इचलकरंजीतील टोळीला ‘मोक्का’
By Admin | Updated: July 24, 2016 00:59 IST2016-07-23T23:35:54+5:302016-07-24T00:59:44+5:30
आठजणांचा समावेश : अप्पर पोलिस अधीक्षक दिनेश बारी यांची माहिती

इचलकरंजीतील टोळीला ‘मोक्का’
इचलकरंजी : शहरासह परिसरातील तारदाळ भागात खून, खुनाचा प्रयत्न, खंडणी, अपहरण, हाणामारी, विना परवाना हत्यार बाळगणे, असे दहा गंभीर गुन्हे दाखल असलेल्या अमोल अशोक माळी (रा. तारदाळ) याच्यासह आठजणांवर मोक्का (महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी) कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आल्याची माहिती अप्पर पोलिस अधीक्षक दिनेश बारी यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली. मोक्काअंतर्गत इचलकरंजी परिसरात ही पहिलीच कारवाई आहे.
या टोळीत अमोल याच्यासह सूरज मनोहर शिर्के (वय २०), अजय भानुदास कुलकर्णी (२९), अनिल संपत मोळे (३१, सर्व रा. श्रीरामनगर तारदाळ), तौफिक अब्दुल शिरगुप्पे (३१), बसवेश्वर ऊर्फ राहुल विश्वनाथ एकोंडे (२१), अमोल प्रभाकर कोंडारे (२६, तिघे रा. आझादनगर, तारदाळ) व अक्षय बबन कल्ले (रा. शहापूर) यांचा समावेश आहे. संघटित गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी ही पहिली कारवाई केली असून, शहर व परिसरातील अन्य गुन्हेगारांवरही अशी कारवाई करण्यात येणार आहे, असेही बारी यांनी सांगितले.
माळी याच्यावर विजय चिंचणलकर, सचिन ऊर्फ पिंटू जाधव व अजित वाघमारे यांच्या खुनाचे गुन्हे नोंद आहेत. त्याशिवाय गावभाग, शिवाजीनगर, हातकणंगले, शहापूर, आदी पोलिस ठाण्यात विविध गुन्हे दाखल आहेत. या टोळीने तारदाळ व इचलकरंजी परिसरातील उद्योजक, व्यावसायिकांकडून खंडणी उकळणे, अवैध व्यवसायांच्या माध्यमातून झटपट श्रीमंत होणे शिवाय राजकीय पार्श्वभूमीचा गैरफायदा घेत परिसरात वर्चस्व निर्माण करण्यात अग्रेसर होते.
या वर्चस्व वादातूनच अजित वाघमारे याचा खून झाल्याचे तपासात समोर आले होते. एप्रिल २०१६ मध्ये वाघमारे याचे अपहरण करून, त्याचा दगडाने ठेचून खून करून मृतदेह कर्नाटकमधील शेडबाळ या गावच्या हद्दीत टाकण्यात आला होता. शहापूर पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावत वरील सातजणांना अटक केली. तर मुख्य सूत्रधार अमोल माळी हा अद्याप फरार आहे.
पत्रकार बैठकीस पोलिस उपअधीक्षक विनायक नरळे, शिवाजीनगरचे पोलिस निरीक्षक सर्जेराव गायकवाड, गावभागचे अरुण पवार, स्थानिक गुन्हे शाखेचे संतोष डोके, आदी उपस्थित होते. (वार्ताहर)
विश्वास नांगरे-पाटील यांच्या सूचनेनुसार कारवाई
शहर आणि परिसरातील वाढती गुंडगिरी व गुन्हेगारी याचा बिमोड करण्यासाठी कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे यांनी सूचना केल्या आहेत. त्यानुसार शहापूरचे पोलिस निरीक्षक सतीश पवार यांनी मोका कायद्यान्वये या टोळीचा प्रस्ताव तयार करून तो विशेष पोलिस महानिरिक्षक विश्वास नांगरे-पाटील यांच्याकडे पाठविला होता. त्याप्रमाणे मोक्काअंतर्गत कलमे लावून तो पुढील तपासासाठी करवीर विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी अमरसिंह जाधव यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.
या टोळीवरील गुन्हे
सर्व आठही संशयित रेकॉर्डवरील गुन्हेगार असून, त्यांच्यावर खुनाचे तीन, खुनासाठी मनुष्य पळविणे एक, खंडणीचे दोन, परवाना नसताना शस्त्रे बाळगण्याचा एक, तर मारामारीचे चार, असे एकूण दहा गंभीर गुन्हे दाखल आहेत.