इचलकरंजीला तीन दिवसांतून एकदा पाणी
By Admin | Updated: March 7, 2017 00:07 IST2017-03-07T00:07:16+5:302017-03-07T00:07:16+5:30
पंचगंगेचे पाणी दूषित : मजरेवाडी येथील कृष्णा नदीतूनच उपसा; ऐन उन्हाळ्यात नागरिकांचे हाल

इचलकरंजीला तीन दिवसांतून एकदा पाणी
इचलकरंजी : पंचगंगा नदीतील पाण्याची पातळी खालावण्याबरोबरच पात्रातील पाणी दूषित झाल्यामुळे सोमवारपासून नदीतील उपसा बंद करण्यात आला आहे. त्यामुळे यापुढे ऐन उन्हाळ्यात शहरवासीयांना कृष्णा नदीतील पाण्यावरच अवलंबून राहावे लागणार असल्यामुळे तीन दिवसांतून एकवेळ पाणीपुरवठा होणार असून, नागरिकांचे हाल होणार आहेत.
इचलकरंजी शहरातील नागरिकांबरोबच येथे कामासाठी येणाऱ्या कामगारांना दररोज मोठ्या प्रमाणात पाणी लागते. मात्र येथील पंचगंगा नदीपात्रातील पाण्याची पातळी कमालीची घटल्यामुळे तसेच नदीपात्रातील पाण्यामध्ये मोठ्या प्रमाणावर प्रदूषण झाल्याने नगरपालिका प्रशासनाने पंचगंगा नदीतून पाणी उपसा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याप्रमाणे सोमवारी दुपारी दोन वाजल्यापासून पंचगंगा नळ पाणीपुरवठा योजना बंद ठेवली. आता मजरेवाडी (ता. शिरोळ) येथील कृष्णा नदीतील पाणी उपशावरच शहरवासीयांना अवलंबून राहावे लागणार आहे.
सध्या कृष्णा नदीमध्ये पाणीपातळी २२१.७० मीटर असून, मजरेवाडी जॅकवेलमधील पाणी उपसा करणारे दोन्ही पंप सुरू आहेत. मात्र, पंचगंगा नळ पाणीपुरवठा योजना बंद ठेवल्याने शहराच्या पाणीपुरवठ्यात २० टक्के कपात करण्यात येईल. तीन दिवसांनंतर सुमारे दीडतास नळाला येणारे पाणी तासभरच ठेवण्याचा निर्णय पाणीपुरवठा विभागाने घेतला असल्याची माहिती जलअभियंता सुरेश कमळे यांनी दिली. (प्रतिनिधी)