इचलकरंजीत ३३ नगरसेवकांची नवी आघाडी

By Admin | Updated: May 6, 2015 00:15 IST2015-05-05T21:08:00+5:302015-05-06T00:15:44+5:30

आवाडे, हाळवणकर बाजूला : डाळ्या-चाळके-बागवान यांच्यासह राष्ट्रवादी अशा नवीन राजकारणाची जुळवणी

Ichalkaranji 33 new leaders of corporators | इचलकरंजीत ३३ नगरसेवकांची नवी आघाडी

इचलकरंजीत ३३ नगरसेवकांची नवी आघाडी

इचलकरंजी : नगरपालिकेमध्ये राष्ट्रीय कॉँग्रेस व भाजप यांना बाजूला ठेवून एक नवीन आघाडी उदयास आली आहे. या आघाडीने आता नगरपालिकेची सत्ता कायमपणे ताब्यात ठेवण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. पालिकेतील ५७ पैकी ३३ नगरसेवक या नव्या आघाडीकडे असल्याचा दावा करण्यात येत आहे.नवी आघाडी माजी मंत्री प्रकाश आवाडे व आमदार सुरेश हाळवणकर यांच्यापासून दूर राहणार असल्याने त्याचा परिणाम स्थानिक राजकीय स्थित्यंतरावर होणार आहे. त्यामुळे या आघाडीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.शहर विकास आघाडीची स्थापना करून आमदार सुरेश हाळवणकर यांनी पंधरा वर्षांपूर्वी पालिकेच्या राजकारणात प्रवेश केला. त्यानंतर सन २००४ मध्ये शहर विकास आघाडीमार्फत निवडणूक लढविली. तर २००६ मध्ये नगरपालिकेमध्ये त्यावेळी असलेले कॉँग्रेसचे काही नगरसेवक फोडले आणि पालिकेमध्ये ‘शविआ’ची सत्ता स्थापित केली.
त्यानंतर सन २००९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत प्रथमच भाजपच्या उमेदवारीवर हाळवणकर यांनी माजी मंत्री आवाडे यांना धक्का दिला आणि ते निवडून आले. मात्र, पुढील सन २०११ मध्ये झालेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीत ५७ पैकी कॉँग्रेसचे ३०, राष्ट्रवादी कॉँग्रेसचे १० व ‘शविआ’चे १७ नगरसेवक निवडून आले. आवाडे यांनी कॉँग्रेस व राष्ट्रवादी अशी आघाडी करून पालिकेची सत्ता ताब्यात ठेवली.जून २०१४ मध्ये शुभांगी बिरंजे या नगराध्यक्षा झाल्या. पक्षांतर्गत ठरल्याप्रमाणे त्यांचा कालावधी डिसेंबरमध्ये संपत असला तरी त्यांनी त्यास नकार दिला आणि बंड केले. या बंडाला शहर विकास आघाडीने पाठिंबा दिला. तेव्हापासून ‘शविआ’चे प्रमुख सागर चाळके यांचा नगरपालिकेच्या राजकारणात शिरकाव झाला, तर कॉँग्रेसमधील सतीश डाळ्या यांचाही पालिकेत पुनर्प्रवेश झाला आणि नगराध्यक्षांच्या बंडापासूनच नवीन आघाडीची जुळवाजुळव सुरू झाली.
नवीन आघाडीचे नेतृत्व चाळके, डाळ्या व बादशहा बागवान हे करीत आहेत. त्यांनी राष्ट्रवादी कॉँग्रेसमधील जांभळे व कारंडे या दोन्ही गटांनाही आघाडीमध्ये बरोबर घेऊन जाण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या डाळ्या गटाकडे कॉँग्रेसमधील १४, तर चाळके यांच्याकडे ‘शविआ’मधील आठ नगरसेवक आहेत. यामध्ये राष्ट्रवादीचे ११ नगरसेवक समाविष्ट झाल्यास ही बेरीज ३३ होते. त्यामुळे नगरपालिकेचे राजकारण ताब्यात घेण्याच्या हालचाली त्यांनी सुरू केल्या आहेत. (प्रतिनिधी)


नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुका नोव्हेंबर-डिसेंबर २०१६ मध्ये होणार असून, चाळके-डाळ्या-बागवान यांच्या आघाडीकडून ही निवडणूक लढविण्यात येणार आहे.
या आघाडीमध्ये राष्ट्रवादी कॉँग्रेसचासुद्धा समावेश आहे. परिणामी, सन २०१६ मधील नगरपालिका निवडणूक राष्ट्रीय कॉँग्रेस, भाजप व नवीन आघाडी अशी तिरंगी होण्याचे संकेत आहेत.

Web Title: Ichalkaranji 33 new leaders of corporators

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.