इचलकरंजीत ‘हिवताप’ विभाग गाफील
By Admin | Updated: June 8, 2016 00:42 IST2016-06-08T00:41:08+5:302016-06-08T00:42:00+5:30
इंधनासाठी पैसेच नाहीत : डेंग्यू साथीच्या पार्श्वभूमीवर आरोग्य उपसंचालकांच्या बैठकीत प्रकार उघड

इचलकरंजीत ‘हिवताप’ विभाग गाफील
इचलकरंजी : शहरात डेंग्यू तापाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात मिळत असल्यामुळे मागील आठवड्यात शहरात युद्धपातळीवर स्वच्छता व डास प्रतिबंधक फवारणी मोहीम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, औषध फवारणीसाठी शासनाच्या हिवताप प्रतिबंधक खात्याकडे इंधनासाठी पैसेच नसल्याची धक्कादायक बाब आरोग्य खात्याचे जिल्हा उपसंचालक आर. बी. मुगळे यांनी मंगळवारी घेतलेल्या बैठकीत उजेडात आली. त्यामुळे बैठकीमध्ये काही वेळ खळबळ उडाली होती.
गेल्या दीड महिन्यांपासून शहरामध्ये डेंग्यू तापाच्या आजाराचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झाल्याचे दिसून आले आहे. यामुळे विशेषत: गावभागात डेंग्यूने चार रुग्णांचा मृत्यू झाला होता. या पार्श्वभूमीवर शहर स्वच्छतेसाठी शहरातील नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन करून नगरपालिका व शासनाचे लक्ष वेधले होते. नगरपालिकेच्या आरोग्य खात्याने याबाबत घेतलेल्या सर्वेक्षणामध्ये पालिकेच्या दवाखान्यासह खासगी रुग्णालयांमध्ये डेंग्यू तापाचे उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या दोनशेहून अधिक आढळून आली होती.
अशा परिस्थितीमध्ये गुरुवारी (२ जून) हिवताप प्रतिबंधक खात्याचे सहायक संचालक महेश खलिपे यांच्या अध्यक्षतेखाली नगरपालिका प्रशासन, आयजीएम रुग्णालयाकडील अधिकारी, हिवताप प्रतिबंधक खात्याचे अधिकारी, आदींची बैठक घेतली होती. या बैठकीमध्ये ५० पथके नेमून दररोज शंभर घरांचा सर्वे करून तापाच्या रुग्णांची नोंद करण्याचे ठरले. तर नजीकच्या पंधरा दिवसांत स्वच्छता मोहीम राबविण्याबरोबरच डास प्रतिबंधक औषध फवारणी व धूर फवारणी युद्धपातळीवर राबविण्याचा निर्णय घेतला. याशिवाय घरोघरी पाणी साठ्यांचे सर्वेक्षण करून डासांच्या अळ्या आढळल्यास टेमीफॉस औषध टाकण्याचा किंवा पाणी ओतून टाकण्याचेही निश्चित झाले.
मंगळवारी आरोग्य विभागाचे जिल्हा उपसंचालक मुगळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विलास देशमुख, सहायक संचालक डॉ. खलिपे, आयजीएम रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. श्रीकांत देशमुख, आदींची एक बैठक झाली. या बैठकीमध्ये आढावा घेत असताना डास प्रतिबंधक औषध फवारणी व धूर फवारणी करण्याच्या यंत्रांसाठी आवश्यक असलेल्या इंधनासाठी पैसेच नसल्याची धक्कादायक माहिती उघडकीला आली. मात्र, इचलकरंजीतील डेंग्यू रुग्ण मिळत असल्याच्या गंभीर प्रकाराची दखल घेत उपसंचालक मुगळे यांनी इंधनासाठी पैसे तातडीने उपलब्ध करून घेऊन फवारणी यंत्रणा कार्यान्वित करावी, अशा सूचना दिल्या. (प्रतिनिधी)