इचलकरंजीत शिवजयंती उत्साहात

By Admin | Updated: May 9, 2016 00:34 IST2016-05-09T00:24:27+5:302016-05-09T00:34:52+5:30

शिवप्रेमींच्या भव्य मिरवणुका : ५४ मंडळांची एकत्रित मशाल मिरवणूक ठरली लक्षवेधी

Ichalkaranji to celebrate Shiv Jayanti | इचलकरंजीत शिवजयंती उत्साहात

इचलकरंजीत शिवजयंती उत्साहात

इचलकरंजी : पारंपरिक पद्धतीने साजरी करण्यात येणारी शिवजयंती रविवारी शहर व परिसरामध्ये मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली. पहाटेपासूनच शहरातील विविध परिसरांमध्ये असलेल्या शिवप्रेमी मंडळांनी ज्योत घेऊन मिरवणुका काढल्या. भगवे फेटे, भगवे ध्वज घेतलेल्या युवकांनी गटागटाने मोटारसायकली मिरवणुका काढल्या. अशा प्रकारचा हा शिवजयंतीचा उत्सव अभूतपूर्व उत्साहात आणि मोठ्या संख्येने साजरा करण्यात आला. युवा वर्गाचा उत्साह आणि मोटारसायकलींचा होणारा वापर पाहता पोलिसांनी शहर व परिसरात पहाटेपासूनच मोठा बंदोबस्त तैनात केला होता.
दरम्यान, मंगळवार पेठेमधील ५४ विविध मंडळांनी एकत्र येऊन शनिवारी रात्री भव्य अशी मशाल मिरवणूक काढली होती. पारंपरिक पद्धतीने काढण्यात आलेली ही मिरवणूक नागरिकांचे आकर्षण ठरली.
पन्हाळगडावरून शिवज्योत घेऊन येणाऱ्या तरुणांचे मध्यरात्रीपासूनच शिवाजी पुतळा चौकात स्वागत करण्यात येत होते. शिवज्योत घेऊन येणारे शिवप्रेमी शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करीत होते. दरम्यान, पहाटे पावणे सहाच्या सुमारास माजी मंत्री प्रकाश आवाडे व नगरसेवक रवी रजपुते यांच्या हस्ते शिवाजी पुतळा चौकातच असलेल्या स्वागत कक्षाचा प्रारंभ झाला. त्यांनी काही मंडळांच्या कार्यकर्त्यांना भगवी टोपी देऊन स्वागत केले. यावेळी शिस्तबद्ध रितीने व शांततेने शिवजयंती साजरी करण्याचे आवाहन आवाडे यांनी केले.
दिवसभरामध्ये आमदार सुरेश हाळवणकर, नगराध्यक्ष शुभांगी बिरंजे, उपनगराध्यक्ष महावीर जैन, आदींसह नगरसेवक-नगरसेविका, विविध संस्थांचे पदाधिकारी, अनेक मंडळे व क्रीडा मंडळांचे प्रमुख यांनी शिवाजी पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. मध्यरात्रीपासून शिवजयंतीच्या निमित्ताने काढण्यात येणाऱ्या मिरवणुका पाहता शिवप्रेमींचा उत्साह उदंड असल्याचे लक्षात येत होते. अशा या मिरवणुका रविवारी रात्री उशिरापर्यंत सुरू होत्या.
दरम्यान, शनिवारी रात्री नऊच्या सुमारास शिवाजी पुतळा चौकातून संयुक्त मंगळवार पेठ मंडळाकडून मशाल मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीमध्ये दोनशे मशाली घेऊन पारंपरिक वेशात सहभागी झालेले युवक व नऊवारी साड्या परिधान करून भाग घेतलेल्या महिला व युवती नागरिकांचे लक्ष वेधून घेत होत्या. मिरवणुकीमध्ये पारंपरिक वाद्ये होती. शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित सजीव देखावे, जय मल्हार मालिकेचा देखावा, घोडेस्वार, उंट, रथ हे लोकांच्या आकर्षकाचे केंद्र होते. मध्यरात्रीनंतर एकच्या सुमारास महात्मा गांधी पुतळा येथे आकर्षक आतषबाजी करून मिरवणुकीची सांगता झाली.
चारा छावणीसाठी
४० हजार रुपये
शिवजयंती साजरी करण्यासाठी येथील स्वामी विवेकानंद कॉलनीमधील नागरिकांनी जमा केलेल्या देणगीपैकी ४० हजार रुपयांचा धनादेश विश्व हिंदू परिषदेच्या दुष्काळ भागातील चारा छावणीला मंडळाकडून देण्यात आला. हा धनादेश कॉलनीचे अध्यक्ष सुजित कांबळे यांच्या हस्ते विहिंपचे जिल्हा कार्याध्यक्ष संतोष कोळी उर्फ बाळ महाराज यांनी स्वीकारला. (प्रतिनिधी)
हेर्लेत भव्य रॅली
हेर्ले : हेर्ले (ता. हातकणंगले) येथे शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. पन्हाळागडावरून आणलेल्या शिवज्योतीचे पूजन हातकणंगले पंचायत समितीचे सभापती राजेश पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यानंतर गावातील मुख्य मार्गावरून युवकांनी भव्य मोटारसायकल रॅली काढली. झेंडा चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ््याचे पूजन सभापती राजेश पाटील, शिवसेना ग्राहक संरक्षक कक्ष उपजिल्हाप्रमुख विजय भोसले, माजी उपसरपंच कपिल भोसले, महेश जाधव, शरद माने, अर्जुन पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
कोडोलीत मिरवणूक
कोडोली : कोडोली (ता. पन्हाळा) येथे शिवजयंतीनिमित्त ढोल, ताशे, लेझीम या वाद्यांसह हत्ती, घोडे या लवाजम्यासह आतषबाजी करीत उत्साही वातावरणात भव्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीचे उद्घाटन केखले येथील शिवभक्त के . एन. पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजी मंत्री विनय कोरे, सरपंच विद्यानंद पाटील, उपसरपंच नितीन कापरे, अमरबाबा पाटील, अशोकराव शंकरराव पाटील, ग्रामपंचायत सदस्य तसेच विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.

गडहिंग्लज शहर बनले शिवमय
 

Web Title: Ichalkaranji to celebrate Shiv Jayanti

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.