इचलकरंजीला दोन दिवसांतून एकदा पाणी

By Admin | Updated: March 12, 2015 00:09 IST2015-03-11T22:19:54+5:302015-03-12T00:09:10+5:30

उन्हाळ्याबरोबर टंचाईचे चटके : नागरिक, महिला वर्गातून संताप, ‘नदी उशाला आणि कोरड घशाला’ या म्हणीप्रमाणे अवस्था

Ichalkaranji gets water once in two days | इचलकरंजीला दोन दिवसांतून एकदा पाणी

इचलकरंजीला दोन दिवसांतून एकदा पाणी

अतुल आंबी - इचलकरंजी -उन्हाळ्याची सुरुवात झाली आणि नागरिकांना पाणीटंचाईची झळ बसू लागली. ‘नदी उशाला आणि कोरड घशाला’ या म्हणीप्रमाणे इचलकरंजीवासीयांची अवस्था झाली आहे. वर्षभर एक दिवसआड येणारे पाणी आता दोन ते तीन दिवसआड मिळत आहे.विविध राजकीय पक्षांनी निवडणुकीपूर्वी २४ बाय ७ ची घोषणा केली असली तरी दिवसातून एकवेळ पाणी देणेसुद्धा नगरपालिकेला आजतागायत जमले नाही. त्यामुळे नेमके पाणी मुरते कुठे, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.
शहरात ५४ एमएलडी (दशलक्ष लिटर) पाणी शुद्धिकरण प्रकल्प सध्या कार्यान्वित असून, आणखीन एक ५४ एमएलडीचा शुद्धिकरण प्रकल्प उभारण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. शहराला पंचगंगा व कृष्णा या दोन नद्यांतून पाणीपुरवठा करणाऱ्या योजना आहेत. या योजनांमधून प्रकल्पाला ४० एमएलडी पाणीपुरवठा होतो. मात्र, नगरपालिकेचे योग्य नियोजन नसल्याने पाणीपुरवठा सुरळीत होऊ शकत नाही. ४० एमएलडी पाण्यामधील शुद्ध केलेले ३० टक्के पाणी नळांना तोट्या नसल्याने वाया जाते. दहा टक्के कारखान्यांना वापर केला जातो. कारखान्यांमध्ये शुद्ध पाण्याची आवश्यकता नसताना हे पाणी वाया जाते.त्याचबरोबर शहरात नवी-जुनी अशी एकूण सुमारे एक हजार किलोमीटर पाईपलाईन करण्यात आली आहे. यामध्ये जुनी नलिका न काढता नवीन बसविल्याने दोन्ही नळ्यांमध्ये पाणी खेळल्याने नागरिकांना कमी दाबाने पाणीपुरवठा होतो. काही भागात ‘वशिला’ असलेल्या नागरिकांनी बेकायदेशीररित्या अर्धा-पाऊण इंची जोडणी घेतली आहे. याचाही पाणीपुरवठ्यावर विपरित परिणाम होतो. नळांना मीटर बसविणे. त्याचबरोबर बेकायदेशीर जोडण्या बंद करणे, यासह जुन्या पाईपलाईन थांबवून एकमार्गी नवीन पाईपलाईनमधून पाणी देणे यासारख्या उपाययोजना करून नगरपालिकेने योग्य पद्धतीने नियोजन केल्यास सध्या प्रकल्पात येणारे ४० एमएलडी पाणीसुद्धा दररोज नागरिकांना पुरवठा करता येणे शक्य आहे. हे नियोजन नसल्याने एक दिवसआड मिळणारे पाणी आता गेल्या वीस दिवसांपासून दोन-तीन दिवसांआड मिळत आहे. त्यामुळे नागरिक व महिला वर्गातून संताप व्यक्त केला जात आहे.

Web Title: Ichalkaranji gets water once in two days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.