इचलकरंजीत राष्ट्रवादीला खिंडार
By Admin | Updated: December 29, 2016 01:01 IST2016-12-29T01:01:11+5:302016-12-29T01:01:11+5:30
जांभळे गट ‘भाजप-ताराराणी’बरोबर : बेरजेच्या राजकारणात हाळवणकरांना यश

इचलकरंजीत राष्ट्रवादीला खिंडार
इचलकरंजी : येथील नगरपालिकेच्या सत्तेत नाट्यमय घडामोडी घडून बेरजेचे राजकारण करण्यात आमदार सुरेश हाळवणकर यांना यश आले आहे. राष्ट्रवादीच्या जांभळे गटाने सात नगरसेवकांशी भाजपशी हातमिळवणी केल्याने कॉँग्रेस आघाडीला खिंडार पडले आहे. माजी मंत्री प्रकाश आवाडे यांच्यासाठी हा मोठा धक्का आहे.
नगरपालिका निवडणुकीत थेट नगराध्यक्षपदासाठी भाजपला यश मिळाले असले, तरी भाजप-ताराराणी आघाडीची सदस्य संख्या कमी असल्याने त्यांना सभागृहात बहुमत नव्हते. या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाची भूमिका व्यक्त करताना आमदार हाळवणकर यांनी सत्ता स्थापन करण्यासाठी एखादा गट आपल्यासोबत येत असेल, तर त्यांना योग्य बहुमान दिला जाईल. मात्र, बेरजेचे राजकारण करण्यासाठी घोडेबाजार केला जाणार नाही, असे स्पष्ट केले होते. त्यावेळी भाजप-ताराराणी आघाडीकडून कारंडे-जांभळे यांच्याकडे विचारणा झाली होती. मात्र, पदाधिकारी निवडीसाठी वेळ असल्याने निर्णय झाला नव्हता.
नगराध्यक्षा अलका स्वामी यांनी ३० डिसेंबरला पदाधिकारी निवडीसाठी सभा बोलविली आहे. या पार्श्वभूमीवर मंगळवारी (दि. २७) मध्यरात्री जांभळे यांच्या माणगाव (ता. हातकणंगले) येथील कारखान्यात झालेल्या बैठकीत जांभळे यांनी संमती दर्शविली. भाजप-ताराराणी व जांभळे गटाच्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या झालेल्या चर्चेत जांभळे गटाला पहिल्यावर्षी बांधकाम व पाणीपुरवठा अशा दोन समित्या देण्याचे ठरले. तसेच जांभळे गटातील माजी नगरसेवक रवी माने यांना ताराराणी आघाडीतून स्वीकृत नगरसेवक करण्याचेही ठरले. त्याचबरोबर एक वर्षानंतर बांधकाम समिती जांभळे गटाकडे कायम ठेवत पाणीपुरवठा समिती व उपनगराध्यक्ष ताराराणी आघाडीकडे, तर आरोग्य, शिक्षण, महिला बालकल्याण आणि मागासवर्गीय या चार समित्या पाच वर्षांसाठी भारतीय जनता पक्षाकडे ठेवण्याचे ठरले असल्याचे अजित जाधव यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
पक्षीय बलाबल
भाजप-१६, ताराराणी आघाडी-११, राष्ट्रवादी-७, कॉँग्रेस-१८, राजर्षी शाहू आघाडी-१० असे पक्षीय बलाबल आहे. नव्या समीकरणानुसार भाजप-ताराराणी-राष्ट्रवादी असे ३४ सदस्य सत्ता स्थापन करणार, तर विरोधी पक्षात कॉँग्रेस-शाहू आघाडी असे २८ सदस्य राहणार आहेत.
ठरल्याप्रमाणे ‘स्वीकृत’चे अर्ज दाखल
स्वीकृत नगरसेवकपदासाठी बुधवारी प्रांताधिकाऱ्यांकडे भारतीय जनता पक्षाकडून अजित जाधव, ताराराणी आघाडीकडून रवींद्र माने व राष्ट्रवादीकडून राजू खोत यांचे अर्ज दाखल केले. यावेळी नगराध्यक्षा अलका स्वामी, अशोक जांभळे, तानाजी पोवार, भाऊसाहेब आवळे, सागर चाळके, आदींसह नगरसेवक उपस्थित होते.