मी नियमानुसारच काम केले : अमित सैनी
By Admin | Updated: October 3, 2015 01:00 IST2015-10-03T01:00:27+5:302015-10-03T01:00:27+5:30
निवेदन बदल केल्यानंतर स्वीकारले

मी नियमानुसारच काम केले : अमित सैनी
कोल्हापूर : राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या निवेदनात पक्षीय टीका-टिप्पणी होती. सध्या महापालिका निवडणुकीची आचारसंहिता सुरू आहे. त्यामुळे या काळात जिल्हा प्रशासनाचा घटक असल्याने आपण असे निवेदन स्वीकारू शकत नाही. परंतु, निवेदनात बदल केल्यानंतर ते स्वीकारत आपण नियमानुसारच काम केले, असे जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी शुक्रवारी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
विविध मागण्यांंसाठी राष्ट्रवादी कॉँग्रेसने गुरुवारी मोर्चा काढला होता. यावेळी आमदार हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखाली खासदार धनंजय महाडिक, आमदार संध्यादेवी कुपेकर यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे शिष्टमंडळ निवेदन द्यायला गेल्यानंतर ते स्वीकारण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी नकार दिला. त्यामुळे संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी निषेध व्यक्त केला होता. यावेळी सुमारे दीड तास आंदोलकांना ताटकळावे लागले होते.
या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना विचारले असता ते म्हणाले, राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाने मोर्चा काढून दिलेल्या निवेदनात पक्षीय टीका-टिप्पणी होती. त्याचबरोबर निवेदन हे आपल्या नावावर होते. त्यामुळे प्रथमत: आपण ते स्वीकारले नाही. परंतु, आपल्या विनंतीनंतर त्यामध्ये संबंधितांनी बदल केल्यानंतर ते स्वीकारले. (प्रतिनिधी)