ओळख माझी माझ्याशी...
By Admin | Updated: July 18, 2014 00:28 IST2014-07-18T00:13:14+5:302014-07-18T00:28:01+5:30
व्यक्तिमत्त्व विकास कार्यक्रम

ओळख माझी माझ्याशी...
कोल्हापूर : तुम्ही करिअर वुमन असा, किंवा होम मेकर तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा नव्याने शोध घेण्याची संधी सोमवारी (दि. २१) दुपारी बारा ते तीन या वेळेत कोरगावकर लॉन, टाकाळा येथे लोकमत सखी मंच, ‘ओळख माझी माझ्याशी’ या कार्यक्रमातून महिलांना उपलब्ध करून देत आहे. ‘पोस्टर बॉईज’ या चित्रपटातील तारे-तारका सखींच्या भेटीला येणार असून, व्यक्तिमत्त्व विकासाच्या टिप्स देणार आहेत. गोविंदराव कोेरगावकर धर्मादाय संस्था यांचे कार्यक्रमाला सहकार्य लाभले आहे.
घर आणि करिअरची कसरत कशी साधायची, घरात राहूनही स्वत:ला आधुनिक कसे बनवायचे, नात्यांना न्याय कसा द्यायचा, वेळेची सांगड कशी घालायची, छंद कसे जोपासायचे, अशा विविध मुद्द्यांवर वारणा वडगावकर हसत-खेळत मार्गदर्शन करणार आहेत. महिलांसाठी काही उद्बोधक खेळही त्या घेणार आहेत. यावेळी होमिओपॅथी तज्ज्ञ डॉ. श्रीकांत लंगडे महिलांशी हितगूज साधतील.
‘पोस्टर बॉईज’या चित्रपटातील तारे श्रेयस तळपदे, दीप्ती तळपदे, दिलीप प्रभावळकर, अनिकेत विश्वासराव, नेहा जोशी, पूजा सावंत आणि प्रसिद्ध गायिका बेला शेंडे सखी सदस्यांच्या भेटीला येणार आहेत. त्यांच्या हस्ते ‘लकी ड्रॉ’ काढण्यात येणार असून, हॉटेल करवीर रियासतकडून दोन कुटुंबीयांना डिनर कुपन, तर उत्कृष्ट शिबिरार्थीला भेटवस्तू मिळणार आहेत.
सखींनी कार्यक्रमास वेळेवर उपस्थित राहण्याचे आवाहन ‘लोकमत सखी मंच’च्यावतीने करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)