला आहे. त्यादृष्टीने स्मार्ट सिटीसाठी प्रकल्प अहवाल तयार केला जात आहे.वास्तविक पाहता येथील लोकप्रतिनिधी व नगरपालिका यांनी स्मार्ट सिटीसाठी जोरदार प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे, अशी मागणी उद्योजक व नागरिकांतून होत आहे. (प्रतिनिधी)