अर्धा कप पाण्यात चार बिस्किटे बुडवून खाल्ली अन् दिवस काढला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:16 IST2021-06-18T04:16:49+5:302021-06-18T04:16:49+5:30
कोल्हापूर : नेपाळमध्ये काठमांडूला विमानतळावरून सुरू झालेला वातावरणाशी संघर्ष एव्हरेस्टच्या बेस कॅम्प तीनवर पोहचेपर्यंत सुरूच होता. शेवटची चौथ्या कॅम्पवरची ...

अर्धा कप पाण्यात चार बिस्किटे बुडवून खाल्ली अन् दिवस काढला
कोल्हापूर : नेपाळमध्ये काठमांडूला विमानतळावरून सुरू झालेला वातावरणाशी संघर्ष एव्हरेस्टच्या बेस कॅम्प तीनवर पोहचेपर्यंत सुरूच होता. शेवटची चौथ्या कॅम्पवरची चढाई करण्याची मानसिक तयारी होती, पण प्रचंड गार वारे, बर्फाच्या वादळासमोर टेन्टचाही टिकाव लागू शकला नाही. खाण्याचे अन्न आणि पाणी तयार करण्यासाठी इंधनही संपल्याने नाईलाजाने परतीचा मार्ग धरावा लागला. परत येताना देखील अर्धा कप पाण्यात चार बिस्किट बुडवून खात दिवस काढावा लागला. इंधन संपल्याने बर्फापासून पाणीही तयार करता येत नसल्याने अर्धा लिटर पाण्यात चौघांची तहान भागवावी लागली असा एव्हरेस्ट प्रवासातील थरारक अनुभवांचा पट गिर्यारोहक कस्तूरी सावेकर हिने गुुरुवारी येथे पत्रकार परिषदेत उलगडला.
हवामानाची योग्य साथ न मिळाल्याने एव्हरेस्ट मोहीम पुढील वर्षी नव्या हिमतीने पूर्ण करायची हा निश्चय करत कोल्हापुरात परत आलेल्या कस्तूरी सावेकर हिने गुरुवारी माध्यमांसमोर मोहिमेचा थरारक अनुभव कथन केला. यावेळी गिरिप्रेमी संस्थेचे अध्यक्ष व कस्तूरीचे प्रमुख मार्गदर्शक उमेश झिरपे, एव्हरेस्ट सर केलेले आशिष माने व जितेंद्र गवारे यांनीही या मोहिमेचा खडतर प्रवास मांडला. करवीर हायकर्सचे अध्यक्ष दीपक सावेकर, अमर अडके यांची प्रमुख उपस्थिती होती.
एव्हरेस्ट मोहिमेविषयी सांगताना कस्तूरी म्हणाली, प्रत्येक गिर्यारोहकाप्रमाणे एव्हरेस्टची शिखरे खुणावत होती. प्रचंड मेहनत करत मी येथवर पोहोचले, एव्हरेस्ट मोहिमेतील चारपैकी तीन टप्पे पार केले, पण दुर्देैवाने हवामानाची साथ मिळाली नाही आणि मला माघारी फिरावे लागले. या मोहिमेला यश मिळाले नसले तरी खचलेली नाही, नव्या जोमाने पुन्हा तयारी करणार आहे. हा प्रवास खडतर होता, पण बरेच शिकवणाराही होता. कुठल्याही परिस्थितीत आशा सोडायची नाही, प्रसंगी दोन पावले मागे येऊन झेप घेण्याची तयारी करायची, याचा चांगला धडा मिळाला.
शिखरावर जाऊन तिरंगा फडकवता आला नाही तरी इथपर्यंत पहिल्याच प्रयत्नात पोहचणे हे मोठे धाडसाचे होते आणि कस्तूरीने ते केले. तिची शारीरिक आणि मनाची तंदुरुस्ती चांगली आहे, असे एव्हरेस्ट सर करणारे जितेंद्र गवारे यांनी सांगितले.
मार्गदर्शक उमेश झिरपे यांनीही कस्तूरी अगदी लहान वयात मोठे ध्येय गाठण्याची क्षमता राखणारी मुलगी आहे, तिने अनेक खडतर प्रसंग अनुभवले आहे, त्यातून तिचे मानसिक बळ वाढणार आहे, हेच तिला पुढील मोहिमेत कामी येणार आहे, असे सांगितले.
फोटो: १७०६२०२१-काेल-कस्तूरी सावेकर एव्हरेस्ट
फोटो ओळ : काेल्हापूरची कन्या कस्तूरी सावेकर हिने एव्हरेस्ट मोहिमेतील थरारक अनुभव गुरुवारी सर्वांसमोर मांडले.