इचलकरंजीतील खुनाचा उलगडा

By Admin | Updated: July 17, 2014 00:17 IST2014-07-16T23:48:23+5:302014-07-17T00:17:46+5:30

आरोपी अल्पवयीन : आर्थिक देवघेव, ठार मारण्याची धमकी दिल्याने कृत्य

Ichalkaranji murder case | इचलकरंजीतील खुनाचा उलगडा

इचलकरंजीतील खुनाचा उलगडा

इचलकरंजी : येथील महादेव इराप्पा टकळगी या तरुणाच्या खूनप्रकरणी संशयित अल्पवयीन तरुणास शिवाजीनगर पोलिसांनी आज, बुधवारी अटक केली. लोकांची देणी भागविण्यासाठी वारंवार पैशांची मागणी करून जीवे मारण्याची धमकी देत असल्याच्या कारणावरून चिडून महादेवचा खून केल्याची कबुली संशयित आरोपीने दिली आहे.
याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, संबंधित संशयित अल्पवयीन आरोपी हा गावभाग, नरसोबा कट्टा, परीट गल्ली येथे राहतो. तो एका दूध डेअरीमध्ये कामगार आहे. मृत महादेव व अल्पवयीन संशयित आरोपी हे दोघे बऱ्याच वर्षांपासून मित्र आहेत. महादेव हा चैनीखोर असल्यामुळे त्याला पगार पुरत नव्हता. म्हणून त्याने अनेक ठिकाणी उसने पैसे घेतले होते. ते पैसे भागविण्यासाठी तो आरोपीकडे वारंवार पैशांची मागणी करीत होता. पंधरा दिवसांपूर्वी महादेव याने दहा हजार रुपयांची मागणी केली आणि पैसे न दिल्यास ठार मारण्याची धमकी दिली होती. या कारणावरून त्यावेळी दोघांच्यात किरकोळ वादावादी झाली. त्यावेळी महादेव याने संबंधित आरोपीस किरकोळ मारहाणही केली होती. याचा राग मनात धरून आरोपीने महादेव आपल्याला मारण्याअगोदर आपणच त्याचा काटा काढू, असे मनात ठरवले.
सोमवारी सायंकाळी संशयित आरोपीने महादेव याला मोबाईलवर फोन करून आज रात्री जेवायला जायचे आहे, असे सांगून बोलावले. महादेव कामावरून येऊन नरसोबा कट्टा चौकात आपल्या अन्य मित्रांसोबत बोलत थांबला होता. तेथून अल्पवयीन आरोपीने महादेव याला बोलावून सोबत घेऊन दोघेजण नदीवेस नाक्याजवळ असलेल्या पेट्रोल पंपाच्या बारजवळ आले. तेथे महादेव याने आरोपीकडून दारूसाठी पैसे घेतले. आरोपीने पैसे देऊन मी आत येणार नाही, तू पाठीमागच्या मोकळ्या जागेत दारू घेऊन ये, असे सांगून तो पुढे गेला. महादेव दारू घेऊन ठरलेल्या ठिकाणी गेला. तेथे महादेव याला दारू पाजवली. महादेव नशेत असताना संशयित आरोपीने त्याच्या मागील बाजूस जाऊन मोठा दगड घेऊन त्याच्या मानेच्या वरच्या बाजूला डोक्यात घातला. महादेव डाव्या बाजूवर कोसळला. नशेत असल्यामुळे त्याला काही समजायच्या आत आरोपीने सोबत आणलेल्या जांबियाने सपासप वार केले. दुसऱ्या बाजूला जाऊन पुन्हा वार केले. धुंदीत किती वार केले, हेही संशयित आरोपीच्या लक्षात आले नाही. बघता-बघता ४० ते ४२ वार करून हत्यार तेथेच टाकून संशयित फरार झाला.
खून केल्यानंतर आरोपी मेन रोडला येऊन तेथून रस्त्याने जाणाऱ्या मोटारसायकलस्वारांकडे लिफ्ट घेऊन रांगोळी, रेंदाळ, यळगूड, सांगाव मार्गे कागल गाठले. कागल स्टॅण्डवर रात्र काढून सकाळी कर्नाटकातील खेबूड गावी आपल्या आत्त्याकडे गेला. पोलिसांनी तपासासाठी अन्य मित्रांकडे चौकशी करून माग काढत कर्नाटकातील खेबूड परिसरातून त्याला आज, बुधवारी अटक केली. (प्रतिनिधी)
संशयित अल्पवयीन आरोपीने काही महिन्यांपूर्वी कर्नाटकातील चिंचली यात्रेतून हत्यार खरेदी केले होते. त्यानंतर गावभागातील धार लावणाऱ्यांकडून गेल्या आठवड्यात त्याने धार लावून घेतली व ठरवून खून केल्याची कबुली दिली.

Web Title: Ichalkaranji murder case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.