इचलकरंजीत ४० हजार लोक वंचित

By Admin | Updated: August 22, 2014 00:55 IST2014-08-21T21:18:44+5:302014-08-22T00:55:43+5:30

नवीन भुयारी गटार योजना : योजनेच्या आराखड्याचे प्रकटनच नाही; ‘शविआ’च्या तक्रारीनंतर माहिती उजेडात

Ichalkaranjeet deprived 40 thousand people | इचलकरंजीत ४० हजार लोक वंचित

इचलकरंजीत ४० हजार लोक वंचित

इचलकरंजी : साधारणत: आठ वर्षांपूर्वी सर्वेक्षण केलेल्या नवीन भुयारी गटार योजनेच्या अंमलबजावणीला सुरुवात होत असली तरी त्यानंतर वाढलेल्या चाळीस हजार लोकसंख्येच्या वसाहती या गटारीपासून वंचित राहणार आहेत. सन २००६ मध्ये झालेल्या भुयारी गटारीच्या सर्वेक्षणानंतर ही योजना तयार करण्यात आली तरी योजनेचा आराखडा नगरपालिकेने प्रसिद्ध केला नसल्याची वस्तुस्थिती पालिकेतील विरोधी शहर विकास आघाडीने उघडकीस आणली आहे.
शहरासाठी पहिल्या टप्प्यातील भुयारी गटार योजना साधारणत: पंचवीस वर्षांपूर्वी कार्यान्वित झाली. त्यावेळी शहराची लोकसंख्या दीड लाख होती. दरम्यान, कबनूरची वाढीव वसाहत, यशवंत कॉलनी, भोने माळ, लिगाडे मळा, जवाहरनगर, भारतमाता हौसिंग सोसायटी, स्वामी अपार्टमेंट परिसर, इंदिरा कॉलनी असा व्यापक परिसर आणि शहापूर गाव असे इचलकरंजी हद्दीत समाविष्ट झाले. पूर्वीच्या गटार योजनेमध्ये दहा दशलक्ष लिटर पाण्यावर प्रक्रिया करणारा सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प आहे. सध्या मात्र शहरातील सुमारे ४० दशलक्ष लिटर सांडपाणी गटारीतून वाहून जाते.
सन २००६ मध्ये भुयारी गटार योजनेचे सर्वेक्षण झाले. त्यावेळी २ लाख ५६ हजार इतकी लोकसंख्या होती. पूर्वीच्या गटार योजनेशिवाय कबनूरची वाढीव वसाहत, शहापूर आणि इचलकरंजीचा तत्कालीन वॉर्ड नं. ९ व १० असा व्यापक परिसर विचारात घेऊन हे सर्वेक्षण करण्यात आले. दरम्यान, शहराच्या वाढत्या औद्योगिकीकरणाबरोबरच सन २००५-०६ पासून शहराच्या लोकसंख्येतही लक्षणीय वाढ झाली आहे. सन २०११ मध्ये झालेल्या जनगणनेत २ लाख ८७ हजार इतकी लोकसंख्या नोंदविण्यात आली आहे.
मात्र, सध्या सुरू असलेल्या २०१४ मध्ये ही लोकसंख्या तीन लाखांवर गेली असल्याचा तज्ज्ञांचा अंदाज आहे. त्यामुळे सन २००८ नंतर शहराच्या लोकसंख्येत किमान ४० हजार लोकांची भर पडली आहे. वाढलेल्या लोकसंख्येच्या वसाहती कलानगर, जुना चंदूर रोड, सुर्वे मळा, संत मळा, कबनूर-गांधी विकासनगर, यशवंत कॉलनी, पुजारी मळा, गणेशनगर-भाटले मळा, शहापूर-इंडस्ट्रियल इस्टेटचा परिसर, सहारानगर, आमराई रस्ता अशा व्यापक परिसरांमध्ये वसल्या आहेत.
त्याचबरोबर टाकवडे रस्त्यावरील पी. बा. पाटील मळ्यातसुद्धा मोठी वसाहत सध्या वसलेली आहे. या परिसरांसाठी आवश्यक असलेल्या भुयारी गटार योजनेचा सध्याच्या राबविण्यात येणाऱ्या नवीन भुयारी गटार योजनेमध्ये अंतर्भाव नाही, अशी आश्चर्यजनक माहिती पालिकेतील शहर विकास आघाडीचे कार्याध्यक्ष अजित जाधव यांनी केलेल्या तक्रारीनंतर उजेडात आली आहे. (प्रतिनिधी)
८२ कोटींची योजना
८२ कोटी रुपये खर्चाची ही योजना असून, त्यामध्ये १११ किलोमीटर लांबीच्या भुयारी गटार योजना भूगर्भात बसविण्यात येणार आहेत. काळा ओढा व चंदूर ओढा या दोन ठिकाणी गटारीतील सांडपाण्यावर प्रक्रिया करणारे प्रकल्प उभा करण्यात येणार आहे. त्याची अनुक्रमे वीस दशलक्ष लिटर व दहा दशलक्ष लिटर अशी क्षमता आहे.

Web Title: Ichalkaranjeet deprived 40 thousand people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.