इचलकरंजी व परिसरातील यंत्रमागधारक संकटात
By Admin | Updated: September 1, 2014 23:50 IST2014-09-01T23:21:54+5:302014-09-01T23:50:02+5:30
कापड गाठी वाहतुकीचा संप : सहाशे ट्रक माल पडून

इचलकरंजी व परिसरातील यंत्रमागधारक संकटात
घन:शाम कुंभार -यड्राव -इचलकरंजी व परिसरातील उत्पादन होणारे कापड राजस्थानमधील पाली व जोधपूर येथे मोठ्या प्रमाणात जाते. त्या कापडकाठी वाहतुकीचे दर वाढवून घेण्यासाठी येथील वाहतूक कंपन्यांनी वाहतूक बंद केली आहे. यामुळे सुमारे पंधरा दिवसांपासून सहाशे ट्रक माल पडून राहिल्याने यंत्रमागधारक आर्थिक संकटात सापडला आहे. यामध्ये क्लॉथ मर्चट असोसिएशन व वाहतूक कंपनीमध्ये समन्वय होत नसल्याने यातून मार्ग काढण्यासाठी लोकप्रतिनिधींनी लक्ष घालण्याची गरज निर्माण झाली आहे.
इचलकरंजी व परिसरामध्ये केंब्रिक व मलमलचे सुमारे सव्वा कोटी मीटर कापडाचे उत्पादन होते. हे कापड पुढील प्रक्रियेसाठी राजस्थानमधील पाली व जोधपूर येथे मोठ्या प्रमाणात जाते. एका ट्रकमधून अडीचशे गाठीची वाहतूक होते. याप्रमाणे दररोज चाळीस ट्रक पाली-जोधपूरकडे जातात. इचलकरंजी येथील सात ते आठ वाहतूकदार कंपन्यांच्या माध्यमातून कापड गाठीची वाहतूक केली जाते.
पाली येथे कापडगाठी पोहोचल्यावर प्रती गाठ २८० रुपये असे वाहतूक भाडे आहे, ते भाडे चारशे दहा रुपये मिळावे, अशी वाहतूक कंपनीची मागणी आहे. भाडेवाढ देण्यास पाली येथील ग्राहक तयार नसल्याने वाहतूकदारांनी कापडगाठी वाहतूक न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे गेल्या पंधरा दिवसांपासून पाली-जोधपूर कापडगाठी वाहतूक ठप्प झाली आहे. त्यामुळे अंदाजे सहाशे ट्रक कापड पडून राहिले आहे. परिणामी यंत्रमागधारकांना आर्थिक अडचणीस सामोरे जावे लागत असून इचलकरंजीच्या आर्थिक व्यवहारावर विपरीत परिणाम होत आहे. क्लॉथ मर्चंट असोसिएशन व वाहतूकदार कंपनी याकडे गांभीर्याने पाहत नसल्याने त्यांच्यामध्ये समन्वय होत नाही. याचा फटका सर्वसामान्य यंत्रमागधारकांना बसत आहे. पर्यायाने अडत्यास कमी दरात कापड विक्री करून स्वत:च्या कारखान्यातील कापडगाठींची संख्या कमी करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे आर्थिक अडचण निर्माण होत आहे.यंत्रमाग व कापड यावर निर्भर असलेल्या इचलकरंजीचा हा मुख्य उद्योग आहे. उत्पादित झालेला माल संबंधित व्यापाऱ्यांना पोहोचला तर पुढच्या मालाचा उठाव होणार यासाठी वाहतूक दर योग्य तो ठरविण्यासाठी उत्पादक व वाहतूकदार यांच्यामध्ये समन्वय होणे गरजेचे आहे. यासाठी लोकप्रतिनिधींनी लक्ष घालणे तितकेच महत्त्वाचे आहे. यासाठी यड्राव, खोतवाडी, तारदाळ परिसरातील यंत्रमागधारकांनी पुढाकार घेतला आहे. प्रकाश तांबेकर, दीपक मगदूम, सचिन मगदूम ही मंडळी यातून मार्ग काढण्यासाठी प्रयत्नशील आहेत.
कमी दराने कापडाची विक्री
कापड तागे उचल झाल्याशिवाय पेमेंट येत नाही. त्यामुळे सुताचे पैसे देता येत नाहीत. कापड उचल होत नसल्याने ते ठेवण्यास जागा अपुरी पडत आहे. यामुळे अडत्यांना कमी दरात कापड विक्री करून नुकसान सोसावे लागत आहे. यामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. ते वाहतुकीचा प्रश्न मिटल्यास सुटतील, असे यड्राव-खोतवाडी असोसिएशनचे प्रकाश तांबेकर यांनी सांगितले.