लोकमत न्यूज नेटवर्क
इचलकरंजी : शहर व परिसरात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने प्रशासनाने संचारबंदी लागू केली. तरीही रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यामुळे प्रशासनाने ११ ते १६ मेपर्यंत जनता कर्फ्यूचा निर्णय जाहीर केला. पुढील काही दिवस बाजार बंद असल्यामुळे शहरात नागरिकांची खरेदीसाठी तुडुंब गर्दी पहायला मिळाली. प्रशासनाला गर्दीवर नियंत्रण मिळविणे अवघड बनले आहे.
शहरात कोरोना रुग्णांची संख्या पाच हजार ६६४ वर गेली असून, २६० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग झपाट्याने वाढत असल्यामुळे प्रशासनासह वैद्यकीय सेवावरही मोठा ताण पडत आहे. कोरोना संसर्ग कमी करण्यासाठी नागरिकांना अत्यावश्यक सेवेच्या खरेदीसाठी सकाळी सात ते अकरा वाजेपर्यंतची वेळ मर्यादा घालून दिली आहे. ठराविक वेळेतच बाजार करावा लागत असल्याने शहरात तुफान गर्दी होत आहे. यामध्ये शासन निर्णयाचे सर्रास उल्लंघन होत आहे. त्यामुळे कडक भूमिका घेत जनता कर्फ्यू करण्याचा निर्णय घेतला.
प्रशासन कोरोनाची साखळी ब्रेक करण्याच्या दृष्टिकोनातून निर्णय घेत आहे. ठराविक वेळेत व नियमानुसार आस्थापना व उद्योग व्यवसायासाठी परवानगी दिली आहे; मात्र या नियमाला छेद देत सर्व व्यवहार सुरूच आहेत. त्यामुळे 'चेन द ब्रेक' ही शासनाची संकल्पना अयशस्वी ठरत आहे. दरम्यान, नगरपालिका व पोलीस प्रशासनाने अकरा वाजता बाजारात कारवाई करण्यास सुरुवात केली. विनाकारण फिरणाऱ्यांवर तसेच मर्यादित वेळेनंतरही सुरू असणाऱ्या आस्थापनांवर दंडात्मक कारवाई केली.
चौकट
अर्धे शटर उघडून आस्थापना सुरू
अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व आस्थापना बंदचा निर्णय घेण्यात आला आहे. तरीही शहरातील मुख्य मार्गावरील व अंतर्गत भागात अनेक आस्थापने अर्धे शटर उघडून, तर काही जण बिनधास्त व्यवहार करत होते. शासन निर्णयाला वाटाण्याच्या अक्षता देत आस्थापनाधारकांनी ग्राहकांना सेवा देत होते.
शुक्रवारच्या सणाची खरेदी जोमात
साडेतीन मुहूर्तांपैकी एक अक्षयतृतीया व रमजान ईद हे महत्त्वाचे दोन सण शुक्रवार (दि.१४) एकाच दिवशी आहेत. मंगळवारपासून जनता कर्फ्यू असल्याने सकाळपासूनच बाजारपेठेत तुफान गर्दी होती. अनेकांना कोरोनापेक्षा सण महत्त्वाचा वाटत असल्यासारखे बिनदिक्कत जोमाने खरेदी करत असल्याची परिस्थिती बाजारात होती.
फोटो ओळी
११०५२०२१-आयसीएच-०८
इचलकरंजीतील मुख्य मार्गावर खरेदीसाठी मोठी गर्दी झाली होती.
छाया-अनंतसिंग
११०५२०२१-आयसीएच-०९
सणाच्या पार्श्वभूमीवर खरेदीसाठी रस्त्याकडेला विक्रेते व ग्राहकांनी गर्दी केली होती.
छाया-उत्तम पाटील