इचलकरंजीत छेडछाडीने मुली हैराण
By Admin | Updated: June 30, 2016 01:07 IST2016-06-30T00:39:40+5:302016-06-30T01:07:44+5:30
कोपऱ्या-कोपऱ्यांवर टोळकी : पोलिसांकडून जरब बसविण्याची मागणी

इचलकरंजीत छेडछाडीने मुली हैराण
इचलकरंजी : इचलकरंजी शहरात शाळकरी मुली व महाविद्यालयीन तरुणींच्या छेडछाडीच्या प्रकारात वाढ झाली आहे. शहरातील काही ठरावीक ठिकाणी टोळक्यांनी अड्डे बनविल्याने मुली त्रस्त झाल्या आहेत. पोलिसांनी त्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी पालक व शाळांच्या शिक्षकांकडून होऊ लागली आहे.
कोल्हापूर येथील बोंद्रेनगरातील पल्लवी बोडेकर हिने छेडछाडीला कंटाळून केलेली आत्महत्या आणि इचलकरंजीतील पारीक कॉलनीत मुलीच्या दारात टोळक्याने रात्री घातलेला हैदोस या घटनांमुळे मुलींच्या छेडछाडीचा आणि एकतर्फी प्रेमातून सतावण्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. इचलकरंजीत हायस्कूल व महाविद्यालयांची संख्या लक्षणीय असून, आसपासच्या खेडेगावांतील विद्यार्थी, विद्यार्थिनी येथे शिक्षणासाठी मोठ्या प्रमाणात येतात. हायस्कूल किंवा महाविद्यालयांशी काहीही संबंध नसलेली टोळकी परिसरात उभी असतात. शाळा भरण्याच्या वेळी किंवा शाळा सुटण्याच्या वेळी अचूकपणे वेळ पाळणाऱ्या आणि मुलींची छेड काढणाऱ्या या टोळक्यांची दांडगाई वाढली आहे. मुली जवळ येताच चित्रविचित्र आवाज काढणे, चित्रपटांतील प्रसिद्ध गाण्यांवर हावभाव करणे किंवा काही ठरावीक अभिनेत्रींच्या नावाने मोठ्याने हाका मारणे, असे प्रकार केले जात आहेत.
अशा प्रकारांबाबत शाळेत शिक्षकांना किंवा नातेवाइकांना सांगितले तर घरातील मंडळी सोडण्यासाठी शाळेपर्यंत येतात. त्यामुळे वादावादीच्या घटना होण्याची भीती असते. तसेच अशा घटनांमुळे कदाचित शिक्षण अर्ध्यातच सोडावे लागेल, अशीही भीती वाटत असल्याने मुली नातेवाइकांकडे त्याबाबत कोणतीही वाच्यता करीत नाहीत. त्याचप्रमाणे शाळेमध्ये शिक्षकांनाही सांगितले जात नाही. यातूनच सडकसख्याहरी टोळक्यांची मुजोरी वाढली आहे.
इचलकरंजी शहरात अशी नेमकी ठिकाणे आहेत, ज्याठिकाणी ते सडकसख्याहरी उभे राहिलेले आढळतात. त्यामध्ये जुने शिवाजीनगर पोलिस ठाणे, झेंडा चौक, नारायण टॉकीज परिसर, शाहू पुतळा ते जुना कोल्हापूर नाका, विक्रमनगरमधील काही भाग, शहापूर आगार परिसर, जय सांगली नाका, आदी ठिकाणांचा समावेश आहे. शाळा भरण्याच्या व सुटण्याच्या वेळेला पोलिसांनी संबंधित परिसरांमध्ये गस्त ठेवावी. त्याचबरोबर काही महिला
पोलिसांची समावेश असलेली
पथके नेमून त्या टोळक्यांवर अचानकपणे वारंवार कारवाई
करावी. ज्यामुळे या सडकसख्याहरी टोळक्यांना जरब बसेल, अशी मागणी पालक व शिक्षकांतून होत आहे. (प्रतिनिधी)
सडकसख्याहरींना पालकांसमक्ष समज द्यावी
टोळक्यांवर कारवाई करताना पकडलेल्या सडकसख्याहरींना पोलिस ठाण्यामध्ये नेऊन तेथे त्यांच्या पालकांना बोलावून पालकांसमक्ष त्यांना समज देण्यात यावी. असा प्रकार कोल्हापूर येथील राजवाडा पोलिसांनी केला होता. त्यामुळे अशा टोळक्यांना आळा बसेल, अशीही चर्चा पालकांमध्ये आहे.