इचलकरंजीत अल्पदरात कर्जाच्या आमिषाने गंडा
By Admin | Updated: September 5, 2014 23:23 IST2014-09-05T21:38:30+5:302014-09-05T23:23:50+5:30
तक्रार दाखल : बंगलोरच्या कंपनीची जाहिरात

इचलकरंजीत अल्पदरात कर्जाच्या आमिषाने गंडा
इचलकरंजी : अल्पदरात कर्ज देण्याचे आमिष दाखवून येथील लिगाडे मळ्यात राहणाऱ्या गजाननसिंग भगतसिंग रजपूत यांची ४६ हजार ५०० रुपयांची फसवणूक झाल्याची तक्रार शिवाजीनगर पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे. सरस्वती फायनान्स प्रा. लि. बंगलोर-कर्नाटक या कंपनीमार्फत फसव्या जाहिराती देऊन ही फसवणूक करण्यात आली आहे.
पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, १६ जानेवारी २०१४ रोजी सरस्वती फायनान्स कंपनीची ‘बेरोजगारांना अल्पदरात कर्ज’ अशी जाहिरात बघून रजपूत यांनी संबंधित कंपनीत फोन लावला. तेथे व्यवस्थापक अमित कुमार यांनी तुम्हाला तुमच्या शिक्षणानुसार दोन लाख रुपये कर्ज मिळू शकते. त्यासाठी कागदपत्रे कंपनीच्या
ई-मेलवर पाठवा, असे सांगितले. १९ जानेवारीला रजपूत यांनी कागदपत्रे पाठविली. लगेचच २० जानेवारीला कंपनीचा त्यांना फोन आला. तुमचे कर्ज मंजूर झाले असून, त्यासाठी तीन हजार रुपये कंपनीच्या खात्यावर भरा, असे सांगण्यात आले. त्यानुसार रजपूत यांनी कंपनीच्या बॅँक खात्यावर तीन हजार रुपये भरले. त्यानंतर वेळोवेळी २४ तारखेपर्यंत कंपनीने वेगवेगळी कारणे पुढे करीत दहा, वीस व तेरा हजार ५०० असे एकूण ४६ हजार ५०० रुपये रजपूत यांच्याकडून खात्यावर भरून घेतले. त्यानंतर पुन्हा कर्ज ट्रान्स्फर करण्यासाठी १५०० रुपयांची मागणी केली. मात्र, कंपनी आपल्याकडून वेळोवेळी पैसे भरून घेत आहे. कर्ज मात्र देत नाही, असे लक्षात आल्याने रजपूत यांनी पैसे भरण्यास नकार दिला.त्यानंतर त्यांनी कर्ज द्या, मगच पैसे भरतो, असा कंपनीकडे तगादा लावला. काही दिवसांतच कंपनीने जाहिरातीत दिलेले फोन नंबर स्विच आॅफ झाले. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात
आले. म्हणून रजपूत यांनी आज, शुक्रवारी येथील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात याबाबत फसवणुकीची तक्रार नोंद केली आहे. अधिक तपास सहायक फौजदार आर. के. कांबळे करीत आहेत. (प्रतिनिधी)