वीज दरवाढीविरुद्ध इचलकरंजीत मोचा
By Admin | Updated: January 14, 2015 00:43 IST2015-01-13T23:51:51+5:302015-01-14T00:43:27+5:30
बंदला संमिश्र प्रतिसाद : वीजदर समानतेची मागर्णी

वीज दरवाढीविरुद्ध इचलकरंजीत मोचा
इचलकरंजी : उद्योग व यंत्रमागांचे वाढीव वीजदर त्वरित कमी करावेत, वीजदर अन्य राज्यांच्या तुलनेने समपातळीवर ठेवावेत; अन्यथा राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा देत औद्योगिक संघटना समन्वय समितीच्यावतीने प्रांत कार्यालयावर मोर्चा काढला. यामध्ये इचलकरंजीबरोबरच रेंदाळ, कुरुंदवाड व वडगाव येथील यंत्रमागधारक, उद्योजक सहभागी झाले होते.
यंत्रमाग, उद्योगांचे सवलतीचे वीजदर स्थिर ठेवावेत, यंत्रमाग उद्योगाची स्वतंत्र वीजदर वर्गवारी व्हावी, अन्य राज्यांच्या पातळीवर महाराष्ट्रात वीजदराची आकारणी करावी, आदी मागण्यांसाठी आज, मंगळवारी विविध संघटनांतर्फे सर्व यंत्रमाग व उद्योग बंदचे आवाहन केले होते. त्याला संमिश्र प्रतिसाद मिळाला. शाहू पुतळ्यापासून हा मोर्चा मध्यवर्ती बसस्थानक, जनता बॅँक, आदी मार्गांवरून फिरून प्रांत कार्यालयावर आला. या बंदमुळे सुमारे ५० कोटी रुपयांचा फटका बसला आहे. शासनाने याप्रश्नी उपाययोजना केली नाही, तर राज्यातील उद्योग व्यवसाय बेमुदत बंद ठेवण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.
मोर्चात प्रताप होगाडे, सतीश कोष्टी, दीपक राशिनकर, आदींसह यंत्रमागधारक संघटना, सायझिंग, प्रोसेसिंग, इंजिनिअरिंग, औद्योगिक संघटनांचे प्रतिनिधी व उद्योजक उपस्थित होते. (प्रतिनिधी)
लोकप्रतिनिधींच्या घरांवर मोर्चे
वीज दरवाढीविरुद्ध सर्वच औद्योगिक संघटना प्रांताधिकारी कार्यालयावर मोर्चा काढतात; पण प्रांताधिकारी हे शासकीय नोकर आहेत. त्यापेक्षा आपण निवडून दिलेले आमदार, खासदार यांच्या घरांवर मोर्चे काढून त्यांना घेराव घातला पाहिजे, असे आवाहन माजी नगरसेवक सागर चाळके यांनी केले. या सूचनेचे टाळ्यांच्या गजरात स्वागत झाले.